स्पंदन; अश्विनी शिंदे - भोईर
आजूबाजूला घडणाऱ्या असंख्य घटनांची अनेक स्पंदनं मनात उमटत असतात. एखादं दृश्य नजरेच्या टप्प्यात येतं, मेंदूपर्यंत पोहोचतं यावर काहीतरी प्रतिक्रिया मनात उमटत असते न असते तोपर्यंत दुसरंच काहीतरी येऊन मनावर आदळतं. जे मनाला सुखावणारं आहे, दुखावणारं आहे, ते पचवण्याइतकी देखील फुरसत मिळत नसते.
आजूबाजूच्या धावत्या-पळत्या जगाबरोबर खरं तर प्रत्येकाचीच ही रस्सीखेच सुरू असते, इतका वेग आज काळाने पकडला आहे. लहानपणी मी आणि माझा भाऊ आजोळी माझ्या मामाघरी विरारला यायचो. आम्ही राहायला मुंबईत होतो, पण तेव्हाची मुंबई इतकी पळणारी नव्हती... थोडी संथ, लय तेव्हा मुंबईतल्या जीवनातही होती. छान शेजारपाजारी येणं-जाणं असायचं, निवांतपणे गप्पा व्हायच्या, सुट्टीच्या दिवशी पाहुण्यांचे येणं-जाणं असायचं... असो. पण मी सांगत होते विरारच्या मामाघरची आठवण. तेव्हाचं विरार तर मुंबईपेक्षाही खूप शांत आणि संथ होतं. आजूबाजूला फुलांच्या, भाज्यांच्या वाड्या दिसायच्या... उन्हाळ्याच्या दिवसात मिळणारा रानमेवा... ही तर आमच्यासाठी धमालच असायची... पण आम्हाला खरी गंमत वाटायची ती सुसाट धावणाऱ्या राजधानीची. संध्याकाळी ५-६ च्या दरम्यान सुसाट राजधानी दिमाखात स्टेशनाला मागे सोडून निघून जायची. मामाघरी असताना एकही दिवस न चुकवता आमचा गच्चीवर जाऊन सुसाट धावणारी राजधानी पाहण्याचा कार्यक्रम असायचा, इतकं आम्हाला त्या वेगाचं आकर्षण वाटायचं. राजधानीच्या हॉर्नचा आवाज, रुळावरची राजधानीची धडधड सगळ रोमांचकारी वाटायचं.
खरं तर आम्ही मुंबईत जिथे राहायचो तिथे समोरच आम्हाला विमान उडताना, उतरताना अगदी घराच्या खिडकीत बसूनही दिसायची. विमान येता जातानाचे मोठाल्ले आवाज, जे इतरांना मोठाल्ले वाटायचे पण कान बसवणारा तो भलामोठा आवाज सवयीमुळे आम्हाला कधीच मोठा वाटला नव्हता. पण तोच राजधानीचा हॉर्न आणि रुळावरचा गाडीचा आवाज अगदी आमच्या कानांमधून आरपार जायचा. कसं असतं ना मनाच्या सवयीचं. रोज रोज ज्या गोष्टी आपण पाहतो, अनुभवतो ते आपल्या इतकं अंगवळणी पडतं की त्या गोष्टीबद्दलच्या आपल्या संवेदनाच हरवून जातात. आता अगदी काल परवाचीच गोष्ट असेल. संध्याकाळच्या वेळेस सोसायटीच्या खाली असलेल्या बाकावर थोडा वेळ निवांतपणे बसले होते. तसं आता संध्याकाळच्या वेळेस ‘हमारे जमाने मे था’ अशी मुलं खेळताना दिसत नाहीत. ट्युशन, इतर क्लासेस आणि नाहीच राहता राहिलं तर मोबाइल वेड... यामुळे कवी गुलजार म्हणतात त्याप्रमाणे - ‘एक मोबाइल मेरी गेंद चुरा ले गया है’ ही वस्तुस्थिती मुलांच्या खेळण्याची आहे, तर मला दोन लहान मुलं खेळताना नजरेस पडली. साधारणतः तिसरी, चौथीतील असतील. दोघंच जण कसला खेळ खेळतायत म्हणूनच अधिक कुतूहलाने मी त्यांच्याकडे मधे भिंत असल्याने थोडं वाकूनच पाहू लागले. दोघं जण तोंडाने ढूम्म...