Saturday, March 14, 2026

PM Surya Ghar yojana : 'पंतप्रधान सूर्य घर' योजनेत महाराष्ट्राची बाजी

PM Surya Ghar yojana : 'पंतप्रधान सूर्य घर' योजनेत महाराष्ट्राची बाजी

- उत्तर प्रदेश, गुजरातला टाकले मागे; चार महिन्यांत १ लाख ८ हजार घरांवर सौर यंत्रणा

मुंबई : स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेच्या दिशेने सुरू असलेल्या 'पंतप्रधान सूर्य घर : मोफत वीज' योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राने देशात अव्वल स्थान पटकावले आहे. निवासी घरांच्या छतावर सौर यंत्रणा बसविण्यात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरले असून, देशातील एकूण सौर संचांपैकी सुमारे २० टक्के वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली.

नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या अवघ्या पाच महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्रात १ लाख ८ हजार ३२७ घरांमध्ये सौर यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. राज्याने या कामगिरीच्या जोरावर उत्तर प्रदेश आणि गुजरात सारख्या सौर ऊर्जेत आघाडीवर असलेल्या राज्यांनाही मागे सारले आहे.

महाराष्ट्रातील सौर यंत्रणांच्या स्थापनेचा वेग लक्षवेधी आहे. ताज्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्राने उत्तर प्रदेश (९५ हजार ६६५) आणि गुजरात (९४ हजार ३६४) या राज्यांवर मात केली आहे. विशेष म्हणजे, राजस्थान, आसाम, छत्तीसगड आणि ओडिशा या चार राज्यांची एकत्रित आकडेवारी गृहीत धरली, तरी महाराष्ट्रातील सौर संचांची संख्या त्यापेक्षा जास्त आहे. केरळ, मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीर या पाच राज्यांच्या एकत्रित संख्येपेक्षाही महाराष्ट्र सौर ऊर्जेच्या प्रसारात आघाडीवर आहे.

शाश्वत ऊर्जेला प्राधान्य :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या योजनेमुळे नागरिकांना मोफत किंवा स्वस्त वीज मिळण्यासोबतच कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत होत आहे. "पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे देशात स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढला असून, महाराष्ट्राने या मोहिमेत अग्रस्थान मिळवून देशाला नवी दिशा दिली आहे," असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

कोणत्या राज्यात किती सौर यंत्रणा?

महाराष्ट्र : १,०८,३२७ उत्तर प्रदेश : ९५,६६५ गुजरात : ९४,३६४ आंध्र प्रदेश : ३०,९१५ राजस्थान : ३९,४८४

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >