Sunday, March 15, 2026

धीर धरी...

धीर धरी...

आनंदी पालकत्व ; डाॅ. स्वाती गानू

टीनएजर्स मुलांना संयम कसा शिकवाल? संयम हा एक चांगला गुण आहे, मात्र तो जन्मतःच नसतो. तो विकसित करावा लागतो. आजच्या वेगवान आणि ताबडतोब सगळं मिळणाऱ्या जगात टीनएजर्सना संयम ठेवणे कठीण जाते. अनेक मुलांना खूप वेळ रिझल्ट्सची वाट पाहणे, निराशा सहन करणे किंवा आपली पाळी येईपर्यंत थांबणे अवघड वाटते. पण ‘संयम’ खूप महत्त्वाचे जीवनकौशल्य आहे. संयम मुलाचं भावनिक आरोग्य टिकवायला, चांगले निर्णय घ्यायला आणि निरोगी नातेसंबंध ठेवायला मदत करतो.

पालक म्हणतात, माझी मुलगी उतावळी आहे. माझा मुलगा फार हायपर आहे. जे हवे ते त्यांना ताबडतोब हवं असतं आणि हवंंच असतं. जरा म्हणून ऐकून घ्यायला, थांबायला तयार नसतात ही मुलं. कधी कधी तर वाटतं की हे उतावळेपण त्यांच्यामध्ये वारशातूनच आलंय अशी विधानेही पालकांकडून ऐकायला मिळत असतात. पालकांनो, मुलांना वेळेत संयम शिकवायला हवा. खरं म्हणजे मुलांकडे संयम नसतो असं नाही, मात्र अलीकडच्या काळात घरात एकुलतं एक मुल असल्याने मुलांना ओव्हर प्रोटेक्ट केलं जातं त्यांचं मन खूप जपलं जातं. मुलांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवून पुरवल्या जातात. प्राधान्याने त्याच्यावर काम केलं जातं. त्यांना हव्या असलेल्या वस्तू मागणी होताच त्वरित घेऊन दिल्या जातात. त्यामुळे एखाद्या गोष्टीसाठी थांबायचं असतं, त्या वस्तूची मागणी करताना खरंच आपल्याला त्या वस्तूची गरज आहे का? आई-बाबा तेवढे पैसे खर्च करू शकतात का? किंवा मी थांबू शकतो का? हा सगळा सारासार विचार करणे यासाठी जो संयम हवा, तो खरोखरच मुलांना शिकवायला हवा. मुलांना हे सांगू या, की संयम म्हणजे काय असतो, तर शांतपणे वाट पाहायला शिकणं असतं. न चिडता, न रागावता, गिव्हअप न करता.

मुलांनो तुम्ही संयमाने का वागायचं कारण जर तुम्हाला चांगल्या गोष्टी आयुष्यात मिळाव्या असं वाटत असेल, तर चांगल्या गोष्टींसाठी वेळ द्यावा लागतो. जसं आपण बी पेरलं, की एका रात्रीत रोप उगवत नाही. त्याला फुलं येत नाहीत किंवा फळं येत नाहीत आणि त्याचं झाड बहरून येत नाही. तसंच संयम म्हणजे बीचे फूल होऊ देण्यासाठी, वाढ होऊ देण्यासाठी थांबणं. मुलांना सांगावं लागेल, की संयमातून तुम्ही शिकता, की तुमची टर्न येणार आहे. तुमचा नंबर येणार आहे तोपर्यंत थांबायला हवं. संयम ठेवलात, की तुम्हाला तुमच्या स्वप्नांपर्यंत पोहोचायला मदत होते. संयम असला की तुम्ही शांत डोक्याने विचार करू शकता. तुमची सारासार विचार बुद्धी तुम्हाला वागताना, निर्णय घेताना मदत करते. कधी-कधी मुलांना गोष्टी ताबडतोब व्हाव्या असं वाटतं पण ते नॉर्मलच असतं. मात्र जेव्हा तुम्ही संयम ठेवायला शिकता, शांतपणे वेळ देऊन काम करता तेव्हा तुमचं हृदय मजबूत होतं आणि तुमचं मन शहाणपणाने विचार करतं.

पालकांनो मुलांना संयम कसा शिकवता येईल ते पाहूया :

१. स्वतः संयम दाखवा मुलं मोठ्यांकडून पाहून खूप काही शिकतात. तुम्हाला तुमच्या मुलाने संयम शिकावा असे वाटत असेल, तर तुम्ही स्वतः तो पाळा. रांगेत थांबताना, एखादी अडचण आली तर किंवा ताण आला तरी शांत राहण्याचा प्रयत्न करा. तुमचं वागणं त्यांच्यासाठी उदाहरण असते. जेव्हा तुमचा संयम आजमावला जातो, तेव्हा त्याबद्दल मोकळेपणाने बोला. तुम्हाला कसं वाटतं आणि तुम्ही शांतपणे परिस्थिती कशी हाताळता हे सांगा. उदा. ट्रॅफिकमध्ये अडकला, उशीर झाला तरी शांतपणाने परिस्थिती हाताळता येते. न रागावता न चिडता थांबता येते.

