Saturday, March 14, 2026

‘रूक जा रात, ठहर जा रे चंदा...’

‘रूक जा रात, ठहर जा रे चंदा...’

नॉस्टॅल्जिया ; श्रीनिवास बेलसरे

पूर्वी अनेक सिनेमा असे निघाले की त्यांनी प्रेक्षकांना ढसढसा रडवले होते. त्याची दोन कारणे होती. त्याकाळी लोक कथेत रंगून जात, कथेतील पात्रांच्या जीवनाशी समरस होत आणि बहुतेकदा कथानक लोकांच्या भावविश्वाशी जुळणारेच असायचे. हल्लीसारखे मोठमोठे गँगस्टर्स, दक्षिण भारतातील सिनेमासारखे राजकारणातील कुटील गुंड, त्यांचे उद्योग, कोणतेही नितीमुल्ये न मानणारे नवे स्व‍च्छंदी जग आणि त्यातल्या बेधुंद तरुणतरुणी, पोलीस-कम-गुन्हेगार, मनोविकृत खुनशी, हिंसक व्यक्ती यांचे जीवन दाखवून त्यांचे उदात्तीकरण करणाऱ्या कथा लोकप्रिय होण्याचा तो काळ नव्हता.

दुसरी गोष्ट म्हणजे निर्मातेसुद्धा केवळ दोन घडीचे मनोरंजन हे एकमेव उद्दिष्ट ठेवून कलानिर्मिती करण्यासाठी अगतिक झालेले नव्हते. सिनेमा चालेल की नाही? ही भीती नसल्याने आदर्शवादी कथानक असलेल्या सिनेमासाठीसुद्धा निर्माते मिळायचे आणि प्रेक्षकही मिळायचे. त्यामुळे कवी, संगीतकार, लेखक, समाजसुधारक, बेकार तरुण, गरीब शेतकरी, तत्त्वनिष्ठ जेलर, ध्येयवादी शिक्षक असेही लोक कथेचे नायक होऊ शकत.

आज ज्या क्षेत्रात कोणतेच नैतिक मूल्य न पाळता केवळ पैसा हेच दैवत मानले जाते, त्या वैद्यकीय व्यवसायातही केवळ रुग्णांची सेवा हेच कर्तव्य मानून आयुष्य वेचणारे डॉक्टरही कथानायक होऊ शकत. असाच नायक असलेला ‘दिल एक मंदीर.’ आला १९६३ ला. राजकुमार (राम), राजेंद्रकुमार (डॉ. धर्मेश) आणि मीनाकुमारी (सीता) यांच्याबरोबर शुभा खोटे, अचला सचदेव, कुट्टी पद्मिनी आणि मेहमूद हे कलाकार होते. दिल एक मंदिरची कथा हा एक प्रेमाचा त्रिकोण होता. सी. व्ही. श्रीधर यांनी त्यांच्याच ‘नेंजील ओर आलयम’ या १९६२ सालच्या तमिळ नाटकावर बेतलेला हा सिनेमा केवळ २७ दिवसांत पूर्ण झाल्याने एक विक्रमच निर्माण करून गेला. मीना कुमारी खास या सिनेमासाठी सितार वाजवायला शिकली.

शंकर-जयकिशन यांचे संगीत असलेली सर्व गाणी अत्यंत लोकप्रिय झाली. हसरत जयपुरींचे ‘दिल एक मंदिर हैं’ हे जोगिया रागात बसवलेले गाणे, तर वार्षिक बिनाका गीतमालात दुसऱ्या क्रमांकावर गाजले. ‘रूक जा रात ठहर जा रे चंदा’ हे शैलेंद्रचे गीतही वर्षभरात वाजलेल्या १९२ हिट गाण्यात २१व्या क्रमांकावर वाजले. सिनेमाने एकूण ८ फिल्मफेयर पुरस्कारांसाठी नामांकन आणि राजकुमारला ‘सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्याचे’ तर अर्जुनदेव रष्क यांना ‘सर्वश्रेष्ठ संवादलेखनाचे’ फिल्मफेयर पारितोषिक मिळवून दिले.

स्व. इंदिराजींनी राजेंद्रकुमार, कुट्टी पद्मिनी आणि मीनाकुमारीचा त्यांच्या निवासस्थानी बोलावून सत्कार केला होता. सिनेमा भारतीय सिनेसृष्टीने इतका पसंत केला की अगदी अलीकडे जसे त्याचे रिमेक ‘आयी तेरी याद’(१९८०), ‘अरमान’(२००३) आले तसेच पूर्वी ‘मनसे मंदिरम’ (तेलगू १९६६), ‘कुकुंम रक्षी’ (कन्नड १९७७), हृदयम ओरू क्षेत्रम (मल्याळम १९७८) या दक्षिण भारतीय भाषांतही निघाले होते.

