Saturday, March 14, 2026

भुकेलेल्यांना अन्न न दिल्यास...

भुकेलेल्यांना अन्न न दिल्यास...

महाभारतातील मोतीकण ; भालचंद्र ठोंबरे

पद्म पुराणातील एका कथेनुसार, वनवासात असताना प्रभू श्रीराम एकदा अगस्ती ऋषींच्या आश्रमात आले. अगस्ती ऋषींनी त्यांचे आनंदाने स्वागत केले व एक अनमोल हार श्रीरामांना भेट देऊ केला. तेव्हा श्रीरामांनी ब्राह्मणाकडून क्षत्रियांनी घेतलेले दान योग्य ठरेल का? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर बराच विचारविनिमय होऊन अखेर श्रीरामांनी तो हार स्वीकारला. तो हार अत्यंत बहुमोल होता. आवळ्या-एवढ्या हिऱ्यांच्या त्या हारात, मेघ, पुष्पराज, आदी अनेक रत्ने चकाकत होती. त्या हाराचे कौतुक करून श्रीरामांनी ऋषींना आपणास हा हार कसा प्राप्त झाला याबाबत विचारणा केली.

तेव्हा अगस्ती ऋषी म्हणाले, “हे रामा,! त्रेता युगातीलच ही घटना आहे. मी एका अरण्यात तपश्चर्येच्या उद्देशाने गेलो होतो. त्या अरण्यात हिंस्त्र पशू नव्हते. एके दिवशी मी त्या अरण्यात फिरताना एका सरोवराजवळ गेलो. त्या ठिकाणी मला एक शव दिसले. वाघ, सिंह नसलेल्या या अरण्यात हे शव कसे व कोठून आले याचा मी विचार करीतच होतो. तोच हंसाने युक्त एक विमान आकाशमार्गे येताना दिसले. त्या विमानात गंधर्व अप्सरा नृत्य, गायन व वादन करीत होत्या. थोड्या कालांतराने विमानातून एक पुरुष उतरला. त्याने सरोवरात स्नान केले व नंतर शवाजवळ जाऊन तो शवाचे मांस खाऊ लागला. मांस भक्षण झाल्यानंतर त्याने पुन्हा सरोवरात स्नान केले व विमानात बसून ते सर्वजण गेले. हीच घटना पुन्हा एकदा दिसली त्यावेळेस मी त्या पुरुषाला या घटनेबाबत विचारले व आपण सुस्थितीत असतानाही आपला आहार असा निंद्य प्रकारचा का असावा याची विचारणा केली. तेव्हा तो पुरुष म्हणाला, “मी विदर्भातील वसुदेव नावाच्या राजाचा पुत्र होतो. मला सुरथ नावाचा लहान भाऊ होता. पित्याच्या मृत्यूनंतर माझा राज्याभिषेक झाला. मी योग्य प्रकारे प्रजेचे पालन केले. पुढे अचानक मला विरक्ती आल्याने मी लहान भावाकडे राज्यकारभार सोपवून वनात गेलो. अनेक वर्षे तपश्चर्या केली. या तपश्चर्येमुळे मला ब्रह्मलोकाची प्राप्ती झाली. पण ब्रह्मलोकात असूनही मी तहान-भुकेने व्याकुळ होत असे. त्यामुळे मी एक दिवस याचे कारण ब्रह्मदेवांना विचारले. तेव्हा पितामह म्हणाले, तू भुतलावर राज्य करीत असताना एकदा तुझ्याकडे आलेल्या भुकेलेल्या भिकाऱ्याला अन्न न देता स्वतःचेच उदरभरण करण्याची चूक तुझ्या हातून घडली व त्यामुळे तुला ही भुकेची जाणीव होत असते.

यावर उपाय काय म्हणून विचारले असता, तुला तुझ्याच शवाचे मांस भक्षण करावे लागेल, असे सांगितले. तेव्हा राजा म्हणाला, देवा आता माझ्या देहाचा अस्थिपंजर झाला असेल; परंतु ब्रह्मदेव म्हणाले नाही मी तुझ्या शवाला अक्षय बनविले आहे. त्यामुळे ते कधीच समाप्त होणार नाही. रोज तुझे शव पुष्टच मिळेल. यातून माझी सुटका कधी व केव्हा होणार असा मी ब्रह्मदेवांना प्रश्न केला असता ते म्हणाले, जेव्हा तुझी व अगस्त्यी मुनींची भेट होईल. त्याच वेळेस तुझी या कृत्यातून सुटका होईल. तेव्हापासून मी त्या ऋषींचीच वाट पाहत आहे व चिंतन करीत असतो.

यावर मी म्हणालो, मीच तो अगस्ती मुनी आहे. तेव्हा त्या शापित राजाने त्यांना साष्टांग नमस्कार करून या निंदनीय कृत्यापासून आपला उद्धार करण्याची विनंती केली. अगस्ती ऋषींनी त्याचा उद्धार केला. त्यावेळेस तो राजा शापमुक्त होऊन त्याचा मानवी देह नष्ट होऊन तो ब्रह्मलोकी गेला. जाण्यापूर्वी त्याने सर्व इच्छापूर्ती करणारा हा हार मला दिला.

तात्पर्य - तेव्हा भुकेलेल्यांना अन्न न देण्यासारखे कर्म स्वतःकडून झाल्यास शवाचे मांस भक्षण करण्यासारख्या निंदनीय कृत्याला सामोरे जावे लागू लागते. असा बोध पद्मपुराणातील या कथेवरून होतो.

Comments
Add Comment