२. मुलांना सब्र का फल मीठा होता है! काही गोष्टी उशिरा मिळण्याची सवय लावा. पी हळद आणि हो गोरी असं एखाद्या गोष्टीबद्दल ताबडतोब फळ मिळेल अशी अपेक्षा करणं योग्य नाही. तर कष्ट केले तरी काही वेळाने फळ मिळेल हा विचार, दृष्टिकोन, संयमाशी जोडलेले आहे आणि आयुष्यात यश मिळवण्यासाठी महत्त्वाचे आहे. राग किंवा चुळबूळ करावीशी वाटत असेल, तर हळूहळू दीर्घ श्वास घ्या हेही सांगता येईल. उदा. एखादी खास वस्तू घेण्यासाठी पैसे साठवणे, बाग लावून तिची काळजी घेणे किंवा एखाद्या कौशल्यासाठी सातत्याने सराव करणे.

३. शांत राहण्याचा सराव (माइंडफुलनेस) माइंडफुलनेस म्हणजे सध्याच्या क्षणावर लक्ष देणे. त्यामुळे घाईघाईने प्रतिक्रिया देणे कमी होते आणि भावना नियंत्रणात राहतात. मुलांना खोल श्वास घेणे, ध्यान करणे किंवा योगा करायला प्रोत्साहित करा. यामुळे प्रतिक्रिया देण्याआधी थांबून विचार करण्याची सवय लागते.

४. वास्तव ध्येय ठरवायला मदत करा ध्येय ठरवणे आणि त्यासाठी मेहनत करणे यामुळे संयम शिकता येतो. पण ध्येय लहान टप्प्यांत विभागलेले असावे. मुलांसोबत लहान आणि मोठी ध्येये ठरवा. प्रत्येक छोट्या यशाचा आनंद साजरा करा. त्यामुळे त्यांना समजेल, की हळूहळू प्रगती करणे महत्त्वाचे आहे.

५. थांबण्याच्या संधी द्या आजकाल सर्व काही लगेच मिळते, त्यामुळे मुलांना वाट पाहण्याची सवय नसते. त्यांना थोडा वेळ थांबावे लागेल अशा गोष्टी करा.

उदाहरणे:

कोडी सोडवायला लावा पण त्यात संयमाची गरज असते. स्वयंपाक-पदार्थ बनवताना त्या पदार्थासाठी सुरुवातीला लागणारी सगळी तयारी करणे संयम शिकवते. तसंच चिरणे, वाफवणे, या गोष्टींसाठी संयम ठेवावा लागतो. छंद-वाद्य वाजवणे, चित्रकला किंवा हस्तकला यासाठी सराव आणि वेळ लागतो.

६. समस्या सोडवण्याची कौशल्ये शिकवा काही वेळा गोष्टी मनासारख्या होत नाहीत म्हणून अधीरता येते. समस्या सोडवण्याची पद्धत शिकवल्यास मुलं शांत राहायला शिकतात.

समस्या सोडवण्याची पद्धत : समस्या ओळखा - काय त्रास देत आहे ते स्पष्ट करा. उपाय सुचवा-वेगवेगळे मार्ग विचारात घ्या. पर्याय तपासा-प्रत्येक उपायाचे फायदे-तोटे पाहा. कृती करा-एक उपाय निवडून प्रयत्न करा. विचार करा-काय चांगले झाले, काय नाही ते बघा.

७. संयमाचे कौतुक करा मुलांनी संयम दाखवला, तर त्यांचे कौतुक करा. आधी लगेच प्रतिक्रिया देणारे मूल शांत राहिले तर त्याची दखल घ्या. मला माहीत आहे शांत राहणे वाट बघणं कठीण असतं, पण तू ते करून दाखवलंस असे मुलाला म्हणा. त्यांच्या भावना समजून घ्या. मुलांनी संयम दाखवल्यास त्यांना बक्षीसही देता येईल. बक्षीस मोठे असण्याची गरज नाही. कौतुकाचे शब्द किंवा छोटी विशेष परवानगीही पुरेशी असते. त्यामुळे त्यांना संयमाचे महत्त्व कळते.

संयम हा जन्मजात गुण नसून सरावाने विकसित होणारे कौशल्य आहे. योग्य मार्गदर्शन आणि आधार दिल्यास किशोरवयीन मुले हळूहळू संयम शिकू शकतात. यामुळे ते आयुष्यातील आव्हानांना शांतपणे आणि विचारपूर्वक सामोरे जाऊ शकतात.

किशोरवयीन मुलांना संयम शिकवण्यासाठी तुम्ही स्वतः शांत राहून उदाहरण द्या, त्यांना शांत राहण्याच्या सोप्या पद्धती शिकवा आणि थोडा वेळ थांबायला लावा. कंटाळा आला तर छंद लावायला सांगा, कामांसाठी टाइमर वापरायला सांगा आणि “मला आता राग येतोय” किंवा “मला अधीर वाटतंय” अशा भावना ओळखायला मदत करा. तुम्ही संयमाने वागलात, तर तुम्हाला जाणवतं की तुम्ही कणखर होऊ लागताय. जी मुलं संयमाने विचार करतात ते हिंमतवाले असतात आणि शहाणे असतात. संयम ठेवला तर तुम्ही राग आणि दुःखापासून लांब राहाल. आनंदी राहण्याची गुरुकिल्ली काय आहे तर संयम. त्यामुळे तुम्ही खूश राहाल, यशस्वी व्हाल. थांबणं म्हणजे वेळ फुकट घालवणं नाही, तर संयम म्हणजे जगण्यावर विश्वास ठेवणं असतं. हे मुलांना आवर्जून सांगा.

Comments
Add Comment