डॉ.धर्मेश (राजेंद्रकुमार) एक सेवाभावी डॉक्टर आहे. त्याचे सीतावर (मीनाकुमारी) निस्सीम प्रेम आहे; परंतु तिचा विवाह रामशी (राजकुमार) होतो. रामला कर्करोग झाल्याने तो उपचार घेण्यासाठी योगायोगाने डॉ. धर्मेश यांच्या दवाखान्यात दाखल होतो. जवळजवळ सगळी कथा या दवाखान्यातच घडते. डॉ. धर्मेश त्याच्या इतर डॉक्टर मित्रांशी रामाच्या केसबद्दल चर्चा करतो. रामचा कर्करोग खूप खोलवर गेलेला असल्याने शस्त्रक्रिया अटळ असते. त्यावेळी सीताला तिच्या धर्मेशशी असलेल्या पूर्वीच्या प्रेमाच्या पार्श्वभूमीमुळे अनेक अभद्र शंका येऊ लागतात, मात्र धर्मेश तिला ‘मी रामला वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करेन’ असे आश्वासन देतो. तो ते पाळतोही; परंतु त्या केसवर खूप अभ्यास केल्याने शस्त्रक्रियेच्या दिवसापर्यंत तो प्रचंड थकून गेलेला असतो. रामवरची शस्त्रक्रिया यशस्वी होते. तो आनंदाने ही बातमी सीताला सांगतो आणि परत जात असताना मध्येच कोसळतो. अतिश्रमाने त्याला हृद्यविकाराच्या झटका आलेला असतो. त्यातच त्याचा मृत्यू होतो अशी ही टोकाची शोकांतिका!

शस्त्रक्रियेपूर्वीच्या एका भावुक प्रसंगाच्या वेळी रामला आपण या भयंकर रोगातून जिवंत वाचू अशी अजिबात खात्री वाटत नसते. आता आपले आयुष्य संपणार. सीताबरोबरचे सहजीवनही संपुष्टात येणार असे मनाला उद्विग्न करणारे विचार मनात फेर धरू लागलेले असतानाच तो परिस्थितीला धीरोदात्तपणे सामोरे जायचा निर्णय घेतो. एका भावुक क्षणी तो तिला विनंती करतो. ‘मी यातून वाचेन आणि आपली पुन्हा भेट होईल की नाही हे मला माहीत नाही. पण आज तू आपल्या लग्नाच्या दिवशी केला होतास तसा वेश करून माझ्याजवळ थोडा वेळ बस.’ त्याने त्याच आठवणीसह जग सोडून जायची मनाची तयारी केलेली असल्याने त्याची ही भाबडी विनंती असते. त्या अत्यंत करुण प्रसंगासाठी शैलेंद्र या मनस्वी कवीने लिहिलेल्या गाण्याने प्रेक्षकांच्या अनेक पिढ्यांना अक्षरश: ढसढसा रडवले. कुणालाही भावुक करणारे शैलेंद्रचे ते शब्द होते-

“रूक जा रात ठहर जा रे चंदा, बीते ना मिलनकी बेला. आज चांदनीकी नगरीमे, अरमानोंका मेला. रूक जा रात...”

जसे रामला वाटते की, ही आपल्या जीवनाची शेवटची रात्र आहे. तशीच भयानक शंका सीतालाही भेडसावते आहे. पण तिच्या मनात अंधुक अशा आशाही दाटलेल्या आहेत. काहीतरी चमत्कार होईल आणि आपले सौभाग्य सुरक्षित राहील असेही तिला वाटते. मनातून ती त्या भयानक रात्रीला, जणू कालचक्रालाच विनंती करते, की तू कृपा करून थांब. माझ्या जीवलगाबरोबरच्या सहवासाची ही रात्र अखेरची ठरू देऊ नकोस.’

रामने सांगितल्याप्रमाणे त्यांच्या मिलनाच्या वेळच्या पहिल्या रात्रीचा वेश करून, मीनाकुमारी इच्छेविरुद्ध सजून आलेली आहे. तिच्याही मनात हातातून निघून चाललेल्या आयुष्याच्या आठवणी दाटल्या आहेत. आपल्या पतीशी मिलनाची ती पहिली रात्रच परत आलेली आहे असा तिला भास होतो. त्याच रात्रीच्या चांदण्या आज पुन्हा आपल्या

प्रेमाच्या कथा सांगत आहेत असे तिला वाटते-

“पहले मिलनकी यादे लेकर, आयी हैं यह रात सुहानी. दोहराते हैं फिर यह सितारे, मेरी तुम्हारी प्रेम कहानी. रूक जा रात ठहर जा रे चंदा...”

कितीही आशा धरली तरी सीताच्या मनातून पतीच्या मृत्यूची भीती जात नाही. ती पतीलाही पुन्हापुन्हा आश्वासन देऊन सांगू इच्छिते, ‘जरी शरीरे दोन असली तरी आपली मने एकच आहेत. जीवलगा, मी सतत तुझ्याबरोबर असणार आहे. केवळ या जीवनात नाही तर मृत्यूनंतरही मी तुझ्याबरोबर असेन.’

“कलका डर ना कलकी चिंता, दो तन हैं मन एक हमारे. जीवन सीमाके आगे भी आऊंगी मैं संग तुम्हारे...”

मनस्वी प्रेमाच्या अशा जुन्या कथा संवेदनशील मनांना नक्कीच अस्वस्थ करतात. हे गाणे आणि तो प्रसंग इतका करुण आहे की प्रेक्षक दोघांच्याही भावनांशी अगदी समरस होऊन जातात. डोळ्यांत अश्रू दाटल्याशिवाय राहत नाहीत.

मास कम्युनिकेशनमधील ‘कॅथार्सिस थियरी’ (मानवी भावनांच्या विरेचनाची गरज) लक्षात घेता मनाच्या निकोप वाढीसाठी अशा कथानकांचीसुद्धा एक गरज असतेच.

Comments
Add Comment