निरीक्षण; डॉ. गौरी कानिटकर
महात्मा फुले, आगरकर प्रभुतींनी मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले. मुलगी शिकली की घर शिकते, घराला शिस्त लागते हा विचार त्यामागे होता. पण आता मुली शिकल्यामुळेच लग्नव्यवस्थेत समस्या निर्माण झाल्या, असा सूर अनेकदा पाहायला मिळतो. तो योग्य नाही. मुलींना आणि स्त्रियांना सन्मानाने वागवल्यास यातील काही समस्यांचे निराकरण होऊ शकेल. महिला दिनाच्या निमित्ताने घेतलेला वेध.
गेल्या काही वर्षांमध्ये लग्नव्यवस्थेमध्ये मोठे बदल घडून येत आहेत. मुला-मुलींचे लग्नाचे वाढलेले वय, एकमेकांकडून वाढलेल्या अपेक्षा, जबाबदाऱ्या घेण्यात टाळाटाळ अशा अनेक आघाड्यांवर हे बदल पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर विवाहबाह्य संबंधांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यातून या संबंधांना अडसर ठरणाऱ्या नवऱ्याची किंवा बायकोची हत्या केल्याची अगदी टोकाची प्रकरणेही घडताना दिसत आहेत. हल्लीच्या पिढीच्या विचारांमध्ये स्पष्टता नसल्याचे हे परिणाम आहेत, असे वाटते.
एका बाजूला आपल्याला आधुनिक व्हायचे आहे, म्हणजे लिव्ह इन रिलेशन्स, काँट्रॅक्ट मॅरेज, वन नाईट स्टँड किंवा ओपन मॅरेज या सोयी आपल्याला हव्या आहेत. त्याच वेळी आपल्या मनात प्रामाणिकपणाच्या काही पारंपरिक कल्पनाही आहेत. या दोन्हींची सांगड घालताना नवीन पिढीची दमछाक होते. मग त्यातून टोकाची पावले उचलली जातात. या सगळ्यांमागील कारणे सध्याच्या सामाजिक परिस्थितीमध्ये शोधता येतील. सध्या एकूणच सगळीकडे अस्थिर वातावरण आहे. तरुणांमध्ये व्यसनांचे प्रमाण वाढले आहे. जागतिक पातळीवरही सगळीकडे अस्थिरता आहे. कोणत्या क्षणी नोकरी जाईल, याची शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळे या पिढीच्या मनात असुरक्षितता आहे. मग त्यातून निर्माण होणारी नाती घट्ट करण्यासाठी लागणारी पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा कुठे तरी हरवलेला दिसतो. आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे आत्मविश्वासाचा अभाव. म्हणजे मला हे नाते निभावून नेता येईल का, अशी शंका सतत मनामध्ये असते. हे मला जमेलच किंवा वेळ येईल तेव्हा सांभाळून घेता येईल, असे आजची मुले किंवा पालकही म्हणताना दिसत नाहीत. या सगळ्यांचा हा एकत्रित परिणाम आहे.
मुलींना किंवा एकूणच स्त्रियांना सन्मान हवा आहे. पूर्वीच्या काळापासून आतापर्यंत स्त्रियांना ‘तुला काय कळतंय, तू तुझं चूल आणि मूलच बघ’ असेच ऐकायला मिळत आले आहे. आज याचे प्रमाण नक्कीच कमी झाले आहे; परंतु अजूनही लोकांच्या मनातला पुरुषी अहंकार गेलेला नाही. एखाद्या स्त्रीने एकटीने एखादा निर्णय घेतला, तर ‘मला का सांगितले नाही’असे सर्रास विचारले जाते. ती आता स्वत:च्या जीवावर सगळ्या गोष्टी सांभाळू शकते, याचे जणू काही पुरुषांना वाईट वाटते.
