Sunday, March 8, 2026

T20 वर्ल्डकप फायनलसाठी कशी असेल अहमदाबादची खेळपट्टी ? कसे असेल हवामान आणि कोण कोणत्या खेळाडूंना मिळेल खेळण्याची संधी ?

T20 वर्ल्डकप फायनलसाठी कशी असेल अहमदाबादची खेळपट्टी ? कसे असेल हवामान आणि कोण कोणत्या खेळाडूंना मिळेल खेळण्याची संधी ?

अहमदाबाद : क्रिकेटप्रेमींसाठी ८ मार्चचा रविवार म्हणजे पर्वणी आहे. कारण आज भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकपची फायनल अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम येथे होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा महामुकाबला स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या टीव्ही चॅनलवर तसेच जिओच्या हॉटस्टार अॅपवर लाईव्ह बघता येईल. गतविजेता भारत सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा विश्वविजेता होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तर न्यूझीलंड पहिल्यांदाच व्हाईट-बॉल फॉरमॅटमध्ये विश्वविजेतेपद जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यामुळे चुरशीचा सामना होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊ सामन्यासाठी कशी असेल खेळपट्टी आणि कसे असेल हवामान ? तसेच भारत आणि न्यूझीलंडकडून कोण कोण खेळेल याबाबतचे अंदाज पण जाणून घेऊ.

भारत आणि न्यूझीलंड सलग दुसऱ्यांदा व्हाईट-बॉल फायनलमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. याआधी २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने दुबईमध्ये न्यूझीलंडला हरवून विजेतेपद पटकावले. आता नवा इतिहास रचण्यासाठी भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात अहमदाबादच्या मैदानावर उतरणार आहे. आजपर्यंत कोणत्याही यजमान संघाने आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप जिंकलेला नाही. यामुळे भारत नवा इतिहास रचणार का याकडे अनेकांचे लक्ष आहे. दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचलेल्या न्यूझीलंडचा प्रयत्न पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकण्याचा आहे.

अहमदाबादचे नरेंद्र मोदी मैदान हे क्रिकेटसाठीचे जगातले सर्वात मोठे स्टेडियम आहे. या मैदानावर भारताचे नेतृत्व सूर्यकुमार यादव आणि न्यूझीलंडचे नेतृत्व मिशेल सँटनर करणार आहे.

भारत आणि न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत एकूण ३० टी ट्वेंटी सामने झाले. यातील १८ भारताने आणि ११ न्यूझीलंडने जिंकले. यंदाच्या टी ट्वेंटी वर्ल्डकपआधी दोन्ही संघांनी भारतात पाच सामन्यांची मालिका खेळली होती. यात भारताने ४-१ असा विजय मिळवला होता. भारतीय भूमीवर दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या १८ पैकी ११ सामन्यांत भारताचा आणि ७ सामन्यात न्यूझीलंडचा विजय झाला आहे. टी ट्वेंटी वर्ल्डकपची आकडेवारी एकदम वेगळी आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी ट्वेंटी वर्ल्डकप दरम्यान आतापर्यंत तीन वेळा लढत झाली आणि हे सर्व सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत.

कशी आहे अहमदाबादची खेळपट्टी ?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना अहमदाबादच्या ज्या खेळपट्टीवर खेळला जाईल ती लाल आणि काळ्या मातीच्या मिश्रणाचा वापर करून तयार केली आहे. मागच्या वर्षी आयपीएल फायनल याच खेळपट्टी झाली होती. या खेळपट्टीवर खेळलेल्या आठपैकी पाच सामन्यांमध्ये पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. आयपीएल २०२५ च्या फायनलमध्ये आरसीबीने २० षटकांत ९ बाद १९० धावा केल्या आणि पंजाबने धावांचा पाठलाग करताना २० षटकांत ७ बाद १८४ धावा केल्या. यामुळे आरसीबीचा ६ धावांनी विजय झाला.

भारतीय संघ सुपर एट फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात मोदी स्टेडियमवर हरला होता. तेव्हा भारताला १८८ धावा करणे जमले नव्हते. तसेच २०२३ च्या वन डे वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताचा पराभव झाला होता. पण या दोन्ही सामन्यांसाठी खेळपट्टी पूर्ण काळ्या मातीचा वापर करून तयार केली होती. याउलट फायनलसाठी खेळपट्टी ही लाल आणि काळ्या मातीच्या मिश्रणाचा वापर करून तयार केली आहे. फायनलसाठी तयार केलेली खेळपट्टी ही धावांचा पाऊस पाडण्यासाठी उत्तम असल्याचे तज्ज्ञ सांगतात. यामुळे रविवारी नाणेफेक जिंकणारा संघ गोलंदाजीचा पर्याय निवडण्याची शक्यता जास्त आहे.

रविवारी कसे असेल अहमदाबादचे हवामान ?

रविवार ८ मार्च २०२६ रोजी अहमदाबादमधील हवामान खूप उष्ण असेल. कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस असेल. संध्याकाळी मॅचच्या वेळेत कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस असेल. रात्र होऊ लागल्यावर आर्द्रता वाढू लागेल आणि रात्री ११ वाजता आर्द्रतेचे प्रमाण २७ टक्के एवढे असेल.

आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप फायनलसाठी संभाव्य संघ

संभाव्य भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग.

संभाव्य न्यूझीलंड संघ : मिशेल सँटनर (कर्णधार), फिन अॅलन, टिम सेफर्ट, रचिन रवींद्र, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, कोल मॅककॉन्ची, काइल जेमीसन, जेकब डफी, डेव्हॉन कॉनवे, जिमी नीशम, ईश सोधी.

Comments
Add Comment