Saturday, March 7, 2026

भांडुप रेल्वेवरील पुलाचे बांधकाम ३१ जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण होणार

भांडुप रेल्वेवरील पुलाचे बांधकाम ३१ जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण होणार

आयआयटीकडून आराखड्याची पडताळणी

मुंबई : भांडुप रेल्वेवरील भांडुप पूर्व आणि पश्चिम यांना थेट जोडणारा पूल वीर सावरकर मार्गावर ज्या ठिकाणी पूल उतरत आहे, त्या ठिकाणी पूर्व - पश्चिम संरेखनाशी जोडणी होताना तीव्र वळण आहे. उड्डाणपुलाचा आराखडा तांत्रिक मानकांनुसार तयार करण्यात आला असला तरी पवईतील भारतीय तंत्रज्ञान संस्‍थेच्‍या तज्‍ज्ञांकडून त्‍याची पडताळणी करावी. वाहतूक प्रवाहाचे विश्लेषण करण्यासाठी वाहतूक अनुकरण अभ्यास करावा. त्‍याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. पादचारी रेल्‍वे प्रवासी, स्‍थान‍िक रहिवासी यांच्‍यासाठी उड्डाणपुलावर सुगम्‍य पदपथ करावा. पुलाचे बांधकाम विहित कालमर्यादेत पूर्ण करून ३१ जानेवारी २०२७ पर्यंत उड्डाणपूल वाहतुकीस खुला करावा, असेही निर्देश बांगर यांनी दिले आहेत.

भांडुप पूर्व - पश्चिम जोडणी सुधारण्यासाठी महानगरपालिकेने भांडुप रेल्वे स्‍थानक परिसरात रेल्वेवरील उड्डाणपूल बांधण्याचा महत्त्वाचा प्रकल्प हाती घेतला आहे. या पुलाच्‍या कामास अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी शुक्रवारी ६ मार्च २०२६ रोजी प्रत्‍यक्ष भेट देऊन पाहणी केली. तसेच विविध निर्देश दिले. प्रमुख अभियंता (पूल) (अतिरिक्‍त कार्यभार) राजेश मुळे यांच्‍यासह अधिकारी, अभियंता, सल्‍लागार यावेळी उपस्थित होते.

हा पूल वीर सावरकर मार्ग आणि लालबहादूर शास्त्री मार्ग यांना थेट जोडणार आहे. भांडुप परिसरात पूर्व - पश्चिम वाहतुकीसाठी सध्या थेट मार्ग नसल्याने नागरिकांना मोठा फेरा मारावा लागतो. या समस्येवर उपाय म्हणून हा उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. भांडुप पूर्व आणि पश्चिम यांच्यात थेट जोडणी निर्माण करणे, वाहतूक कोंडी कमी करणे, प्रवासाचा वेळ कमी करणे आणि जोगेश्वरी विक्रोळी जोड मार्ग (जेव्हीएलआर) व इतर मार्गांवरील वाहतूक ताण कमी करणे हा यामागील प्रमुख हेतू आहे. सध्या अनेक नागरिकांना पूर्वेकडून पश्चिमेला जाण्यासाठी सुमारे ५ किलोमीटर अंतराचा फेरा मारावा लागतो. नवीन पुलामुळे प्रवासाचा वेळ जवळपास निम्मा होण्याची शक्यता आहे.

हा उड्डाणपूल भांडुप रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावरून जातो. या पुलाची एकूण लांबी सुमारे ५३० मीटर असून रेल्वेवरचा भाग सुमारे ८९ मीटर इतका आहे. रस्त्याची रुंदी महानगरपालिका हद्दीत ११.५० मीटर आणि रेल्वे भागात १५.६० इतकी आहे. उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी १० ऑक्टोबर २०२३ रोजी कार्यादेश देण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्ष कामकाजास सन २०२४ मध्ये सुरुवात झाली. सध्या प्रकल्पाची सुमारे ३० टक्के भौतिक प्रगती साध्य झाली आहे. तसेच पूर्वेकडील बाजूस खांब क्रमांक ६ व ७ साठी पाइलिंगचे कामही पूर्ण झाले आहे. रेल्‍वेतील हद्दीत स्‍थापित करण्‍यात येणा-या पोलादी तुळ्यांचे फॅब्रिकेशन काम अंबाला येथील कारखान्‍यात सुरू आहे.

अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर म्हणाले की, पुलासाठी २७.४५ मीटर रस्‍तारेषेसाठी आवश्यक असलेल्या 'सॉल्ट पॅन' जमिनीचे संपादन हे विकास नियोजन विभागामार्फत करण्‍यात येणार आहे. पुलाच्‍या पूर्व बाजूस पाया भागात ६०० मिलीमीटर व ९०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिन्या अडथळा ठरत आहेत. या जलवाहिन्या हलविण्याचे काम जल अभियंता विभागामार्फत सुरू आहे. उड्डाणपुलाचे काम ३१ जानेवारी २०२७ पर्यंत विहित कालावधीत पूर्ण करण्‍याचे वेळापत्रक निश्चित करण्‍यात आले आहे. नागरिकांना असुविधा होता कामा नये याची दक्षता बाळगण्‍याचे निर्देश संबंधितांना दिल्‍याचे बांगर यांनी नमूद केले.

Comments
Add Comment