नवी मुंबई : नवीन पनवेल येथे जीर्ण इमारतीच्या पुनर्विकास बैठकीला हिंसक वळण मिळाले. नवीन पनवेल सेक्टर १४ येथील अमृतवेल को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमध्ये पुनर्विकासाच्या विषयावर आयोजित सर्वसाधारण सभेत सोसायटीचे अध्यक्ष रवींद्र भगत आणि त्यांचा मुलगा अजिंक्य भगत यांनी बाहेरील तरुणांना बोलावून रहिवाशांना मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
बैठकीदरम्यान पुनर्विकासाच्या अटी तसेच प्रक्रियेवरून सभासद आणि व्यवस्थापन समिती यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर या वादाचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले.
या वादादरम्यान सोसायटीचे अध्यक्ष रवींद्र भगत यांचा मुलगा अजिंक्य भगत याने काही बाहेरील तरुणांना सोसायटीत बोलावले. या तरुणांनी बैठकीत घुसून उपस्थित रहिवाशांना बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या मारहाणीत सोसायटीतील दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.







