Saturday, March 7, 2026

कैवल्याचा मूर्तिमंत साक्षात्कार म्हणजे...

कैवल्याचा मूर्तिमंत साक्षात्कार म्हणजे...

मनस्विनी : पूर्णिमा शिंदे 

८ मार्च जागतिक महिला दिन. स्त्री शक्तीचा, उत्साहाचा, उत्सवाचा दिवस. तिच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचा दिवस. महिला दिनाच्या निमित्ताने जागतिक स्तरावर अनेक कार्यक्रम घेतले जातात. पण तसं पाहिलं तर महिलांचा खऱ्या अर्थाने सन्मान होत आहे का? सत्य, समता, स्वातंत्र्य यांचा मिलाप म्हणजे शिक्षण! स्वतःबरोबर कुटुंबाचा समाजाचा देशाचा विकास करणारी ती स्त्री. आज सर्वच क्षेत्र तिने पादाक्रांत केली. तरीही ती कुठेतरी डिवचली जाते. स्त्री सामर्थ्य, धैर्य, औदार्य, धाडसाने क्रांती करणारी ती. तिच्यातील ‘ती’चा शोध घेणारी. नव्या व्यक्तिमत्त्वाला, निर्मितीला, अस्तित्वाला उत्पत्ती देणारी, जन्म देणारी तीच. आकाशाच्या बेड्या तोडून स्वच्छंद विहार करणारी. स्व संरक्षणाची ढाल बनून सामर्थ्याने पुढे चालणारी. इतिहासातील सुवर्ण हस्ताक्षरांनी पानोपानी उमटलेली तिची स्पंदने! आजही प्रेरणादायी आणि आदर्शवादी आहेत.

अन्यायाचा प्रतिकार करणारी ती दुर्गा! कधी भवानी. कधी सरस्वती. घराघरांत गृहलक्ष्मी, अन्नपूर्णा, जगत जननी विश्वव्यापीनी, तर कधीच चंडमंड विनाशिनी आहेच! समाजाकडून कधी मकरात, पालखीत बसवून सन्मानित केलेल्या या देवीची क्षणार्धात दासीही केली जाते. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये विषमतेचा बुरुज ढासळून समतेचे बीज पेरले, तरच तिचा बचाव होऊ शकतो. छत्रपतींना घडविणारी जिजाऊ माँसाहेब, साने गुरुजींना घडविणारी श्यामची आई, शत्रूला भिडणारी राणी लक्ष्मीबाई, समाज हितवादी पुण्यश्लोक अहिल्यादेवी, समाजाला घडविणारी क्रांतीज्योती सावित्रीबाई, महाराणी ताराबाई, पंडिता रमाबाई, अनुताई वाघ, ताराबाई मोडक, लतादीदी, पी. टी. उषा, सानिया मिर्झा, साईना नेहवाल, कल्पना चावला, मेरी कोम, सुनीता विल्यम्स, इंदिराजी, प्रतिभाताई पाटील, सिंधुताई सपकाळ, मेधा पाटकर, सुचिता कृपलानी, सरोजिनी नायडू, हेलन केलर, मदर टेरेसा, एनी बेझंट, कॅप्टन लक्ष्मी, भगिनी निवेदिता, डॉक्टर आनंदीबाई जोशी यांसारख्या विरांगणानी सर्वच क्षेत्रांत कर्तृत्वाचे झेंडे क्षितिजा पार फडकवलेले आहेतच. देशाच्या विकासात हातभार लावला त्याही स्त्रियाच होत्या आणि त्यांच्या आदर्शाने चालणाऱ्या आज जिजाऊच्या लेकीदेखील. आपल्या सचोटी, हातोटी, कसोटी आणि चिकाटी यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. चालीरीतीच्या शृंखला तोडल्या. चार भिंतींची चौकट मोडली आणि तिच्या पंखात बळ घेऊन तिने उंचच उंच भरारी मारली आहे. तिचा झोका किती उंच गेला तरी आकाशाला भेदून पुन्हा जेव्हा ती पृथ्वीवर येते तेव्हा तेव्हा तिला आव्हाने पेलावी लागतात. असंख्य वेदनांना, अपमान, अवहेलना, उपेक्षा यांना सामोरे जावे लागते. झुंजावे लागते.

आयुष्यभर जीवन जगत असताना तिला चूलमूल या चाकोरी बाहेर जाऊन सर्वांप्रती समर्पित व्हावं लागतं. सर्वच क्षेत्रात व कर्तृत्वाने स्व सामर्थ्याने सिद्ध झालेली आजची स्त्री बंड पुकारते. बदलत्या युगाबरोबर बदलते आणि म्हणूनच तिचे हक्काचे सन्मानाचे स्थान तिला द्यावे. हा सन्मान समाजाकडून देण्यात यावा. तिचे खच्चीकरण न करता तिला पाठबळ द्या. संरक्षण, न्याय, हक्क, अधिकार, शिक्षण या पाच गोष्टींमधून तिला जगण्याचे बळ, निर्णयाचे स्वातंत्र्य मिळावे. तिची वैचारिक प्रगल्भता, परिपक्वता समाज निर्मितीमध्ये अनमोल आहे.

समाजाच्या विकासासाठी, उन्नतीसाठी तिचा सहभाग अत्यंत मोलाचा आहे. स्त्रिया निश्चितच समाजासह इतरांना घडवतात. कधी सक्षम बनून वात्सल्यपूर्ण हिरकणी. तेजस्वी तेजस्विनी, यशाची पताका फडकविणारी यशस्विनी, अन्यायाविरुद्ध कडाडणारी सौदामिनी. संग्रामात रणरागिनी, कर्तव्याचे माप भरणारी झुंजार कर्तृत्वशालिनी आहेच. त्यासह आज प्रत्येक क्षेत्रांत कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, कृषी, न्याय, समाज, राजकारण, उद्योजिका, पर्यावरण, कॉर्पोरेट या सर्व क्षेत्रांत तिने तिचे नाव सुवर्णक्षणांनी कोरले आहे. ३६५ दिवसांपैकी केवळ एक दिवस तिचा म्हणून साजरा करण्यात अर्थ नाही. फक्त एक करा, समाजाकडून नराधमांकडून तिच्यावर होणारे अन्याय, अत्याचार, बलात्कार, अवमूल्यन, फसवणूक याचा प्रतिकार वेळीच बिमोड व्हायला हवा.

स्त्रीला ितचा स्वाभिमान आहे कारण ती माणूसच आहे. या विश्वाची निर्मिती तिच्यातूनच झालेली आहे. परोपकार, शौर्य, त्याग, मातृत्व, प्रीती या सर्व भूमिकांतून आदर्श ठरलेली स्त्रीशक्ती खरोखरच उल्लेखनीय आहे तिच्याशिवाय घर, समाज आणि देश अपूर्ण आहे. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या स्त्रियांना भक्कम आधार द्या. त्यांस सहकार्य द्या, हीच महिला दिनी उत्तम भेट ठरू शकते.

Comments
Add Comment