प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ
आज ‘जागतिक महिला दिन’ आहे. हा दिवस जगभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे साजरा केला जातो. अलीकडे हा दिवस साजरा करायच्या नावाखाली काही कुटुंबात घरातील पुरुष माणसे स्वयंपाक करतात आणि बाईला आराम देतात. काही असो; परंतु वर्षभरात येणारे असे ‘दिन’ त्या दिवशी तरी कमीत कमी साजरे होतात. काही संघटना एकत्रित येऊन आपले विचार मांडतात. एखाद-दुसरी समस्या सरकार दफ्तरी पोहोचते. त्यावर विचार होतात. काहीतरी चांगले घडत राहते, हे निश्चित! पण माझ्या आयुष्यात असे ‘महिला दिन’ मी अधेमध्येही अनुभवलेले आहेत. आज या दिनाच्या निमित्ताने त्याची परत आठवण आली इतकेच! या लेखात मी फक्त रेल्वे प्रवासाची दोन
उदाहरणे देते. - मोबाईलमध्ये रेल्वेचे ॲप डाऊनलोड करून पहिले तिकीट काढले होते पनवेल ते चिपळूणचे! शनिवारी संध्याकाळी साधारण आठची ट्रेन होती आणि मी रात्री साडेअकरापर्यंत चिपळूणला उतरणार होते. तिथे आयोजक मला घ्यायलाही येणार होते आणि हॉटेलपर्यंत पोहोचवणार होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ९ चा मला कार्यक्रम होता. ही संपूर्ण ट्रेन फक्त रिझर्वेशनची होती याची मला कल्पना नव्हती. शिवाय मी जे तिकीट काढले होते त्याचा वेटिंग लिस्ट नंबर पाच होता, जे तिकीट मी एक महिना आधी काढले होते त्यामुळे महिनाभरात ते कन्फर्म झालेच असेल असे मला वाटले. ते कन्फर्म झाले की नाही ते कसे पाहायचे, याचे ज्ञान माझ्याकडे तेव्हा नव्हते. फलाटावर माझ्या बाजूला बसलेला एक माणूस माझ्याशी बोलत होता. तो त्याच्या आईला आणि मावशीला घेऊन कोकणात चाललेला होता. त्याच्याशी बोलता बोलता मी माझ्या तिकिटाविषयी बोलले की, मला कळत नाही मी कोणत्या सीटवर जाऊन बसायचं ते. मला मेसेजमध्ये काही आलेलेच नाही. तेव्हा ते म्हणाले की, तुमचे तिकीट मला दाखवा ते कन्फर्म झाले आहे की नाही मी सांगतो. त्याने ते तिकीट हातात घेऊन ते कन्फर्म झाले नसल्याचे सांगितले. शिवाय कन्फर्म न झालेल्या तिकिटाचे पैसे आपल्याला परत येतात त्यामुळे तुम्ही जर ट्रेनमध्ये चढलात, तर तुम्ही विदाऊट तिकीट चढलात, असा त्याचा अर्थ होतो, हे ऐकून मी खूप घाबरले. त्यानंतर कोणत्या ट्रेन होत्या किंवा कसं पोहोचायचं याबद्दल मी खूप साशंक झाले. तेव्हा ते म्हणाले की, माझ्या मावशीचे तिकीट आठ डबे दूर आहे. मावशी आणि आई दोघींनाही मोबाईल वगैरे वापरता येत नाही त्यामुळे दोघींनाही एकत्र घेऊनच मला प्रवास करावा लागेल. तुम्ही माझ्या तिकिटाचा फोटो काढून घ्या आणि या डब्यात, या सीटवर जाऊन बसा आणि टीसी आल्यावर त्याला नियमात असेल त्याप्रमाणे पैसे द्या! मी ‘हो’ म्हटले; परंतु चारच दिवसांनी गणपती येणार होते त्यामुळे ती ट्रेन इतकी खचून भरली की तीन तास मी माझ्या सीटवरून उठू शकले नाही की कोणताही टीसी कोणत्याच सीटपर्यंत पोहोचू शकला नाही.
