मनोगत; साक्षी माने
‘स्त्री’ हा शब्द उच्चारला की डोळ्यांसमोर उभी राहते ती, तिची अष्टपैलू रूपं आणि तिच्या अस्तित्वासाठी तिनं दिलेला प्रदीर्घ लढा. आज जग बदलतंय, संस्कृती बदलतेय. पुरुषप्रधान मानसिकतेकडून आपण समानतेच्या दिशेने वाटचाल करतोय. आजची स्त्री केवळ तिचं ‘स्वत्व’ जपण्याचा प्रयत्न करत नाहीये, तर अनेक वर्षांच्या बंधनांनंतर ‘बाईपणा’चा कुठे तरी मोकळा श्वास घेऊ पाहतेय. या काळात तिनं कशा स्वरूपात स्वतःला समाजात सामावून घेतलं आणि भविष्यात तिची काय भूमिका असेल? याविषयी घेतलेला हा वेध.
जग बदलतंय! पण त्याहूनही अधिक वेगाने बदलतंय ते मानवी दृष्टिकोनाचं क्षितिज. शतकानुशतके स्त्रीच्या भोवती आखलेली संकुचित विचारांची वर्तुळं आता धूसर होऊ लागलीये. हा बदल एका रात्रीत झालेला चमत्कार नाही, तर तो ‘ती’च्या अस्तित्वासाठी तीनच दिलेला एक प्रदीर्घ आणि जाणीवपूर्वक लढा आहे. या प्रवासाची वाट कालही सोपी नव्हती; ना आजही ती फुलांनी सजलेलीये. वाटेत आजही आव्हानांचे डोंगर उभे आहेत आणि बोचणारे काटेही. पण प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अशक्य गोष्टींनाही शक्य करण्याची किमया तिनं साधलीये. इथं मुद्दा ‘स्त्री महान की पुरुष’ अशा निरर्थक वादाचा किंवा स्पर्धेचा अजिबात नाही; तर मुद्दा आहे तो फक्त समानतेच्या अथांग आकाशात स्वतःच्या पंखांनी मुक्तपणे विहरताना तिच्यात घडत गेलेल्या परिवर्तनाचा! हा बदल केवळ तिच्या पेहरावात किंवा वागणुकीत झालेला नसून, तो तिच्या आत्मविश्वासात आणि वैचारिक बैठकीत झाला.”
आज प्रत्येक क्षेत्रात ‘ती’चा केवळ वावरच नाही, तर तिचा अधिकार आणि सन्मानही तितक्याच प्रकर्षाने उमटतोय. पिढ्यानपिढ्यांचा वारसा सोबत घेऊन आजची स्त्री खांद्याला खांदा लावून प्रगतीचं शिखर गाठतेय. कधीकाळी ‘डोक्यावरचा पदर’ हेच तिचं सर्वस्व मानलं जायचं, पण आज तो पदर सावरत, कोणासमोरही न डगमगता डोळ्यांत डोळे घालून आपली परखड मतं मांडू लागलीये.
चूल आणि मूल या मर्यादित विश्वाच्या सीमा ओलांडून ती आज जगाच्या व्यासपीठावर उभी आहे, पण हे करत असताना तिच्यातील ‘स्त्रीत्व’ आणि कर्तव्याची जाणीव तसूभरही कमी झालेली नाही. घरासाठी, आपल्या माणसांसाठी आणि समाजासाठी असणारी तिची निष्ठा आजही तितकीच अखंड आहे. स्वतःच्या आगळ्यावेगळ्या शैलीचा वापर करून काहीतरी वेगळं करून दाखवण्याची समज कदाचित सुरुवातीला नव्हती, पण एकदा का ही जाणीव तिच्या मनात रुजली, मग मात्र ती थांबली नाही. तिने केवळ थांबणं नाकारलंच नाही, तर नवनवीन क्षितिजं आजमावून पाहणं स्वीकारलं. तिच्या याच साहसातून आणि अनुभवातून, ‘मुलींनी उंबऱ्याच्या आतच राहावं’ हे जुनं समीकरण तिने कायमचं खोडून काढलं.
पूर्वीच्या आणि आजच्या स्त्रीच्या जगात जमीन-अस्मानाचा फरक पडला असला, तरी एक गोष्ट आजही काळाच्या प्रवाहात स्थिर आहे, ती म्हणजे तिचं ‘भावनिक विश्व’. पूर्वीची स्त्री भावनांच्या ओझ्याखाली स्वतःला हरवून घेणं किंवा हार मानणं स्वीकारत होती; पण आजची स्त्री त्याच भावनांना व्यक्त करण्याच्या नव्या वाटा शोधू लागलीये.
आज समाजात घटस्फोटांचं वाढतं प्रमाण, लग्नानंतरचे बाह्य संबंध, स्त्रियांच्या ठाम आणि प्रसंगी कठोर भूमिका किंवा अगदी सहजपणे वाढलेली व्यसनाधीनता यांसारख्या गोष्टी सर्रास दिसू लागल्यात. हे सारं पाहून काहींच्या भुवया उंचावतात, पण त्यामागे तिची निवड, तिचं कुतूहल किंवा कदाचित तिची गरजही असू शकते. खरं तर माणसाने व्यक्त व्हावं असं आपण मानतो, पण स्त्रीच्या बाबतीत ही अभिव्यक्ती जेव्हा पारंपरिक चौकटी मोडते, तेव्हा समाज चक्रावून जातो. तिच्या हातातली सिगारेट किंवा तिच्यासोबत असणारा प्रियकर, मित्र आजही आश्चर्याचा धक्का देतो. इथे कोणत्याही व्यसनाचं, प्रेम संबंधांचं समर्थन करण्याचा उद्देश नाही, कारण तो पूर्णतः वैयक्तिक निवडीचा भाग आहे; पण प्रश्न आहे तो तिच्या कोंडलेल्या भावनिक विश्वाचा.
पूर्वी या भावना मांडण्यावर सामाजिक दबावाचं ‘दडपण’ असायचं, पण काळ बदलला आणि भावना व्यक्त करण्याचं माध्यमही! आपल्या आनंदासाठी किंवा जगण्याच्या संघर्षातून मार्ग काढण्यासाठी एखादा रस्ता निवडण्याचा हक्क हा वैयक्तिक आहे. आजची स्त्री हा हक्क केवळ ओळखत नाही, तर तो निर्भीडपणे स्वीकारतानाही दिसतेय. हा बदल कदाचित अनेकांसाठी स्वीकारणं कठीण असेल, पण तिच्या बदलत्या मानसिकतेचा आणि अस्तित्वाच्या संघर्षाचा हा एक अपरिहार्य पैलू आहे.
“हे सारं घडतंय, बदलाचे वारे वाहतायत आणि जाचक अटींची कोडीही हळूहळू सुटतायत; पण एक प्रश्न आजही अनुत्तरित आहे, तो म्हणजे - स्त्रियांच्या सुरक्षेचा तिढा! पिढ्या बदलल्या, जग आधुनिक झालं, पण ज्या ‘सुरक्षेच्या कवचाची’ तिला आस होती ती आस आजही अधांतरीच आहे. अजूनही गर्दीतल्या त्या ‘वाईट नजरा’ तिला बोचत राहतात आणि रस्त्यावरून चालताना घड्याळाचे काटे तिला वेळेच्या मर्यादेची भीतिदायक जाणीव करून देत राहतात. कधीकधी निवडलेल्या क्षेत्रातील काही अटी तिच्या स्वप्नांची पायमल्ली करतात. पण सर्वात मोठं दुर्दैव हे की, या प्रगत शतकातही ‘मुलगी जन्माला नको’ म्हणून केवळ पुरुषच नाही, तर घरातील स्त्रियाही देवाकडे साकडं घालतात. इथे प्रश्न उभा राहतो, ‘स्त्रीच स्त्रीची शत्रू आहे का?’... पण सखोल विचार केला तर लक्षात येतं की, हे शत्रुत्व नसून आपल्या पोटच्या मुलीला या असुरक्षित जगाच्या वेदनांपासून वाचवण्याची ती एक केविलवाणी धडपड आहे.
ज्या दिवशी आपल्या घरातील प्रत्येक ‘ती’ समाजातल्या या विकृत प्रवृत्तींवर मात देऊन विजयाची गुढी उभी करेल, त्याच दिवशी खऱ्या अर्थानं स्त्री-भ्रूणहत्या आणि असुरक्षिततेचा अंधार कायमचा नाहीसा होईल. जन्माला येणाऱ्या प्रत्येक कळीला आता मुक्तपणे फुलायचंय अन् फुलपाखराला गगनभरारी घ्यायचीय... गरज आहे ती या मार्गातील अडथळा न होता, तिचं ‘सारथी’ बनण्याची! मात्र या सर्व स्थित्यंतरांच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण भविष्यातील स्त्रीकडे पाहतो, तेव्हा एक आश्वासक चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं. भविष्यातली स्त्री ही केवळ ‘पुरुषांच्या बरोबरीने’ चालणारी नसेल, तर ती स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वाचा सूर्य असेल. येणाऱ्या काळात ती स्वतःच्या आवडी-निवडी, निर्णय आणि चुकांची जबाबदारी घेण्यास पूर्णपणे सक्षम असेल.
या बदलांमुळे तिच्या आयुष्यात एक मोठी सकारात्मकता येणार, ती म्हणजे ‘मानसिक स्वातंत्र्य’. स्वतःला सिद्ध करण्याच्या दडपणाखाली न वावरता, ती स्वतःच्या आनंदाला प्राधान्य द्यायला शिकेल. उद्याच्या समाजात ‘ती’ केवळ एक सून, मुलगी किंवा पत्नी या नात्यांच्या पलीकडे जाऊन एक प्रगल्भ ‘माणूस’ म्हणून तिची ओळख असेल. तिच्या या भावनिक प्रगल्भतेतून आणि अनुभवातून एक असा समाज घडेल, जिथे संवाद मोकळा असेल आणि प्रत्येक व्यक्तीला - मग ती स्त्री असो वा पुरुष - स्वतःच्या अटींवर जगण्याचं स्वातंत्र्य मिळेल. स्त्रीच्या या बदलत्या प्रवासाचा हा ‘वेध’ म्हणजे केवळ तिच्या संघर्षाची गाथा नाही, तर तो एका नव्या युगाच्या पहाटेची आशा आहे. ‘ती’ बदलली आहे, ‘ती’ बदलत आहे आणि हीच बदलाची लाट उद्याच्या सुंदर जगाची पायाभरणी करण्यात मोलाचा वाटा ठरेल यात शंकाच नाही.