पण शिक्षणामुळे आजच्या स्त्रीला स्वत:ची मते असतात, ती वर्तमानपत्र वाचते, तिला जगात घडणाऱ्या घटनांची माहिती असते. अशा वेळी तिला तुझी अक्कल चुलीपुरतीच मर्यादित आहे, असे म्हटलेले आवडत नाही. त्यामुळे या काळात स्त्रिया शिकल्या आणि घराबाहेर पडल्या म्हणून या समस्या निर्माण झाल्या, असे म्हणणे चूक आहे. महात्मा फुले, आगरकर या मंडळींनी मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले. त्यामागे मुलगी शिकली की घर शिकते, घराला शिस्त लागते, हा विचार होता. पण आता तो विचार कोणी करत नाही. मुली शिकल्या म्हणूनच हे घडत आहे, असाच सूर सगळीकडे पाहायला मिळतो. हे योग्य नाही.
मुलींना सन्मान हवा आहे म्हणजे स्वत:चे मत आहे, हे मान्य करायला हवे, घरातल्या, बाहेरच्या, ऑफिसमधल्या प्रत्येक निर्णयप्रक्रियेत आपल्याला विचारात घ्यायला हवे, असे तिला वाटते. आज स्त्री घराबाहेर पडून काम करते तेव्हा पुरुषांना मैत्रीण मिळते तसेच तिलाही मित्र मिळू शकतात, हे लक्षात घ्यायला हवे. अशा वेळी घरातले नाते पक्के नसेल तर गैरसमज निर्माण होऊ शकतात. आपल्याला समजून घ्यायला हवे, अशी तिची अपेक्षा असते. ‘गेल्या शंभर वर्षांतले मराठी नाटक आणि विवाहाची बदलती मानसिकता’ या माझ्या शोधनिबंधात हेच मांडले आहे. १९७१ मध्ये आलेल्या ‘नटसम्राट’ या नाटकातले आप्पासाहेब बेलवलकर म्हणतात, की मी कुठेही मुशाफिरी केली तरी शेवटी मी बंदराकडेच येणार!’
यात मला मुशाफिरी करण्याची मुभा आहे आणि तू माझा स्वीकार करणारच आहेस, हे गृहीत धरलेले दिसते. आता ही मुशाफिरी मुलींना करावीशी वाटते. त्याही परदेशी जातात, कंपनीच्या कामासाठी बाहेर चार ठिकाणी हिंडत असतात आणि अशावेळी काही घडले तर तिच्या घरच्यांनी तिचा स्वीकार करायला हवा, असे तिलाही वाटते. सामंजस्य किंवा एकमेकांना समजून घेणे यावर नात्याचा डोलारा उभा असतो. मात्र हेच कुठे तरी हरवले आहे असे मला वाटते.
गेल्या काही वर्षांमध्ये विवाहाचे वय बरेच वाढलेले दिसते. त्यामागे अनेक कारणे आहेत. तीस-चाळीस वर्षांपूर्वीपर्यंत चांगली नोकरी मिळवण्यासाठी एक पदवी पुरेशी होती. पदवीधारक झाल्यानंतर अनेक सरकारी नोकऱ्या उपलब्ध होत्या. आता एक पदवी मिळाली म्हणून नोकरी मिळत नाही. तरुणांना चांगले पैसे मिळवून देणारी पदव्युत्तर पदवी घ्यावी लागते. त्यामुळे ‘ऑफबिट’करिअर करण्याची मुभा त्यांना नसते, कारण घर सांभाळण्याची आर्थिक जबाबदारी आजही मुलांवरच आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे मिळालेल्या नोकरीवर मुले समाधानी असतात असे नाही. मग प्रमोशन, पगारवाढ, नोकरी बदलणे असे मार्गक्रमण करत वय २८-२९ च्या पुढे निघून जाते. ही झाली सामाजिक कारणे. याबरोबरच लग्नाचे वय वाढण्याची मानसिक कारणेही आहेत. आजचा तरुण ‘मी अजून लग्नासाठी मानसिकदृष्ट्या तयार नाही, मी सेटल झाल्यावर लग्न करेन’,असा विचार करतो. सेटलमेंट नेहमी आर्थिक बाबींशी निगडित असते. मात्र मानसिकदृष्ट्या आपण सेटल झालो आहोत का, हा विचार फार कमी लोक करतात.
