Saturday, March 7, 2026

मुंब्रा : शिळ डायघर भागात गोळीबार, दोघे जखमी

मुंब्रा : शिळ डायघर भागात गोळीबार, दोघे जखमी

मुंब्रा : ठाणे जिल्ह्यातील मुंब्रामध्ये शिळ डायघर भागात गोळीबार झाला. मुंब्रा कौसा येथील बांधकाम व्यावसायिक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नदीम मोइनुद्दीन खान उर्फ बाबा खान (४५) यांच्या घरावर घराबाहेर गोळीबार करणाऱ्या आरोपीला मुंब्रा पोलीस पकडण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपीने पाच गोळ्या झाडल्या. या गोळीबारात दोन नागरिक जखमी झाले. जखमींवर काळसेकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शहाबाद उर्फ शंभू मुन्ना शमशाद कुरेशी (२८) असे गोळीबार करणाऱ्याचे नाव आहे. आरोपी मुंब्रा येथील महापे रोडवरील केला कंपाउंडमधील अमीन पॅलेसमध्ये राहतो. गोळीबार करणाऱ्याच्या एका साथीदाराचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौसा परिसरातील अरमान को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीमध्ये बांधकाम व्यावसायिक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नदीम मोइनुद्दीन खान उर्फ बाबा खान हे राहतात. शनिवारी पहाटे ४.५४ वाजता त्यांच्या घराबाहेर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. गोळीबाराची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक सावंत आणि सोनवणे तसेच बीट क्रमांक तीनचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी नदीम खान यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या कारवर दोन गोळ्या झाडण्यात आल्या, तर एक गोळी हवेत फायर करण्यात आली. पोलिसांनी लगेच आरोपींचा पाठलाग सुरू केला. शिळ डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आचार गल्ली येथे पोलिसांनी शहाबाद उर्फ शंभू मुन्ना शमशाद कुरेशी याला पकडण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्याने पोलिसांच्या दिशेने पाच गोळ्या झाडल्या. या गोळीबारात तेथे उपस्थित असलेले दोन नागरिक जखमी झाले असून त्यांना काळसेकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. एकाच्या पोटाला गोळी चाटून गेली आहे तर, दुसऱ्याच्या बोटाला गोळी लागली.

गोळीबार प्रकरणी पोलिसांनी शहाबाद उर्फ शंभू मुन्ना शमशाद कुरेशी (२८) याला अटक केली असून त्याच्याकडे असलेली एक बंदूक आणि चार मॅगझिन जप्त केल्या आहेत. नदीम खान यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात असून शांत आहे.

Comments
Add Comment