Monday, March 9, 2026

Rihanna : सुप्रसिद्ध गायिका रिहानाच्या घरावर गोळीबार, संशयित महिलेला अटक

Rihanna : सुप्रसिद्ध गायिका रिहानाच्या घरावर गोळीबार, संशयित महिलेला अटक

मनोरंजन जगतातील सुप्रसिद्ध गायिका रिहाना हिच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. एका महिलेने रिहानाच्या घराच्या दिशेने वारंवार गोळीबार केला. या घटनेत कुणीही जखमी झाले नसून गोळीबार करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

लॉस एंजेलिस पोलिस विभागाने याची पुष्टी करत सांगितले की, रविवारी ८ मार्च रोजी रिहानाच्या घराजवळ गोळीबाराची घटना घडली. या वेळी ५ ते ७ गोळ्या झाडण्यात आल्या. गोळ्या घराच्या गेटला लागल्या, मात्र घराच्या आत पोहोचल्या नाहीत. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. त्या वेळी घरात लोक उपस्थित होते. पोलिसांनी सांगितले की या प्रकरणात ३० वर्षाच्या एका महिलेला अटक करण्यात आली आहे.

हल्ल्यानंतर पोलिसांनी एका गाडीचा माग काढला. ही पांढऱ्या रंगाची टेस्ला कार होती. ती रिहानाच्या घराच्या जवळ एका ठिकाणी आढळून आली आणि त्या ठिकाणाहून संशयित महिलेला अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांनी अद्याप त्या महिलेची ओळख किंवा गोळीबारामागील हेतू जाहीर केलेला नाही. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.

माहितीनुसार ३८ वर्षांची रिहाना आपल्या पार्टनर रॅपर एएसएपी रॉकी आणि त्यांच्या तीन मुलांसोबत बेव्हर्ली हिल्स येथील घरात राहते. या प्रकरणावर रिहानाच्या प्रतिनिधींनी अद्याप सार्वजनिकरीत्या कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

रॉबिन रिहाना फेंटी ही जगातील सर्वात प्रभावशाली गायिका आणि उद्योजिका आहे. आपल्या संगीत कारकिर्दीव्यतिरिक्त तिने स्वतःच्या ब्रँडच्या माध्यमातून फॅशन, कॉस्मेटिक्स आणि ब्युटी क्षेत्रात मोठे जागतिक व्यवसाय साम्राज्य उभे केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा