भारत विकसित राष्ट्र बनविण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना समाज नशामुक्त असणे अत्यावश्यक आहे. तरुण पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी आणि निरोगी समाज घडविण्यासाठी नशामुक्ती अभियान महत्त्वाची भूमिका बजावत आहे. जनजागृती, समुपदेशन आणि सामूहिक प्रयत्नांमधूनच व्यसनमुक्त भारताचे स्वप्न साकार होऊ शकते.
नशामुक्ती अभियान आपल्या भारत देशाच्या शतक महोत्सवी स्वातंत्र्याच्या वर्षापर्यंत विकसित भारत होण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी देशातील सामाजिक परिस्थिती, पर्यावरणीय शाश्वतता, आर्थिक वाढ आणि सुशासन अशा विविध बाबींचा समावेश आहे. म्हणजे आपला देश एक विकसित राष्ट्र म्हणून ओळखला जाणार आहे; परंतु असे असले तरी त्या देशातील नागरिक नशामुक्त असले पाहिजेत तरच देश खऱ्या अर्थाने विकसित बनू शकतो. देशाच्या विकासासाठी नशामुक्ती होणे गरजेचे आहे. त्यासाठी देशात नशामुक्ती अभियानाच्या माध्यमातून प्रामाणिकपणे जनजागृती झाली पाहिजे. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने १५ ऑगस्ट २०२० रोजी देशात नशामुक्ती भारत अभियान सुरू केले. प्रथम देशातील २७२ जिल्ह्यांत हे अभियान राबविण्याचे निश्चित करण्यात आले होते. सध्या ३७२ जिल्ह्यांमध्ये नशामुक्ती अभियान राबविले जात आहे. आपल्या देशात सन २०२१ मध्ये ७५२ जिल्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश राज्यात सर्वात ७५ जिल्हे असून सर्वात कमी गोवा राज्यात २ जिल्हे आहेत, तर आपल्या महाराष्ट्र राज्यात ३६ जिल्हे आहेत. तेव्हा देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक जिल्ह्यात नशामुक्ती अभियान राबविणे गरजेचे आहे.
नशामुक्ती अभियानाचा मुख्य उद्देश मादक द्रव्यांपासून मुक्त करणे, तरुणाईला जागृत करणे आणि नशा व्यक्तींचे पुनर्वसन करणे ही आहेत. म्हणजे नशामुक्ती अभियान निरोगी जीवन आणि आनंददायी समाज घडविण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी देशातील तरुणाईमध्ये नशामुक्ती विषयी जनजागृती अतिशय महत्त्वाची आहे. काही ठिकाणी नशा करून गळफास घेतल्याची उदाहरणे आहेत. तसेच अपघात झालेले आहेत तरी सुद्धा आकस्मिक मृत्यूची नोंद केली जाते. बस डेपोच्या परिसरात, रेल्वे पटरी, पडीत इमारतीमध्ये, वस्ती नसलेल्या रस्त्याच्या बाजूच्या झुडपात, फुटपाथ, रेल्वे प्लॅटफॉर्मवर इत्यादी ठिकाणी नशा करणारी मुले व वृद्ध व्यक्ती पाहायला मिळतात. यासाठी देशातील प्रत्येक जिल्ह्यात नशामुक्तीसाठी जनजागृती झाली पाहिजे. त्यासाठी मादक द्रव्यांच्या सेवनामुळे होणारे वाईट परिणाम सुजाण नागरिकांना सांगावे लागतील. यामध्ये सामाजिक संस्था, शिक्षण संस्था, विविध स्वयंसेवी संस्था अशा संस्थांमार्फत जनजागृतीची मोहीम हाती घ्यावी. तसेच त्या आनुषंगाने विविध कार्यक्रम राबविण्यात यावेत. व्यसनाधीन झालेल्या नागरिकांचे सुद्धा योग्यप्रकारे समुपदेशन करून त्यांचे पुनर्वसन करण्यात यावेत. यातून निरोगी समाज कसा निर्माण करता येईल त्या दृष्टिकोनातून मादक द्रव्यांचे प्रमाण कमी कसे करता येईल, त्याप्रमाणे प्रयत्न करावा. यातून देशात निरोगी समाज निर्माण करता येईल. याचा चांगला परिणाम लोकांचे सरासरी आयुर्मान वाढण्याला मदत होणार आहे. याला कारण वैद्यकीय सेवा आणि पोषण आहार म्हणता येईल. याच्या जोडीला नशामुक्ती महत्त्वाची आहे. सध्या देशात मादक द्रव्यांचा विचार केल्यास यात तरुण पिढी जास्त आहारी गेलेली दिसत आहे. यामुळे विकसित भारत राष्ट्र कसे होणार? केवळ जनजागृती करून चालणार नाही, तर शासन पातळीवर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे. एकीकडे मादक द्रव्यांचे सेवन करण्यास प्रतिबंध करणे आणि दुसरीकडे शासन मान्य देशी दारूचे दुकान म्हणून मान्यता देणे. त्याला सुजाण नागरिकांनी विरोध केल्यास शासनाचा महसूल बुडतो अशी आरडाओरड सुरू केली जाते. मात्र यावरती कायदेशीरपणे प्रतिबंध होणे गरजेचे आहे. यासाठी सामूहिक जागृती, पथनाट्य व पोस्टर्स लावून जनजागृती केली जात आहे. काही ठिकाणी तरुण पिढी बरबाद होऊ नये म्हणून दुकाने बंद करण्याचा प्रयत्न सुद्धा झाला. दारूची दुकाने काही दिवस बंद करण्यात आली. मात्र काही दिवसांनी पुन्हा दारूची दुकाने सुरू करण्यात आली. मादक द्रव्यांच्या सेवनाने गंभीर आजार, मानसिकदृष्ट्या खचून जाणे, कर्जबाजारी, शारीरिक समस्या अशा अनेक समस्या निर्माण होत आहेत. ग्रामीण भागात अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत चालले आहेत. काही ठिकाणी मुलांना वडिलांच्या मादक द्रव्यांच्या सेवनाने शाळा शिकण्याची इच्छा असून सुद्धा घरची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे अर्धवट शाळा सोडून तुटपुंज्या पगारावर बारा तास काम करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे देशातील दारिद्र्य निर्मूलन होणार नाही. यात गरीब अधिक गरीब होत जाणार आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होत जाणार आहे. जर भारत सरकारला देश विकसित करायचा असेल तर ही आर्थिक दरी कमी करावी लागणार आहे. ज्या गरिबांसाठी योजना आहेत त्या गरिबांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. तसेच त्यांना त्यांच्या मूलभूत हक्कांची जाणीव करून द्यायला हवी.
नशामुक्ती भारत अभियान राबविताना मादक द्रव्यांच्या सेवनाने जे दुष्परिणाम निर्माण होतात त्याची प्रत्येक जिल्ह्यात जनजागृती होणे गरजेचे आहे. तेव्हा तरुणाई नशेच्या आहारी न जाता ग्रंथालयात गेले पाहिजेत. चांगल्या लेखकांच्या पुस्तकांचे वाचन करायला हवे. दररोज वर्तमानपत्रे वाचल्याने आपल्या परिसरातील घडामोडी समजून चांगल्या मार्गाचा अवलंब करू शकतो. म्हणजे नकळत असा बदल घडत असतो. हे भविष्याच्या दृष्टीने चांगले आहे. तेव्हा देशात विकासाच्या दृष्टिकोनातून नशामुक्ती भारत अभियान देशातील प्रत्येक जिल्ह्यात राबविणे गरजेचे आहे.
रवींद्र तांबे