दुसरी बाब म्हणजे मुलाने स्वत:चे घर घ्यावे, अशी सर्वांचीच अपेक्षा असते. वयाच्या २८ व्या वर्षी हे शक्य होत नाही. बहुतांशी मुलींना स्वतंत्र राहण्याची इच्छा असते. स्वतंत्र राहायचे असेल तर घराचा हप्ता दोघे मिळून भरू, असे मुलाला वाटते. त्यासाठी मुलींची तयारी नसते. मी नोकरी करेन, नाही तर सोडीन अशी तिची भूमिका असते किंवा करिअर सुरू ठेवण्यासाठी मला सगळ्यांचा पाठिंबा मिळायलाच हवा, असे तिचे मत असते. तुझे पैसे आणि माझे पैसे वेगळे, असेच तिचे म्हणणे असते. आजकाल अनेक दांपत्यांचे आर्थिक व्यवहारही वेगळे असतात. पूर्वी ते ‘आपले पैसे’ असत आणि ते कायमच जास्त असत. त्याच वेळी घरातली कामे करण्याबाबत मात्र समानता दिसते.
लग्न करेपर्यंत स्वत:ची एक जीवनशैली ठरून गेलेली असते. दिवसभर काम करून घरी आल्यावर आई-वडील सगळे करतात. त्यामुळे घरी काम करण्याची सवय नसते. त्यामुळे कंफर्ट झोन तयार होतो. मग मी कोणाला तरी उत्तर देणे लागतो, कोणाला तरी माझ्या आयुष्यात सामावून घ्यावे लागणार, याची भीती वाटायला लागते. मग लग्नच नकोसे वाटते. अशात वय ३२-३३ च्या पुढे जाऊ लागते. कुठे तरी एकटेपणाची जाणीव होते, मित्र-मैत्रिणींची लग्ने झालेली असतात. ते एकत्र जमल्यानंतर गप्पांचे विषय बदलतात. त्यामुळे एकटेपणा जाणवू लागतो. अशा कारणांमधून लग्नाची अपरिहार्यता निर्माण व्हायला नको.
मला सोबत हवी आहे, हे मनातून वाटायला हवे. यात पालकांचीही भूमिका महत्त्वाची आहे. आता बहुतांश ठिकाणी न्युक्लियर फॅमिली असते. त्यामुळे घरांमध्ये भांडणांचे प्रमाण वाढले आहे. ही भांडणे मुलांसमोर होतात. मग भांडायचेच असेल तर लग्न कशाला करायचे, अशी मुलांची मानसिकता तयार होते. वस्तुत: आई-वडिलांकडून लग्नामुळे मानसिक आणि सामाजिक संरक्षण मिळते, असा चांगला मेसेज मुलांपर्यंत पोहोचायला हवा.
या वयात लग्न झाल्यावर मुलांच्या अपेक्षा रिजिड होतात. इतर वेळी आधुनिकता आवडत असताना मला माझ्यापेक्षा वयाने मोठा, उंच, जास्त शिकलेला, जास्त पगार असलेला मुलगा हवा, या पारंपरिक अपेक्षा ठेवल्या जातात. यात आपल्याला नेमके काय हवे, हे आपण स्वत:च ठरवायला हवे. लांबून दिसणाऱ्या गोष्टी आकर्षक दिसू शकतात, पण लग्न झाल्यावर त्या गोष्टींसाठी द्यावा लागणारा वेळ हीदेखील अडचण होऊन बसते. त्यामुळे वरवरच्या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्याला या व्यक्तीबरोबर मोठा काळ व्यतीत करायचा आहे, हे ठरवले आणि मनाची तशी तयारी असेल तर ही प्रक्रिया आनंददायी होऊ शकते. माणूस उलगडणे हा एक सुंदर प्रवास आहे. तो सर्वांनीच अनुभवायला हवा. महिला दिनाच्या निमित्ताने एक सांगावेसे वाटते, महिलांकडे खूप क्षमता आहे. स्वातंत्र्याच्या नावाखाली त्या क्षमता विसरायला नकोत-. त्यात तरबेज राहायला हवे. त्या वापरल्या नाहीत तर नष्ट होतील, हे वैज्ञानिक सत्य आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे.







