जर आपण थोडे मागे वळून पाहिले तर, वर्ष १९०० च्या सुरुवातीच्या काळात महिलांची स्थिती अतिशय बिकट होती. त्यावेळेस मोठ्या संख्येने महिला कारखाने आणि फॅक्टरीमध्ये काम करत असत, पण त्यांच्या कामाची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यांना कित्येक तास काम करावे लागत असे, पण मोबदल्यात वेतन खूप कमी मिळत होते. इतकेच नव्हे तर त्या काळात महिलांना मतदानाचा अधिकारही नव्हता. समाज आणि राजकारणात त्यांना फारसे महत्त्व दिले जात नसे.
न्यूयॉर्कमधील 'त्या' हजारो महिलांचे आंदोलन
अशा परिस्थितीत महिलांनी गप्प बसण्याऐवजी आपल्या हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्णय घेतला.१९०८ मध्ये अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात हजारो महिला वस्त्रोद्योग कामगार रस्त्यावर उतरल्या. त्यांनी उघडपणे आपल्या मागण्या मांडल्या. कामाचे तास कमी करावे, चांगले वेतन मिळावे, कामाची जागा सुरक्षित असावी आणि महिलांना मतदानाचा अधिकार मिळावा, अशा त्यांच्या मागण्या होत्या. महिलांच्या या जिद्दीने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. महिला आपल्या हक्कांसाठी उभ्या राहू शकतात आणि बदल घडवून आणू शकतात, असा संदेश त्यांच्या संघर्षाने दिला. याच आंदोलनाने पुढे जाऊन आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा पाया रचला.
क्लारा जेटकिन आणि महिला दिनाचा प्रस्ताव
यानंतर दोन वर्षांनी, म्हणजेच वर्ष १९१० मध्ये डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन येथे एक आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती. या परिषदेत जर्मनीच्या प्रसिद्ध समाजसेविका क्लारा जेटकिन यांनी एक महत्त्वाचा प्रस्ताव मांडला. जगभरातील महिलांसाठी एक खास दिवस असावा, ज्या दिवशी त्या एकत्रितपणे आपल्या हक्कांसाठी आणि समानतेसाठी मागणी करू शकतील, असे त्यांनी सुचवले. परिषदेत उपस्थित प्रतिनिधींनी क्लारा जेटकिन यांचा हा प्रस्ताव एकमताने मान्य केला. त्यानंतर वर्ष १९११ मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लंड या देशांमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी या आयोजनात १० लाखांहून अधिक लोकांनी सहभाग घेतला होता. जागोजागी रॅली काढल्या गेल्या, सभा झाल्या आणि महिलांच्या अधिकारांबाबत आवाज उठवला गेला.
रशियातील महिलांचे आंदोलन
काही वर्षांनंतर आणखी एक ऐतिहासिक घटना घडली. वर्ष १९१७ मध्ये रशियातील महिलांनी पहिल्या महायुद्धादरम्यान आपल्या मागण्यांसाठी (Bread and Peace) संप पुकारला. हे आंदोलन इतके प्रभावी ठरले होते की, त्याने रशियाच्या राजकारणात मोठा बदल घडवून आणला. या घटनेनंतरच ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून ओळखला जाऊ लागला.
संयुक्त राष्ट्रांची अधिकृत मान्यता आणि प्रगती
काळाप्रमाणे या दिवसाचे महत्त्व वाढत गेले. वर्ष १९७५ मध्ये संयुक्त राष्ट्रानेही (United Nations) अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हा दिवस जागतिक स्तरावर अधिक प्रसिद्ध झाला. दरवर्षी हा दिवस एका विशिष्ट थीमसह साजरा केला जाऊ लागला, जसे की लैंगिक समानता, महिलांचे नेतृत्व, महिलांवरील हिंसाचार संपुष्टात आणणे आणि मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे.
आजची स्थिती आणि समानतेची लढाई
आज आंतरराष्ट्रीय महिला दिन केवळ एक औपचारिक दिवस उरलेला नाही. जगातील अनेक देशांमध्ये या दिवशी महिलांच्या यशाचा गौरव केला जातो. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये कार्यक्रम होतात, जनजागृती मोहिम राबवल्या जातात, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात आणि अनेक ठिकाणी प्रेरणादायी महिलांचा सन्मान केला जातो.
आज महिलांनी शिक्षण, विज्ञान, क्रीडा, राजकारण किंवा अंतराळ, अशा प्रत्येक क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. पण असे असले तरी समानतेची लढाई अजून पूर्णपणे संपलेली नाही. आजही महिला सुरक्षा, शिक्षण आणि समानता यासारख्या गंभीर मुद्यांमध्ये मोठ्या बदलांची गरज आहे.