मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या स्थापत्य समिती (शहर) अध्यक्षपदी शिवसेनेच्या यामिनी यशवंत जाधव तर उपाध्यक्षपदी अजय किसन पाटील आणि स्थापत्य समिती (उपनगरे) अध्यक्षपदी संगीता शर्मा तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे सुरेश आवळे यांची निवड करण्यात आली आहे. या दोन्ही समित्यांमध्ये प्रतिस्पर्धी पक्षाने उमेदवारी अर्ज न भरल्यामुळे या अध्यक्ष तसेच उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
स्थापत्य समिती (शहर) अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्यावतीने यामिनी जाधव तर उपाध्यक्षपदी भाजपच्यावतीने अजय पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. तर प्रतिस्पर्धी पक्षाकडून दोन्ही पदांसाठी एकही अर्ज न आल्यामुळे गुरुवारी झालेल्या या निवडणुकीत त्यांचा एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. स्थापत्य समिती (शहर) उप सभापती पदासाठी भारतीय जनता पक्षाचे अजय किसन पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणुकीत पिठासीन अधिकारी म्हणून रितू तावडे यांनी कामकाज पाहिले. यावेळी स्थापत्य समिती (शहर) सदस्यांसह प्रमुख अभियंता (पर्यावरण व वातावरणीय बदल) प्रदीप गवळी, महानगरपालिका सचिव मंजिरी देशपांडे आदी उपस्थित होते.
तर महानगरपालिकेच्या स्थापत्य समिती (उपनगरे) सभापती पदासाठी गुरुवारी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या संगीता शर्मा यांचा एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. तसेच स्थापत्य समिती (उपनगरे) उप सभापती पदासाठी शिवसेना पक्षाचे सुरेश आवळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून उप महापौर संजय घाडी यांनी कामकाज पाहिले. यावेळी स्थापत्य समिती (उपनगरे) सदस्यांसह प्रमुख अभियंता (पर्यावरण व वातावरणीय बदल) प्रदीप गवळी, महानगरपालिका सचिव मंजिरी देशपांडे आदी उपस्थित होते.






