मुंबई: आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन मत्स्य व्यवसाय विभागात डिजिटल क्रांती घडवण्याचा निर्णय मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी घेतला आहे. त्यानुसार, आता या विभागात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर आणखी वाढवला जाणार असून, त्याद्वारे मासेमारीचा डेटा आणि माहिती संकलित करून व्यवसायाला नवी दिशा दिली जाणार आहे.
या संदर्भात सोमवारी मंत्रालयात आयोजित विशेष बैठकीत 'मार्वल' कंपनीकडून प्रगत प्रणालीचे सादरीकरण करण्यात आले. राज्यातील मासेमारी क्षेत्रातील अचूक माहिती संकलित करणे, डेटाचे विश्लेषण करणे आणि त्याचा प्रभावी वापर करून मच्छिमारांना अधिक सक्षम करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यावेळी पदुमचे सचिव एन. रामास्वामी, मत्स्यव्यवसाय सहआयुक्त ऋता दीक्षित, मार्वल कंपनीचे संचालक साईकृष्णा बुडमगंटा आणि सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे (ऑनलाईन) यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मत्स्य व्यवसायासोबतच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दळणवळण सुविधांच्या आधुनिकीकरणावरही बैठकीत भर देण्यात आला. जिल्ह्यातील कणकवली आणि तळेरे या महत्त्वाच्या बसस्थानकांचा सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर विकास केला जाणार आहे. या प्रस्तावाबाबत पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली विस्तृत चर्चा झाली.
नव्या आराखड्यानुसार, ही बसस्थानके आधुनिक सुविधांनी सज्ज असतील. प्रवाशांसाठी अद्ययावत सोयी, परिसराचे सुयोग्य नियोजन आणि व्यावसायिक संधी लक्षात घेऊन ही उभारणी केली जाणार आहे. एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर, बांधकाम विभागाचे महाव्यवस्थापक दिनेश महाजन व अन्य अभियांत्रिकी अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत तांत्रिक बाजू मांडल्या. या निर्णयामुळे कोकणातील प्रवाशांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयीसुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.







