पुणे: पुण्यातून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका १९ वर्षीय नर्सिंग विद्यार्थीनीला तिच्या मैत्रिणींच्या मानसिक छळाला कंटाळून जीवन संपवलं. पायल किशोर राजगुरू असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे. ही घटना पुण्यातील चंदननगर परिसरात घडली. याप्रकरणी पायलच्या तीन मैत्रिणींविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळं पायलच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुसाईड नोटमध्ये काय?
पोलिसांना तपासादरम्यान मृत पायलकडे सुसाईड नोट मिळाली.पायलने तिचे रुममेट्स आणि मैत्रिणींवर गंभीर आरोप केल्याचं या सुसाईड नोटमध्ये म्हटलंय. तिच्या मैत्रिणी तिचा सतत मानसिक छळ करायच्या, असं पायलने सुसाईड नोटमध्ये लिहिल्याची माहिती आहे. मृत पायलने सुसाईड नोटमध्ये आरोप केले आहेत की, तिच्या मैत्रिणी खूप दिवसांपासून तिचा मानसिक छळ करायच्या. समाजात बदनामी केल्याचा आरोपही तिने केला आहे. तसच आई-वडिलांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप पायलने केला आहे.या धमक्या आणि मानसिक त्रासाला कंटाळून पायलने आयु्ष्य संपवण्याचं टोकाचं पाऊल उचललं.
पायलच्या तीन मैत्रिणींविरोधात गुन्हा दाखल चंदननगर पोलिसांनी सुसाईड नोट आणि कुटुंबियांच्या जबाबाच्या आधारावर कारवाई सुरु केली आहे. पोलिसांनी पायलच्या तीन मैत्रिणींविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.सबुरी संतोष काले, शिवानी शाम आजबले आणि दिपाली अशी आरोपी तरुणींची नावे आहेत.







