Saturday, March 14, 2026

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पुन्हा घुमली 'वनराणी'ची शिट्टी

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पुन्हा घुमली 'वनराणी'ची शिट्टी

- बॅटरीवर चालणाऱ्या इंजिनासह आधुनिक सेवा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : मुंबईकरांच्या बालपणीच्या आठवणींशी घट्ट नाते असलेली, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘वनराणी’ मिनी ट्रेन अखेर नव्या रूपात रुळावर परतली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री तथा उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांच्या हस्ते शनिवारी या ट्रेनचे उद्घाटन करण्यात आले. २०२१ मधील ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे विस्कळीत झालेली ही सेवा तब्बल सहा वर्षांनंतर अधिक आधुनिक आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानासह पर्यटकांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे. या सोहळ्याला राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना पीयूष गोयल यांनी उत्तर मुंबईच्या प्रगतीचा आणि निसर्ग संवर्धनाचा संकल्प बोलून दाखवला. ऊर्जा-कार्यक्षम आणि बॅटरीवर आधारित इंजिन, आधुनिक कोचेस आणि मार्गिकेलगतच्या सौंदर्यीकरणामुळे पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आता दोन प्रकारच्या ट्रेन धावणार आहेत. यामध्ये आधुनिक सुविधेची 'व्हिस्टाडोम मिनी ट्रेन' आणि जुन्या आठवणींना उजाळा देणारी 'वनराणी विंटेज ट्रेन' यांचा समावेश आहे. या दोन्ही ट्रेन बॅटरीवर चालणाऱ्या असल्याने उद्यानातील शांतता आणि प्रदूषणाची पातळी राखण्यास मदत होईल. निसर्गरम्य वातावरण आणि जैवविविधतेचा अनुभव पर्यटकांना आता अधिक जवळून घेता येणार आहे.

तौक्ते चक्रीवादळाचा बसला होता फटका :

मे २०२१ मध्ये आलेल्या 'तौक्ते' चक्रीवादळामुळे राष्ट्रीय उद्यानातील रेल्वे मार्गाचे आणि मिनी ट्रेनच्या इंजिनाचे अतोनात नुकसान झाले होते. परिणामी, ही लोकप्रिय सेवा बंद पडली होती. मुंबईकरांनी या ट्रेनच्या पुनरागमनासाठी मोठी प्रतीक्षा केली होती. आता या नव्या सुविधेमुळे शालेय सहली, निसर्गप्रेमी आणि पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा