महाभारतातील मोतीकण; भालचंद्र ठोंबरे
श्रीमद्भागवत पुराण व विष्णुपुराणानुसार एकदा मनूला शिंका आली, त्यातून एक मुलगा जन्माला त्याचे नाव ईश्वांकू. ईश्वांकूला शंभर पुत्र होते. त्यापैकी विकुक्षी, निमी व दंड हे ज्येष्ठ होते.
ईश्वांकूच्या मृत्यूनंतर विकुक्षी राजा झाला. त्याला पुरंजय नावाचा पुत्र होता. तो अतिशय पराक्रमी होता. सत्य युगाच्या शेवटी असुर व देवामध्ये झालेल्या युद्धात देवांचा पराभव झाला. तेव्हा देव विष्णूंकडे गेले व त्यांची प्रार्थना केली. विष्णूने त्यांना पुरंजयच्या नेतृत्वात युद्धाची तयारी करण्यास सांगितले व मी पुरंजयच्या शरीरात प्रवेश करून असुरांचा नायनाट करीन असे वचन दिले. देवांनी त्याप्रमाणे पुरंजयाला विनंती केली असता त्याने ती मान्य केली, मात्र आपण इंद्राच्या खांद्यावर बसून युद्ध करू असे सांगितले. इंद्राने ते मान्य केले. इंद्राने बैलाचे रूप घेतले. पूरंजयने त्यावर आरूढ होऊन असुरांचा पराभव केला. तेव्हापासून पुरंजय ककूत्स्थ म्हणजे खांद्यावर बसणारा या नावाने प्रसिद्ध झाला. कारण कुकुद म्हणजे खांदा म्हणून ककूत्स्थ म्हणजे खांद्यावर बसणारा तसेच इंद्राला वाहन बनविल्यामुळे “ इंद्रवाह’’ म्हणूनही ओळखला जाऊ लागला.
याच वंशात पुढे युवनाश्व नावाचा राजा झाला. त्याला संतान नव्हते म्हणून त्याने एका यज्ञाचे अनुष्ठान करविले. ऋषींनी आश्रमात युवनाश्वच्या उपस्थितीत इंद्रदेवतेचा यज्ञ केला. अनुष्ठान व यज्ञाची सांगता झाल्यावर ऋषींनी मंत्रवलेले तीर्थ त्याच्या पत्नीला देण्यासाठी एका कलशात भरून ठेवले. रात्रीच्या वेळी राजाला तहान लागली. ऋषीमुनींना उठवण्याचा त्रास देण्याऐवजी राजा स्वतःच पाणी शोधू लागला. त्याला कलशात असलेले पाणी (तीर्थ) दिसले. त्याने ते प्राशन केले. सकाळ झाल्यावर कलश रिकामा दिसल्याने ऋषींनी चौकशी केली असता त्यांना सत्य घटना कळली; परंतु आता वेळ निघून गेली होती.
युवनाश्वाचे पोटात गर्भ वाढू लागला व पूर्ण दिवस झाल्यानंतर तो राजाची कूस फाडून बाहेर आला; परंतु ऋषी व देवाच्या कृपेने राजा जिवंत राहिला व त्याने तेथेच राहून तपश्चर्या करून मुक्ती मिळविली. मुलगा झाल्याबरोबर दुधासाठी रडू लागला. ते पाहून ऋषींनी आता हा कोणाचे दूध पिणार? असे म्हटले तेव्हा इंद्र म्हणाला “मां धाता’’ म्हणजे माझे पिणार असे म्हणून इंद्राने आपली तर्जनी त्याचे तोंडात दिली. ती चाखताच तो एकाच दिवसात वाढ होऊन पूर्ण पुरुष बनला व पुढे मान्धाता या नावाने प्रसिद्ध झाला. मान्धाताचा विवाह बिंदुमती नावाच्या स्त्रीशी झाला. त्याला पुरुकुस्त अंबरीश व मुचकुंद नावाची तीन मुले व पन्नास कन्या होत्या.
त्याच काळात सौरभी नावाच्या ऋषींनी एकदा बारा वर्षे पाण्यात राहून तपश्चर्या केली. त्याच पाण्यात एक विशाल मासा आपल्या परिवारासह राहत होता. त्या माशाच्या पुत्र, कन्या, नातवंडे व पणतू यांच्या क्रीडा पाहून सौभरी तपश्चर्या सोडून त्यांच्या क्रिया पाहत असे. त्यामुळे त्याच्या मनातही प्रपंचाविषयी आसक्ती निर्माण झाली. ते राजा मान्धताकडे आले व आपल्याला गृहस्थाश्रमात जाण्याची इच्छा असल्याने व तुझ्या वंशातील पुरुष आणि म्हणून विख्यात असल्याचे सांगून आपल्या एका कन्येचा विवाह आपल्याशी लावून देण्याची विनंती केली.
सततच्या तपश्चर्येमुळे सौभरीचे शरीर कृश झाले होते. सौभरीची विनंती ऐकून राजा विचारात पडला. अखेर त्याने सौभरीला सांगितले की, जी मुलगी आपल्याशी लग्न करण्याची ईच्छा व्यक्त करेल तिचे मी आपणा सोबत लग्न लावून देईन. राजाला वाटले यांचे कृषी शरीर पाहून कोणीही तयार होणार नाही. राजाचा हा विचार ओळखून ऋषींनी सेवकासोबत अंत:पुरात प्रवेश करताना अतिसुंदर स्वरूप धारण केले. त्यामुळे सर्वच मुलींना ते रूप आवडले व सर्वच मुली त्यांच्याशी लग्नाला तयार झाल्या तेव्हा राजाने त्या सर्वांचा विवाह थाटात लावून दिला. ऋषींनी विश्वकर्माकडून ५० सुसज्ज महाल बनवून घेतले व त्यांच्यासोबत सुखाने राहू लागला. एक दिवस राजा त्यांच्या भेटीला आला व त्या सर्वांना सुखात पाहून आनंदित झाला.
सौभरी ऋषीला दीडशे पुत्र झाले. ते आपल्या संसारात व नातवंडांसह रममाण झाले; परंतु एक दिवस त्यांना अचानक उपरती झाली व विरक्ती आली. आपण एका माशाच्या संसाराकडे पाहून तपश्चर्या सोडून प्रपंचाकडे आकृष्ट झालो, याचा त्यांना पश्चाताप झाला. त्यामुळे त्यांनी सर्व कारभार मुलांकडे सोपवून आपल्या पत्नीसह वानप्रस्थान केले व त्या ठिकाणी तपश्चर्या करून स्वतःला परमार्थात लीन करून घेतले. पतीच्या प्रभावाने त्यांच्या पत्नीही त्याच्यामध्ये लीन झाल्या.







