Saturday, March 7, 2026

२०२६-२७ हे वर्ष 'सामाजिक समता आणि समरसता वर्ष'

२०२६-२७ हे वर्ष 'सामाजिक समता आणि समरसता वर्ष'

मुख्यमंत्र्यांची घोषणा; सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद

मुंबई : राज्याचा सांस्कृतिक वारसा जतन करण्यासोबतच थोर समाजसुधारकांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या जतनापासून ते महात्मा ज्योतिबा फुले आणि संत गाडगेबाबा यांच्या जयंती वर्षानिमित्त विविध विकास आराखड्यांसाठी निधीची मोहोर उमटवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, २०२६-२७ हे वर्ष 'सामाजिक समता आणि समरसता वर्ष' म्हणून साजरे करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत नामांकन मिळालेल्या १२ किल्ल्यांच्या जतनासाठी विशेष उपाययोजना केल्या जाणार आहेत. सातारा जिल्ह्यातील मुनावळे ते वासोटा किल्ला दरम्यान रोपवे प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. आंबेगावची शिवसृष्टी आणि सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ला परिसराचा विकास केला जाईल. आग्रा येथील शिवाजी महाराजांचे स्मारक आणि पानिपत (हरियाणा) येथील 'काला अंब' मराठा शौर्य स्मारकासाठी राज्य सरकार सहाय्य करणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या तुळापूर येथील स्मारकाचे काम जून २०२६ पर्यंत, तर वढू बुद्रूक येथील समाधीस्थळाचे काम जून २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सातारा जिल्ह्यातील अजिंक्यतारा किल्ला आणि संगम माहुली येथील महाराणी ताराबाई व छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळांच्या संवर्धनासाठी निधी देण्यात आला आहे. समतेचा जागर

११ एप्रिल २०२६ रोजी महात्मा फुले यांची २०० वी जयंती साजरी होणार आहे. त्यानिमित्त त्यांच्या जन्मगावी (कटगुण, सातारा) भव्य स्मारक उभारले जाईल. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मतींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या जन्मगावी नायगाव येथे स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र उभारणार. महाड येथील चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त पायाभूत सुविधांचा विकास आराखडा तयार केला जाईल.

संत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीवर्षानिमित्त गाडगेबाबांचे जन्मस्थळ, कर्मभूमी आणि श्रद्धास्थान यांना जोडून 'संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट' विकसित केले जाणार आहे. तसेच ७५ गावांत 'एआय'च्या सहाय्याने जीवनमान उंचावण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येतील. भक्ती आणि शक्तीचा संगम

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. रामटेक विकास आराखड्याचा दुसरा टप्पा आणि जगदगुरु तुकाराम महाराजांच्या देहू येथील जन्मस्थानाच्या जतनासाठी आराखडा तयार केला जाणार आहे. रामटेक येथे राज्यातील तिसरी चित्रनगरी विकसित केली जाईल, जिथे महाकवी कालिदास यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती होईल. मराठी भाषेसाठी 'अनुवाद अकादमी'

मराठी साहित्याचा प्रसार जागतिक स्तरावर करण्यासाठी आणि इतर भाषांमधील दर्जेदार साहित्य मराठीत आणण्यासाठी ‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र अनुवाद अकादमी’ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच, एमटीडीसीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ५० पर्यटनस्थळांवर पायाभूत सुविधांची निर्मिती केली जाईल.

Comments
Add Comment