ढोम्म असे काहीसे आवाज काढत होते आणि एकमेकांच्या अंगावर लपूनछपून कागदाचे बोळे टाकत होते. बराच वेळ त्यांचा खेळ मी पाहत होते. ते काय करत आहेत याचा अंदाज मला आला होता. तरी पण मुलं काय उत्तर देतायत, हे पाहू या... म्हणून मी त्या दोघांजवळ गेले आणि त्यांना विचारलं,“काय खेळताय तुम्ही दोघं?” तर ती दोघं जण माझ्याकडे पाहून हसत हसतच म्हणाली,“अांटी आम्ही वॉर वॉर खेळतोय.” “काय?” मी म्हटलं कोणी सांगितला तुम्हाला हा खेळ ,” अांटी कोणी नाही सांगितला. अांटी टीव्हीवर न्यूजमध्ये बघूनच आम्हाला ही आयडिया सुचली. कसे बॉम्ब पडतायत... सारखा सायरनचा आवाज कसा येतोय. मज्जा येते बघायला. घरात आमचं कार्टून पण कोणी लावत नाही... अख्खा दिवस फक्त न्यूज चॅनल.
“मी त्या मुलांना म्हटलं, “भीती नाही का वाटत वॉरच्या बातम्या बघायला.” “पहिल्यांदा वाटली होती. विमान डोक्यावरून जाताना दिसलं तर वाटायचं आता आपल्या डोक्यावर नाही नं बॉम्ब पडणार. घरात सगळे मला चिडवायचे घाबऱ्या... घाबऱ्या. पण आता बातम्या सारख्या सारख्या पाहून भीती निघून गेली. मी ब्रेव झालो.” त्याच हे वाक्य ऐकून मी सुन्न झाले. कशी समजावू मी या लहानशा मुलाला, सवयीने मन गेंड्याच्या कातडीसारखं संवेदनाहिन होणं आणि शूरता यातला फरक... याच्यासारखी असंख्य मुलं असतील जी रोज रोज न्यूज चॅनलवरील बातम्या रात्रंदिवस बघत असतील... माणसांच्या मरणाच्या... एकमेकांना भोसकण्याच्या... सतत तेच तेच ऐकून ऐकून एक संवेदनाशून्य “शूर पिढी” तर तयार होत नाही ना... ज्याचं समरगीत अभिमानाने छाती फुलवणारं असेल की, माना टाकणारं असेल हाच प्रश्न राहून राहून मनात उमटत होता. आंतरराष्ट्रीय युद्धापेक्षाही मला जास्त काळजी वाटू लागली, या लहान लहान मुलांची. युद्ध ही घटना त्यांच्यापर्यंत ज्या पद्धतीने पोहोचत आहे, त्यातून त्याचं या घटनेकडे पाहण्याचं एक चुकीचं आकलन तर तयार होत नाही ना, याचा विचार करायला हवा. अगदी आपण सगळेच लहानपणी छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमणं कशी परतवून लावली, युक्तीने आणि शौर्याने युद्धं कशी जिंकली याच्या गोष्टी समरस होऊन वाचायचो, ऐकायचो; त्यातून प्रेरणा घ्यायचो. पण त्या गोष्टी वाचताना वा ऐकताना कुठेही संवेदनाहिन न होता उलटपक्षी आपल्या मनात संवेदना जागृत व्हायच्या. देशप्रेम, आपल्या मातृभूमीचा सन्मान आणि नैतिक मूल्ये कळत नकळत मनात पेरली जायची. पण आज युद्ध आपल्या लहान मुलांपर्यंत कशाप्रकारे पोहोचत आहे, कोवळ्या मनांवर त्याचे काय पडसाद उमटत आहेत ही खरच चिंतेची बाब आहे. याला वाहिन्या जबाबदार आहेत असे नव्हे. ते त्यांचे व्यावसायिक काम पार पाडत आहेत आणि म्हणूनच जबाबदारी वाढते, ती तुमच्या आमच्यासारख्या पालकांची. युद्ध मग ते कोणत्याही कारणासाठी झालेले असो. मागे ठेवून जातं असंख्य निष्पाप प्राणांचे आक्रोश आणि पुन्हा पुन्हा अधोरेखित करत ते मानवतेचा, प्रेमाचा संदेश.
