नवी मुंबई: नवी मुंबईतील वाशी खाडी पुलावरून चालत्या ट्रेनमधून एका तरुणीने पाण्यात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
सुदैवाने तिच्या खांद्यावर बॅग असल्यामुळे ती पाण्यावर तरंगत राहिली. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या वाशी गावातील मच्छीमार महेश सुतार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात ही घटना येताच त्यांनी जीवाची बाजी लावून संबंधित तरुणीला वाचवले.
तिला सुरक्षितपणे पाण्याबाहेर काढल्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. वाशी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून तरुणीची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार ती चेंबूर येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.
ही घटना आज सकाळी सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. कोणतेही कारण न देता आपल्या प्रियकराने ब्लॉक केल्यामुळे आपण हे पाऊल उचलल्याचे संबंधित तरुणीने सांगितले आहे.
या प्रकरणी पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे.







