मुंबई: ‘एस आणि ‘टी' प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत चक्क पुन्हा एकदा उबाठाला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार साक्षी दळवी यांनी नाट्यमय विजय मिळवला आहे. या प्रभागात समसमान सदस्य संख्या असल्याने ईश्वर चिठ्ठीवर अध्यक्ष ठरला जाणे अपेक्षित होते, तिथे उबाठाच्या दोन उमेदवारांची मते स्वाक्षरी चुकीच्या ठिकाणी झाल्यामुळे अवैध ठरल्यामुळे भाजपच्या उमेदवार साक्षी दळवी यांचा १० मतांनी विजय झाला आहे.
एस आणि टी प्रभाग समितीमध्ये भाजप शिवसेना महायुतीचे १० सदस्य तर उबाठा, काँग्रेस आणि मनसेचे १० अशाप्रकारे समसमान सदस्य असल्यामुळे याठिकाणी अध्यक्षाची निवड ही ईश्वर चिठ्ठीवर होण्याची शक्यता होती. या प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी भाजपच्यावतीने साक्षी दळवी आणि उबाठाच्यावतीने सुरेश शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. सोमवारी झालेल्या प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये भाजपच्या साक्षी दळवी यांना दहा मते मिळाली तर उबाठाचे सुरेश शिंदे यांना ०८ मते मिळाली, तर निवडणुकीत उबाठाच्या दोन सदस्यांची मते अवैध ठरली गेली. या निवडणुकीत पिठासीन अधिकारी म्हणून उपमहापौर संजय घाडी यांनी काम पाहिजे.
या निवडणुकीत उबाठा, मनसे आणि काँग्रेसच्या दहा सदस्यांपैंकी दोन सदस्यांची मते अवैध ठरल्यामुळे विरोधी पक्षाकडून या अवैध मते कशी झाली याची माहिती मागण्याचा प्रयत्न केला. पंरतु महापालिकेच्या नियमानुसार मतदान हे गोपनीय असल्यामुळे ते दाखवता येत नाही तरीही विरोधी पक्षाकडून मागणी झाल्यानंतर पिठासीन अधिकारी संजय घाडी यांनी निवडणुकीत पारदर्शकता असल्यामुळे दाखवण्याचे निर्देश सचिव विभागाला दिले. यामध्ये स्वत: उमेदवार सुरेश शिंदे आणि दिपमाला बढे यांची स्वाक्षरी चुकल्यामुळे ती अवैध झाल्याचे दिसून आल्याचे बोलले जात आहे.
या निवडणुकीच्या वेळी स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे, उप आयुक्त (परिमंडळ ६) संतोषकुमार धोंडे, एस विभागाच्या सहायक आयुक्त समरीन सय्यद, टी विभागाच्या सहायक आयुक्त योगिता कोल्हे आणि महानगरपालिका सचिव मंजिरी देशपांडे यांनी अध्यक्षपदी निवड झालेल्या साक्षी दळवी यांना शुभेच्छा दिल्या.
एम पूर्व प्रभाग समिती अध्यक्षपदी एमआयएमच्या खैरनुसार अंसारी एस अँड टी प्रभाग समितीसह एल, एन, एम पूर्व आणि एम पश्चिम या प्रभाग समिती अध्यक्षपदासाठीही निवडणूक पार पडली. यातील एम पूर्व प्रभाग समिती वगळता उर्वरीत सर्व प्रभाग समितीमध्ये बिनविरोध निवडणूक प्रक्रिया पार पडून महायुतीचे उमेदवार अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. एम पूर्व प्रभाग समितीमध्ये एमआयएमचे ०८ सदस्य असून उबाठाचा एक याप्रकारे ०९ सदस्य आहेत. तर सत्ताधारी पक्षाचे ०७ सदस्य होते. या निवडणुकीत एआयएमआयएमच्यावतीने खैरनुसा अकबर हुसेन या उमेदवार होत्या, तर शिवसेनेच्यावतीने प्रज्ञा सदाफुले यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. या निवडणुकीत एआयएमआयएमच्यावतीने खैरनुसा हुसेन या ८ मते मिळवून निवडून आल्या. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या उमेदवार प्रज्ञा सदाफुले यांना ५ मते मिळाली. अध्यक्ष पद निवडणूक प्रसंगी, अर्ज मागे घेण्याच्या विहित वेळेत कोणीही अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत उबाठाचे विठ्ठल लोकरे हे तटस्थ राहिले तर शिवसेनेच्या एका नगरसेवकाचे मत अवैध ठरल्यामुळे सदाफुले यांना सहा मतांऐवजी केवळ ५ मतेच मिळाली. या निवडणुकीत अध्यक्षांची निवड झाल्यानंतर सह आयुक्त (परिमंडळ ५) देवीदास क्षीरसागर, सहायक आयुक्त उज्ज्वल इंगोले आदींनी पुष्पगुच्छ देत त्यांना शुभेच्छा दिल्या.
एल प्रभाग समिती अध्यक्षपदी शिवसेनेचे विजयेंद्र शिंदे ‘एल’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे विजयेंद्र शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे पिठासीन अधिकारी उपमहापौर संजय घाडी यांनी कामकाज पाहिले. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विजयेंद्र शिंदे यांचे सह आयुक्त (परिमंडळ ५) देवीदास क्षीरसागर, ‘एल’ विभागाचे सहायक आयुक्त धनाजी हेर्लेकर यांनी पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या.
एम पश्चिम प्रभाग समिती अध्यक्षपदी भाजपच्या आशा मराठे एम पश्चिम प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या आशा मराठे यांची बिनविरोध निवड झाली आहे. एकमेव अर्ज आल्याने आशा मराठे यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी म्हणून उपमहापौर संजय घाडी यांनी कामकाज पाहिले. या निवडणुकीत अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर, सहायक आयुक्त शंकर भोसले यांनी आशा मराठे यांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या.
एन प्रभाग समिती अध्यक्षपदी भाजपच्या अश्विनी मते ‘ एन’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्याअश्विनी मते यांची बिनविरोध निवड झाली आहे. एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने पिठासीनी अधिकारी महापौर रितू तावडे यांनी मराठे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर महापौर रितू तावडे, उप आयुक्त (परिमंडळ ६) संतोषकुमार धोंडे, एन विभागाचे सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे यांनी पुष्पगुच्छ देत त्यांना शुभेच्छा दिल्या.







