Saturday, March 7, 2026

बागों मे जबजब फूल खिलेंगे...

बागों मे जबजब फूल खिलेंगे...

नॉस्टॅल्जिया; श्रीनिवास बेलसरे

कर्णमधुर संगीत, आपल्या कलेशी समरस झालेले गायक, अर्थपूर्ण हृदयस्पर्शी गाणी, नयनरम्य चित्रीकरण आणि रसिक सहज गुंगून जातील अशी कथा - ही जुन्या सिनेमाची वैशिष्ट्ये होती. सुरज प्रकाश यांनी दिग्दर्शित केलेला चेतन के. यांचा ‘जब जब फुल खिले’(१९६५) हा असाच एक रम्य सिनेमा! शशीकपूर, नंदाबरोबर बेबी फरिदा, टूनटून आणि आगा होते.

रिता खन्ना (नंदा) ही अतिश्रीमंत राजबहादूर चुनीलाल खन्ना (कमलकपूर) यांची एकुलती एक कन्या. सुट्टीसाठी ती सहाय्यक स्टेलाला (शम्मी) घेऊन काश्मीरला जाते आणि राजाकडून (शशीकपूर) एक हौस-बोट भाड्याने घेते. सुरुवातीला थोडी ताणाताणी होऊन नंतर सर्व सुरळीत झाल्यावर मैत्री होते आणि राजा तिच्या प्रेमातच पडतो. पुढच्या वर्षी परत येण्याचे आश्वासन देऊन नंदा परत जाते. इकडे राजबहादूरना तिचे लग्न किशोरशी (जतीन खन्ना) करून द्यायचे असते. (या अभिनेत्यामुळे पुढे हेच नाव असलेल्या अभिनेत्याला गोंधळ टाळण्यासाठी आपले नाव बदलून ‘राजेश खन्ना’ असे करावे लागले.)

पुढच्या ट्रीपला किशोर रीताबरोबर येतो आणि राजची पंचाईत होते. घरी परतल्यावर रिता आपले प्रेम राजवर असल्याचे उघड करते तेव्हा वडील आधी राजाला पैशांचे आमिष दाखवून आपल्या मुलीचा नाद सोडण्याचा आग्रह करतात. जेव्हा तो बधत नाही तेव्हा ते तिला खोटीखोटी संमती देऊन दुसरी चाल खेळतात. राजासाठी ते एक पार्टी आयोजित करतात. पार्टीत राजाला रीताचे इतर पुरुषांबरोबर नाचणे खटकते आणि त्यांचे भांडण होते. आपण या संस्कृतीत राहू शकणार नाही असे सांगून तो काश्मीरला परत निघतो.

मनात आनंदलेल्या राजबहादुरांचे बोलणे रीताच्या कानावर पडते. त्या दोघांत भांडण व्हावे म्हणून त्यांनीच हा प्रसंग घडवून आणलेला असतो. हे लक्षात येताच चिडलेली रिता तत्काळ राजाला मनवायला रेल्वे स्टेशनवर जाते. गाडी सुटते आणि ती गाडीबरोबर पळत राहते. अगदी शेवटच्या क्षणी राजा तिला वर ओढून घेतो आणि मिठी मारतो. अशी ही सुखांतिका!

मूळ शेवट वेगळा होता. मात्र सुरज प्रकाश १९५७ सालच्या ‘लव्ह इन द आफ्टरनून’ या इंग्रजी सिनेमाचा शेवट इतका आवडला होता की, त्यांनी शेवटचा सीन करताना ‘लव्ह इन द आफ्टरनून’ची जशीच्या तशी कॉपी केली आणि सिनेमा हिट झाला! नंदा, शशीकपूरपासून सर्वांच्या बावनकशी अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनाला भिडला. त्या वर्षी सर्वात जास्त उत्पन्न मिळवणाऱ्या सिनेमात (६१ वर्षांपूर्वी ५.५ कोटी म्हणजे आजचे ३६७ कोटी) त्याचा क्रमांक दुसरा होता! कल्याण-आनंदजींची सर्व गाणी प्रचंड गाजली. बक्षीजींचे बोल कित्येक वर्षे मनामनात घुमत होते. ‘परदेसीयोसे ना अखिया मिलाना’ने वार्षिक बिनाकात ११वा क्रमांक पटकावला.

