नवी दिल्ली: अमेरिकेला इराणकडून अत्यंत तीव्र आणि जशास तसे प्रत्युत्तर मिळत आहे. अमेरिकेने ज्या गोष्टीची कधी कल्पनाही केली नव्हती, इराण नेमके तेच करत आहे. खरं तर इराणसोबतच्या संघर्षात अमेरिकेला एकापाठोपाठ एक असे अनेक धक्के बसत आहेत. आता या सुरू असलेल्या संघर्षात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एका मोठ्या धक्क्याचा सामना करावा लागला आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या लष्करातील KC-135 या 'एरिअल रिफ्युएलिंग टँकर' (हवेतच इंधन भरणाऱ्या) विमानाला इराणनं उडवल्याचा दावा केलाय. होय, अमेरिकेचे अत्यंत शक्तिशाली KC-135 टँकर विमान नष्ट झालंय. इराणसोबतच्या संघर्षाशी संबंधित एका लष्करी मोहिमेदरम्यान इराकमध्ये अमेरिकन हवाई दलाचे KC-135 इंधन-भरणा करणारे विमान कोसळले. अमेरिकन लष्कराने या घटनेला दुजोरा दिलाय. या अपघातात विमानातील सर्व कर्मचारी मृत्युमुखी पडले असावेत, असा अंदाज वर्तवला जात आहे. या दुर्घटनेनंतर बचाव पथके सध्या त्या भागात शोधमोहीम राबवत आहेत.
इराणने हे विमान पाडल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा : गुरुवारी इराकमध्ये अमेरिकन हवाई दलाचे KC-135 टँकर विमान कोसळले. या घटनेबाबत सध्या अनिश्चिततेचे सावट पसरलंय. विशेषतः हे विमान केवळ एका अपघाताला बळी पडले की, इराणने ते पाडून टाकले, याविषयी संभ्रम निर्माण झालाय. काही प्रसारमाध्यमांच्या वृत्तांनुसार, इराणने हे विमान पाडल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा केलाय; तर दुसरीकडे अमेरिका मात्र हा दावा पूर्णपणे फेटाळून लावत असल्याचे दिसून येत आहे. काहीही असले तरी या विमान अपघातामुळे इराणविरोधातील अमेरिकेच्या मोहिमेला मोठा धक्का बसलाय. अमेरिकन हवाई दलाचे हे विमान केवळ अपघाताने कोसळले की, प्रत्यक्षात इराणी सैन्याने ते पाडून टाकले, याविषयी सध्या जोरदार चर्चा आणि तर्कवितर्क सुरू आहेत. विमानामध्ये पाच कर्मचारी (क्रू मेंबर्स) उपस्थित होते, असे या वृत्तांमध्ये नमूद करण्यात आले आहे.
एका विमानाला सुखरूप लँडिंग करण्यात यश : अमेरिकेला हा धक्का पश्चिम इराकमध्ये बसला. 'ऑपरेशन एपिक फ्युरी' या सांकेतिक नावाने सुरू असलेल्या एका लष्करी मोहिमेदरम्यान ही घटना घडली. अमेरिकेच्या 'सेंट्रल कमांड'ने दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेमध्ये दोन विमानांचा समावेश होता. त्यापैकी एका विमानाला सुखरूप लँडिंग करण्यात यश आले; मात्र, दुसरे विमान पश्चिम इराकमध्ये कोसळले. अमेरिकन लष्कराने या घटनेचे वर्णन "मोठे नुकसान" असे केले आहे. विशेषतः, ज्या 'ऑपरेशन एपिक फ्युरी'च्या अंतर्गत हे विमान उड्डाण करत होते, त्या मोहिमेचा संबंध प्रामुख्याने इराणवरील हल्ल्यांशी असल्याचे मानले जाते.
अमेरिकेसाठी हा एक मोठा धक्का : हे विमान अमेरिकन हवाई दलाचा कणा मानले जाते. हवेत असताना हे विमान इतर लढाऊ विमाने आणि बॉम्बवर्षक विमानांना हवेतच इंधन भरण्याची सुविधा पुरवते. ताशी ९०० किलोमीटरपर्यंतच्या वेगाने उड्डाण करण्यास सक्षम असलेले हे विमान, हजारो किलोग्राम इंधन वाहून नेऊ शकते. या क्षमतेमुळे लढाऊ विमानांना जमिनीवर न उतरता दूरवरच्या अंतरावरील लक्ष्यांवर हल्ले करणे शक्य होते.
विमानावर किती कर्मचारी असतात? : KC-135 हे विमान सामान्यतः किमान तीन कर्मचाऱ्यांच्या चमूसह (crew) कार्यरत असते. यामध्ये एक मुख्य वैमानिक, एक सह-वैमानिक आणि एक 'बूम ऑपरेटर' यांचा समावेश असतो. बूम ऑपरेटर ही ती व्यक्ती असते, जिच्यावर हवेतच इतर विमानांना इंधन भरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रणेचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी असते. प्रसारमाध्यमांच्या वृत्तांनुसार, विमान अपघातापूर्वीच्या 'फ्लाइट ट्रॅकिंग डेटा'मधून असे समोर आले की, उड्डाणादरम्यान KC-135 विमानाने 'आणीबाणी' जाहीर केली होती. त्यानंतर काहीच वेळात हे विमान कोसळले.