‘युद्धस्य तू कथा रम्य’ असं एक सुभाषित आपण नेहमी वापरतो. युद्धाच्या कथा आपल्याला ऐकायला खूप सुरस, उत्कंठावर्धक वाटतात. पण इथे पण येतोच... प्रत्यक्ष युद्धभूमीवर घडणारा घटनाक्रम आणि त्याच्या कथा यात फरक असतो, असा अर्थ हे सुभाषित सुचवते.अगदी कुरुक्षेत्रावर अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना करण्यासाठी झालेल्या युद्धानंतर विजयी ठरलेल्या पांडवांनाही आनंदापेक्षा घडलेला नरसंहार मनाला यातना देणारा होता. असे अनेक दाखले आपल्याला इतिहासात सापडतात. हॅनाची सुटकेससारख्या पुस्तकातून दुसऱ्या महायुद्धात पंधरा लाख लहान मुलांचे आयुष्य संपवणाऱ्या ‘हॉलोकॉस्ट’(दुसऱ्या) महायुद्धाच्या काळात हिटलर व त्याचा नाझी पक्ष यांनी जो नरसंहार केला त्याला हॉलोकॉस्ट म्हणतात. माणसाच्या इतिहासातील सामूहिक हत्यांची ही सर्वात भयंकर घटना होती. आपण वाचतो तेव्हा आपल्या डोळ्यांत अश्रू उभे राहतात. या गोष्टीचा शेवट आपल्याला सांगून जातो, की युद्ध नको, शांतता आणि प्रेमच जगाला मानवकल्याणाकडे नेऊ शकतात. युद्धाची गोष्ट जेव्हा आपल्यापर्यंत आणि विशेषतः मुलांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचते, तेव्हा मनात सद्भावाच्या संवेदना निर्माण करते, पण तिच गोष्ट जेव्हा चुकीच्या पद्धतीने पोहोचते तेव्हा मनावर ओरखडे उमटतात, हे आपल्याला लहान मुलांच्या अनेकविध कृतींमधून जाणवते. जगात कुठेतरी युद्ध सुरू असताना काय चाललंय हे जाणून घेणं ही मानवी मनातील उत्सुकता आहे. बातम्यांच्या माध्यमातून या उत्सुकतेचं समाधानही होतं, पण सततच्या भडीमाराने कोवळी मनं सहजसुंदर राहण्याऐवजी निष्ठुर तर होणार नाहीत ना, याची काळजी मात्र आपण घेतली पाहिजे. कारण ही लहान मुलं म्हणजे जगाला मानवता, शांती व प्रेमाचा संदेश देणाऱ्या भारतीय संस्कृतीचं भविष्य आहेत, ज्याची मशागत आपल्याला आजच करायची आहे. २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिवस, जो आपण सर्वांनी उत्साहाने मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला. कुसुमाग्रजांच साहित्य हे मराठी भाषेचं वैभव आहे. त्याही पलीकडे जाऊन सांगायचं, तर कुसुमाग्रजांची कविता मानवतेची कास धरणारी कविता आहे, याचा प्रत्यय आपल्याला त्यांची कविता वाचताना ठायी ठायी येतो.
‘प्रेम कुणावर करावं ’ या सुप्रसिद्ध कवितेत कुसुमाग्रज म्हणतात – प्रेम आहे
माणसाच्या संस्कृतीचा सारांश त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि भविष्यकाळातील त्याच्या अभ्युदयाची आशा एकमेव...! प्रेम ही भविष्यकाळातील अभ्युदयाची एकमेव आशा आपल्याला मुलांच्या मनात पेरायची आहे, जी या जगात कोणतंच ‘हॉलोकॉस्ट’ घडू देणार नाही. ashwinibhoir23@gmail.com