सिनेरसिकांनी डोक्यावर घेतलेल्या बक्षीसाहेबांच्या त्या अजरामर गाण्याचे शब्द होते -

‘परदेसियोंसे ना अँखियाँ मिलाना, परदेसियोंको है इक दिन जाना.’ राजाच्या मनातही आपल्यालाही कुणीतरी प्रेमाचे माणूस भेटावे अशी सुप्त इच्छा असते. त्याचबरोबर या प्रवासी लोकांचे प्रेम काही टिकणारे नसते ही जाणीवही असते -

‘आती है जब ये रुत मस्तानी, बनती है कोई न कोई कहानी. अबके बरस देखे बने क्या फ़साना, परदेसियोंसे ना..’

पर्यटनस्थळी तसे नेहमी घडणारे हे नाट्य! क्षणभराचा संपर्क येतो आणि एखादी व्यक्ती मनाला खूप आवडून जाते. तिच्याविषयी ओढ निर्माण होते पण त्या सहवासाला, संबंधांना काळाच्या मर्यादा पडतात. ती व्यक्ती जाताना खूप हुरहूर लावून जाते आणि हेच जर दोन तरुण मनात, थोड्या जास्त दिवसाच्या सहवासात घडले तर बरीचशी भावनिक गुंतागुंत होऊन बसते आणि वियोगानंतर माणूस स्वत:शीच पुटपुटतो, ‘आता पुन्हा कधी असे कुणाच्या जवळ जाणे नकोच!’ अंतर्मन मग नकळत त्या व्यक्तीला दोषही देऊ लागते! वाटते, ‘हे लोक तर मौसमी पक्ष्यांसारखे असतात. आज लळा लावतात आणि उद्या भुर्रकन उडून जातात. यांचे जगणेच बैराग्यासारखे. त्यांच्याशी संबंध न आलेलाच बरा!’

‘सचही कहा है पंछी इनको, रातको ठहरें तो उड़ जाएं दिनको. आज यहाँ, कल वहाँ है ठिकाना, परदेसियोंसे ना...’

हे किती स्वार्थी असतात ना? जेव्हा जेव्हा वसंताचा बहर येतो तेव्हा बरोबर हजर होतात आणि पानगळ सुरू झाली की कुठे गायब होतात देव जाणे! मग त्यांना जीव लावणाऱ्याने वियोगातले दिवस कसे काढायचे?

‘बागोंमें जब-जब फूल खिलेंगे, तब-तब ये हरजाई मिलेंगे. गुज़रेगा कैसे पतझड़का ज़माना, परदेसियोंसे ना...’

विरह जेव्हा कायमचा आहे हे कळते तेव्हा दुखावलेले मन एकेक फिर्याद करू लागते - या अशा प्रवाशांना प्रेमाशी काही देणे-घेणेच नसते, बहुतेक! यांची मने कशी दगडासारखी निष्ठुर असतात. यांच्यासाठी कधीच रडू नये. हे तर कुणासाठी दोन अश्रूही ढाळत नसतात.

‘प्यारसे अपने ये नहीं होते, ये पत्थर हैं ये नहीं रोते. इनके लिये ना आँसू बहाना, परदेसियोंसे ना...’

प्रेमाच्या मनाला मोहून टाकणाऱ्या भावनेचा सुंगध यांना काय कळणार? ही तर कागदाची फुले! हे कधी कुणाच्या प्रेमात मनापासून बरसतात का? खरेच यांच्याशी नाते जोडूच नये!

‘ना ये बादल ना ये तारे, ये कागज़के फूल हैं सारे. इन फूलोंके न बाग लगाना, परदेसियोंसे ना...’

नायकाच्या मनातील नेमक्या भावना हळुवारपणे व्यक्त करणे हा तर जुन्या गाण्यांचा हेतूच असायचा. राजा हा एक भोळाभाबडा तरुण. तो स्वत:ची वेदना सांगताना म्हणतो, ‘मी हीच चूक केली होती. एका परक्या व्यक्तीच्या प्रेमात पडलो होतो. आज माझे हृदय सतत अश्रू ढाळताना मला सांगत राहते – कुणा परक्यांशी कधीच संबंध ठेवू नकोस -

‘हमने यही इकबार किया था, इक परदेसीसे प्यार किया था. रो-रोके कहता है दिल ये दीवाना, परदेसियोंसे ना...’ परमेश्वराच्या या पृथ्वी नावाच्या सुंदर पर्यटनस्थळाला भेट देणारे तसे आपणही परदेशीच की! मग ती भेट भले ६०/७० वर्षांसाठी का असेना! त्यामुळे संतांनी म्हटल्याप्रमाणे इथेही जास्त मन गुंतवण्यात अर्थ नाही, हेच खरे.

Comments
Add Comment