स्मृतिगंध; लता गुठे
मी वयाच्या १७ व्या वर्षी मुंबईत आले आणि या सिमेंटच्या जंगलात माझी कर्मभूमी निर्माण केली. पण इथं कधी तसं मन रमलंच नाही. आजही सण उत्सव आले की, माझं मन गावच्या बालपणीच्या कोवळ्या पाऊलवाटेने धावत सुटतं. नुकताच होळीचा सण झाला आणि मला आठवला तो बालपणातील शिमग्याचा सण. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरी होणारी होळी आणि त्यानंतर येणारी धुळवड–रंगपंचमी यांना एकत्रितपणे अनेक गावांत शिमगा असे म्हटले जाते. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातील खेड्यांमध्ये शिमगा विशेष जल्लोषात साजरा केला जातो.
शिमग्याचा सण जवळ आला की आई शेणाच्या गाेवऱ्या लावायला घ्यायची. छान हाताने थापलेल्या वाळलेल्या गोवऱ्या व होळीला लागणारे सामान आदल्या दिवशीच जमा करून ठेवायचो. दुसऱ्या दिवशी अंगणभर शेणाचा सडा टाकायचा. बरोबर अंगणात मधोमध एक छोटासा खड्डा करून त्या भोवती छान रांगोळी घालायची हे काम आम्हा मुलांकडेच असायचे. घरातल्या मोठ्या बायका पुरणपोळीचा स्वयंपाक करण्यामध्ये गुंतलेल्या असायच्या. चुलीवर रटरटणारं पुरण शिजल्यानंतर त्याचा सुगंध घरभर पसरायचा. सूर्य मावळायच्या वेळेला आजूबाजूचे, शेजारचे सर्व अंगणात जमा व्हायचे. मग अंगणात होळी पेटवली जायची. अतिशय मनोभावे त्या होळीची पूजा व्हायची. त्यामध्ये नारळ, पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जायचा. होळीभोवती तांब्यातील पाणी ओतत बायका प्रदक्षिणा घालायच्या. त्यानंतर सर्वांना प्रसाद वाटून. भक्त प्रल्हाद आणि होलिकाची कहाणी लहान मुलांना ऐकवली जायची आणि त्यानंतर गावांमध्ये दोन वेशीच्या बाहेर दोन मोठ्या गावच्या होळ्या पेटवल्या जायच्या. गावाबाहेरच्या मोकळ्या जागेत होळी उभारण्याची तयारी दिवसभर सुरू असायची. सुक्या फांद्या, उंच बांबू, वैरणीच्या पेंढ्या आणि गावातल्या प्रत्येक घरातून आलेल्या पाच गोवऱ्या त्याभोवती रचल्या जायच्या आणि उंच होळीची बांधणी केली जायची. त्याला हार घालून, साखरेच्या घाट्या अडकवल्या जायच्या. ही तयारी करताना प्रत्येक घरातून काही ना काही नैवेद्य होळीमध्ये अर्पण केले जायचे. विधीपूर्वक होळी पेटवली जायची. स्त्रिया होळीत नव्या पिकाचे धान्य अर्पण करतात. या विधीमागे वाईट प्रवृत्तींचा नाश आणि सद्भावनेचा विजय अशी भावना असते.
पुराणकथेनुसार भक्त प्रल्हादाचा विजय आणि होलिकेचा पराभव याची आठवण करून देणारा हा क्षण असतो. अशा सण उत्सवामधूनच गावातील सामुदायिक एकतेची भावना दिसून यायची. दुसऱ्या दिवशी धुळवड. रंगपंचमीला ग्रामीण भागात धुळवड असे म्हणतात. धुळवडीचा रंग तयार करण्यासाठी पूर्वी पळसाची लाल भडक फुलं तोडून आणायचो ते वाटायची आणि त्यापासून रंग तयार करायचा. अगदी नैसर्गिक आणि दिसायलाही अतिशय सुरेख. पूर्वी रासायनिक रंग नव्हते; फुलांपासून, हळदीपासून, मातीपासून तयार केलेले नैसर्गिक रंग वापरले जात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण एकमेकांना रंग लावून शिमग्याचा जल्लोष साजरा करायचे. या काळामध्ये शेतीची कामे संपत आलेली असायची त्यामुळे थोडी उसंत मिळाल्यामुळे घरोघरी हा सण उत्साहात साजरा व्हायचा. या काळामध्ये गावामध्ये वेगवेगळे रूप घेऊन बहुरूपे गावभर फिरायचे. रायरंद पोलिसाचे कपडे घातलेला अजूनही आठवतो. म्हणूनच ‘शिमग्याचे सोंग’ हा शब्दप्रयोग आला असावा. अनेक भागांमध्ये लोकनाट्य सादर होत असत. कोकणात “शिमगा नाच” प्रसिद्ध आहे. माणसं राक्षस, राजा-राणी, वाघ, पोलीस, भिकारी अशी विविध सोंगे घेऊन ढोल, ताशा, झांज यांच्या तालावर नाचत गावभर शिमगा मागायचे आणि त्यांना शेतकरी मोठ्या आनंदाने दान म्हणून झोळीत जे शक्य असेल ते घालायचे. हे सोंगाडे सामाजिक प्रश्नांवर उपरोधिक भाष्यही करत असत. समाजातील वाईट चालीरिती, अंधश्रद्धा यावर लोकांना समजेल उमजेल या शब्दांत टीका करत असत. ही लोकजागृतीची एक विलक्षण आकर्षित करणारी पद्धत होती.
शिमग्याच्या सणामध्ये स्त्रियांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असे. होळीच्या दुसऱ्या दिवशी गावातील स्त्रिया होळीतील रक्षा आणण्यासाठी एकत्र जमत असत. त्यावेळी होळीभोवती स्त्रिया फेर धरून ओव्या म्हणत, फुगड्या खेळत आणि पारंपरिक गाणी गात शिमग्याचा आनंद द्विगुणित करत. घराघरांत पुरणपोळी, करंजी, लाडू असे गोड पदार्थ बनवले जात. नातलग आणि पाहुण्यांचे आदरातिथ्य केले जायचे. त्यामुळे शिमगा हा नातेसंबंध दृढ करणारा सण होता. वर्षभर शेतात राबणारे शेतकरी यांच्यासाठी खरंतर हा सण म्हणजे वर्षभराच्या श्रमानंतर मन मोकळे करून हसण्याचा, नाचण्याचा आणि गाण्याचा सण होता. आज सगळंच बदललं आहे. गावातील बहुतेक कुटुंब शेतामध्ये राहायला गेल्यामुळे गावाचं गावपण पूर्णपणे नाहीसं होत चाललं आहे. आता हे सण-उत्सव म्हणजे फक्त परंपरा आणि सोपस्कार म्हणून राहिले आहेत. आज गावात गेलं की एक उदासलेपण जाणवते. पूर्वीच्या फक्त आठवणी राहिल्या आहेत. बदलत्या काळाबरोबर बरंच काही प्रवाह बरोबर वाहून गेलं आहे. अजूनही मनात वाटतं हे सगळं जपून ठेवायला हवं.







