मुंबई : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या इराण-इस्त्रायलच्या संघर्षाचा फटका आता भारताला बसत असल्याचं दिसून येतं आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एलपीजी सिलेंडरबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने घरगुती एलपीजी सिलेंडरच्या बुकिंगमधील अंतर २१ दिवसांवरून वाढवून २५ दिवस इतके केले आहे. त्यामुळे ग्राहकांना आता एक गॅस बुकिंग केल्यापासून २४ दिवसांनी दुसरा गॅस बुकिंग करता येणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, हा निर्णय गॅसचे ब्लॅक मार्केटिंग आणि साठेबाजी रोखण्यासाठी घेण्यात आला आहे. सरकारने मात्र सध्या देशात एलपीजी, पेट्रोल किंवा डिझेलची कमतरता नसल्याचे स्पष्ट केलं आहे.
आधी १५ दिवसांवरून २१ दिवस, आता २५ दिवस
पेट्रोलियम मंत्रालयाने काही दिवसांपूर्वीच एलपीजी सिलेंडर बुकिंगमधील अंतर १५ दिवसांवरून २१ दिवस केले होते. परंतु आता हा कालावधी आणखी वाढवून २५ दिवस करण्यात आला आहे. म्हणजेच ग्राहकांना दोन बुकिंगदरम्यान किमान २४ दिवसांचे अंतर ठेवावे लागणार आहे.
एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वीच घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 60 रुपयांची वाढ करण्यात आली. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) च्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये आता १४.२ किलोचा नॉन-सब्सिडी एलपीजी सिलेंडर ९१३ रुपयांना मिळत आहे. याआधी त्याची किंमत ८५३ रुपये होती. तर मुंबईमध्ये ही किंमत ९१२ रुपये इतकी आहे.
मोठ्या शहरांमधील एलपीजीचे दर
मुंबई: ९१२.५०
कोलकाता:९३९
चेन्नई: ९२८.५०
एलपीजी गॅसमधील ही नवीन दरवाढ ७ मार्चपासून लागू झाली आहे.
व्यावसायिक सिलेंडरही महाग
हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये वापरल्या जाणाऱ्या १९ किलोच्या कॉमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किमतीत ११४.५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये आता या सिलेंडरची किंमत १,८८३ रुपये झाली आहे. या वर्षात आतापर्यंत कॉमर्शियल एलपीजीच्या दरात ३०२.५० रुपयांची वाढ झाली आहे.







