Monday, March 9, 2026

बोर्डाच्या परीक्षेसाठी AI चा वापर करून शिक्षकांनीच पुरवल्या कॉपी; तब्बल इतके शिक्षक निलंबित

बोर्डाच्या परीक्षेसाठी AI चा वापर करून शिक्षकांनीच पुरवल्या कॉपी; तब्बल इतके शिक्षक निलंबित

मुंबई : महाराष्ट्रात दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षेदरम्यान एआय तंत्रज्ञानाचा गैरवापर करून कॉपी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात सहभागी असल्याचे आढळल्यानंतर राज्यातील तब्बल ८१ शिक्षकांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा यांनी दिलेल्या माहितीनुसार, परीक्षेदरम्यान काही ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर करून उत्तरं मिळवली जात होती. यासाठी विशेषतः ChatGPT सारख्या साधनांचा वापर करून कॉपी केल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणात बीड जिल्ह्यात सर्वाधिक कारवाई करण्यात आली. बीडमधील चौसाळा परीक्षा केंद्रात अनेक शिक्षक यात सहभागी असल्याचे तपासात उघड झाले. काही ठिकाणी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी संगनमत केले होते. तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्तरं पुरवली जात होती.

मंडळाने केलेल्या प्राथमिक चौकशीनंतर संबंधित शिक्षकांना निलंबित करण्यात आले असून या प्रकरणात पुढील शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे. परीक्षेची पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी आणि तंत्रज्ञानाचा गैरवापर थांबवण्यासाठी मंडळाने ही कठोर कारवाई केल्याचे सांगितले आहे.

Comments
Add Comment