Friday, March 13, 2026

Mojtaba Khamenei : गेला खामेनी कुणीकडे ? जगभरात चर्चेला उधाण

Mojtaba Khamenei : गेला खामेनी कुणीकडे ? जगभरात चर्चेला उधाण

इराणचे नव्याने नियुक्त सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांच्याबाबत सतत नवनवीन बातम्या समोर येत आहेत. अशातच काही वृत्तांनी दिलेल्या माहितीनुसार मोजतबा खामेनी तेहरानच्या हल्ल्यानंतर कोमामध्ये आहेत. मात्र इराणकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तर दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी खामेनी गंभीर जखमी असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे जगभरात चर्चेला उधाण आले आहे.

तर काही सूत्रांच्या माहितीनुसार, एका हवाई हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतर खामेनी यांचा एक पाय कापावा लागला आहे. अहवालानुसार ५६ वर्षीय मोजतबा खामेनी त्या एअर स्ट्राइकमध्ये गंभीर जखमी झाले होते, ज्यामध्ये त्यांचे वडील आणि इराणचे माजी सर्वोच्च नेते अली खामेनी यांचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर त्यांना अत्यंत गंभीर अवस्थेत उपचारासाठी तेहरान येथे नेण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र, २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या त्याच एअर स्ट्राइकमध्ये ८६ वर्षीय अली खामेनी यांची हत्या झाली, त्यांना जखमा झाल्या की दुसऱ्या एखाद्या हल्ल्यात ते जखमी झाले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांच्या प्रकृतीबाबत मोठे विधान केले आहे. माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत ट्रम्प यांना मोजतबा जिवंत आहेत का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “माझ्या मते ते कदाचित जिवंत असावेत, पण त्यांना गंभीर दुखापती झाल्या असण्याची शक्यता आहे.” इराणचे सर्वोच्च नेतेपद स्वीकारल्यानंतर मोजतबा यांच्याबाबत ट्रम्प यांनी केलेली ही पहिलीच प्रतिक्रिया आहे. ट्रम्प यांनी असेही संकेत दिले की इराणविरुद्ध सुरू असलेल्या संघर्षात अमेरिका मागे हटणार नाही.

सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यात मोजतबा खामेनी यांना अतिशय गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांच्या शरीराला मोठे नुकसान झाले असून त्यामध्ये एक पाय गमावल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांच्या पोटाला किंवा यकृताला (लिव्हर) गंभीर इजा झाल्याचाही दावा करण्यात आला आहे. अहवालानुसार सध्या मोजतबायांच्यावर तेहरानमधील सीना युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये कडेकोट सुरक्षेत उपचार सुरू आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. ज्या रुग्णालयातील विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, तो विभाग पूर्णपणे सील करण्यात आला असून तेथे मोठ्या प्रमाणावर सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. इराणचे आरोग्यमंत्री आणि अनुभवी ट्रॉमा सर्जन मोहम्मद रझा जफरगंडी उपचारांवर देखरेख ठेवत आहेत.

दरम्यान, इराणच्या सरकारी माध्यमांनी नेतृत्वात सातत्य दाखवण्याचा प्रयत्न करत एक निवेदन प्रसारित केले. हे निवेदन मोजतबा खामेनी यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर दिलेला पहिला संदेश असल्याचे सांगण्यात आले. मात्र हा संदेश स्वतः खामेनी यांनी वाचलेला नसून एका न्यूज अँकरने तो वाचून दाखवला. या संदेशात इराण आपल्या नागरिकांच्या रक्ताचा बदला घेईल आणि प्रादेशिक समुद्री मार्गांना लक्ष्य करणारे हल्ले सुरूच ठेवेल, असे म्हटले आहे. तसेच होर्मुज जलडमरूमध्य बंद करण्याची धमकीही यात दिल्याचे सांगितले जाते. अहवालात असेही म्हटले आहे की इराणची सैन्य आणि राजकीय व्यवस्था कदाचित खामेनी यांच्या थेट आदेशाशिवायही युद्ध सुरू ठेवू शकते. एका इराणी विश्लेषकाने सांगितले की अली खामेनी यांनी उभी केलेली सत्ताकारणाची व्यवस्था इतकी मजबूत आहे की ती सक्रिय नेत्याशिवायही कार्य करू शकते.

मात्र, हेही स्पष्ट केले आहे की या सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. कारण इराणमध्ये इंटरनेटवर कडक निर्बंध आहेत आणि नेत्यांच्या उपचारांबाबत सुरक्षेची अत्यंत कडेकोट व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान, अमेरिकेच्या हल्ल्यात मोजतबा खामेनी यांची पत्नी, त्यांची एक बहीण, त्यांची भाची तसेच त्यांचे वडील आणि इराणचे सर्वोच्च नेते आयातोल्ला अली खामेनी यांचाही मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

Comments
Add Comment