अशा तऱ्हेने मला माहीत नाही; परंतु कोणीतरी असेच भेटत राहतात. मदत करत राहतात. सोलापूर रेल्वे स्टेशनपासून खासगी वाहनाने तासाभराच्या अंतरावर एक गाव होते. जिथे मला एक पुरस्कार घेण्यासाठी जायचे होते. नेहमीच्या सवयीप्रमाणे मुंबईहून शनिवारी रात्रीचे तिकीट काढले. रविवारच्या सकाळी सोलापूरला उतरून तयार होऊन नऊ ते पाच संपन्न होत असलेल्या कार्यक्रमाला पोहोचले. काही कार्यक्रमात उद्घाटनाच्या सत्रात पारितोषिके दिली जातात, तर काही कार्यक्रमात आभाराच्या सत्रात. हे सर्व विचारात घेऊन सोलापूरवरून एक ट्रेन संध्याकाळी ६.३० ला निघणारी होती, तर दुसरी ट्रेन रात्री १०.३० ची होती. मी विचार केला जर आभाराच्या सत्रात पारितोषिक वितरण झाले तर आपण ६.३० पर्यंतही ट्रेन पकडायला पोहोचू शकणार नाही. त्यामुळे आपण १०.३० च्या ट्रेनचे टिकीट काढू या, जेणेकरून सोमवारी पहाटे मुंबईत उतरून घरी जाऊन सकाळी ८.३० पर्यंत कॉलेजमध्ये पोहोचता येईल! तो कार्यक्रम व्यवस्थित ५.३० ला संपला. आयोजकांनी विचारले, “तुमच्या हातात दोन पर्याय आहेत एक आत्ताच तुम्ही निघालात तर ६.३० पर्यंत सोलापूर रेल्वे स्टेशनला पोहोचाल कारण माझ्या ड्रायव्हरची ड्युटी सातला संपणार आहे. नाही तर आमच्या घरी येऊन जेवून साधारण ९ च्या सुमारास निघालात तरी तुम्हाला १०.३०ची ट्रेन आरामात मिळेल; परंतु टॅक्सीने तुम्हाला प्रवास करावा लागेल. मला स्वतःला तुमच्याबरोबर येता येणार नाही कारण मला आज भावाला अॅडमिट केले तिकडे रात्री त्याच्यासोबत थांबायचे आहे. मी सुज्ञ विचार केला की गाडी आहेच तर स्टेशनकडे निघून जावे. त्यांनी दिलेल्या गाडीतून मी सुखरूप स्टेशनवर पोहोचले. तिथे एकमेव वेटिंग रूम होती. तिथे गेले आणि बसले समोर एक जोडपे बसलेले होते. मी सहजच त्यांना विचारले, “तुमची ट्रेन कितीची आहे?” तेव्हा ते म्हणाले, “आमची ट्रेन ६.३० ची होती पण ती लेट झाली आहे. ” मी पाहिले तर स्टेशनवर पण तुरळकच माणसे दिसली होती. मी चष्मा लावला आणि मोबाईल बाहेर काढला आणि मला धक्काच बसला कारण माझी गाडी रात्री १०.३० च्या ऐवजी मध्यरात्री २.३० वाजता येत असल्याचा संदेश दिसला. एकंदरीत तिथे थांबणे प्रशस्त वाटत नव्हते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये बोर्डांच्या प्रॅक्टिकल एक्झाम सुरू होणार होत्या त्यामुळे कसेही करून मला कॉलेजमध्ये सकाळी साडेआठला पोहोचणे आवश्यक होते. माझ्या चेहऱ्यावरचा तणाव कदाचित समोरचे जोडपे निरखत असावे. त्या माणसाने विचारले, “काय झाले ताई?” मी म्हटले, “माझी ट्रेन लेट आहे. इथे काही बरी व्यवस्था दिसत नाही की मी थांबू शकेल उशिरापर्यंत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्या मला कोणत्याही परिस्थितीत कॉलेजमध्ये पोहोचणं भाग आहे.” तो माणूस म्हणाला, “ताई आमच्याबरोबर चला की आमच्या गाडीतून!” मी म्हटले, “कसं शक्य आहे ते? माझं तिकीट तर पुढच्या गाडीचं आहे. तर तो माणूस म्हणाला, “आमची मुलगी पाच वर्षाची आहे परंतु ती आईशिवाय झोपत नाही आणि गाडीमध्ये तर तिला आम्ही एकटीला झोपवूच शकत नाही तर तुम्ही तिच्या सीटवर झोपू शकता. तशीही आमची एक सीट रिकामीच राहणार आहे.” “ पण माझं टिकीट...? मी पुटपुटले. “बघा दहा मिनिटं आहेत अजून... तुम्ही पटकन जाऊन एक साधं सोलापूर मुंबई तिकीट काढून आणा कारण आता तुम्हाला कोणतेही रिझर्वेशन मिळणार नाही!” बाकी आपण टीसीशी काय ते बोलूया....”
मी जेमतेम टिकीट काढून परतले. आम्ही त्यांनी रिझर्वेशन केलेल्या डब्यासमोर जाऊन उभे राहिलो ट्रेनमध्ये चढलो. त्या ट्रेनमध्ये टीसीला माझी परिस्थिती त्यांनी समजावून सांगितली. त्यांनी आमच्याकडून पैसे घेतले नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी व्यवस्थित कॉलेजमध्ये पोहोचले. मला खूप लोकांनी मदत केली आहे, त्यांना परतफेड करू शकत नाही परंतु ती आठवण ठेवून मी दुसऱ्या कोणालातरी वेगळ्या प्रकारची मदत करण्याचा प्रयत्न नक्कीच करते!?
pratibha.saraph@ gmail.com







