Saturday, March 14, 2026

उन्हाच्या तडाख्यात डोंगरदऱ्यातील रानमेव्याचा गारवा

उन्हाच्या तडाख्यात डोंगरदऱ्यातील रानमेव्याचा गारवा

करवंदे, कैरी, काजू, बोरांना वाढती मागणी

खोपोली  : उन्हाळ्याचे आगमन होताच जंगलात तयार होणारा विविध प्रकारचा रानमेवा आता बाजारपेठेत दाखल होऊ लागला आहे. करवंदे, कैरी, अंजीर, काजू, चिंच, बोरे, तोरणे अशा अनेक प्रकारच्या रानमेव्यामुळे बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले आहे. या रानमेव्याची चव, पौष्टिकता आणि औषधी गुणधर्म यामुळे ग्राहकांमध्ये त्याला मोठी मागणी आहे.

डोंगराळ व दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांसाठी हा रानमेवा उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन ठरत आहे. जंगलातून गोळा केलेला हा मेवा ते बाजारात आणून विक्रीसाठी ठेवतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या काळात अनेक आदिवासी कुटुंबांना रोजगार मिळत असून त्यांच्या उदरनिर्वाहाला हातभार लागतो. विशेष म्हणजे या रानमेव्याची किंमतही सर्वसामान्यांना परवडणारी असल्याने ग्राहक त्याकडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत आहेत.

सध्या बाजारात हिरवीगार करवंदे मोठ्या प्रमाणावर दिसत असून काळी मैना (पिकलेली करवंदे) अद्याप पूर्णपणे तयार झालेली नाहीत. मात्र या हिरव्या करवंदांचा वापर स्वयंपाकात मोठ्या प्रमाणावर केला जातो. महिलावर्गाच्या म्हणण्यानुसार, हिरव्या करवंदांचा ठेचा, भाजी किंवा लोणचे बनवून दैनंदिन जेवणात त्याचा वापर केला जातो. त्याची चव आंबट-तिखट असल्याने जेवणाची लज्जत वाढते. उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळावा यासाठी अनेकजण फलाहाराचा पर्याय निवडतात. बाजारपेठेत आंबा, द्राक्षे, फणस, चिकू यांसारख्या फळांबरोबरच करवंद, काजू, बोरे, तोरणे, जाम, जांभळे अशा रानमेव्याची विक्री मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. विशेषतः असह्य करणाऱ्या उन्हात पटकन खाता येणारा आणि ताजेतवानेपणा देणारा हा रानमेवा ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे.

लहान मुलांपासून ते मोठ्या मंडळींपर्यंत सर्वांनाच या रानमेव्याची विशेष आवड असते. रुचकर, स्वस्त आणि औषधी गुणधर्म असलेला हा रानमेवा शरीराला थंडावा देण्याबरोबरच आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत बाजारात या रानमेव्याची मागणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत असताना दुसरीकडे जंगलातून येणारा हा नैसर्गिक रानमेवा ग्राहकांना चव आणि आरोग्याचा दुहेरी लाभ देत असल्याने बाजारपेठेत त्याची मोठी चलती असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

Comments
Add Comment