Saturday, March 7, 2026

मुंबईत २० लाख झोपड्यांचा पुनर्विकास, १० लाख परवडणारी घरे बांधणार - वडाळ्यात 'तिसरी मुंबई' आकाराला येणार

मुंबईत २० लाख झोपड्यांचा पुनर्विकास, १० लाख परवडणारी घरे बांधणार - वडाळ्यात 'तिसरी मुंबई' आकाराला येणार

अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर ; वडाळ्यात जागतिक दर्जाचे 'स्टार्टअप हब',

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पातून पायाभूत सुविधांचा धडाका लावला आहे. मुंबई आणि महानगरातील २० लाख झोपड्यांचा पुनर्विकास करण्यासह १० लाख परवडणारी घरे निर्माण करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे. यासोबतच वडाळा येथे जागतिक दर्जाचे 'स्टार्टअप आणि इनोव्हेशन हब' उभारले जाणार असून, 'नो न्यू स्लम फ्रेमवर्क'द्वारे शहरात नवीन झोपडपट्ट्या होणार नाहीत, याची दक्षता घेतली जाणार आहे.

मुंबईच्या वाहतुकीसाठी मेट्रो प्रकल्पांना मोठा निधी दिला जाणार आहे. यामध्ये वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया (मेट्रो ११) हा २३ हजार ४८७ कोटींचा संपूर्ण भूमिगत प्रकल्प धारावी आणि वांद्रेपर्यंत विस्तारला जाईल. तसेच, मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ (मेट्रो ८) आणि तळोजा ते खांदेश्वर अशा नवीन मार्गिका प्रस्तावित आहेत. शहरातील अंतर्गत प्रवास वेगवान करण्यासाठी 'ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह', 'गोरेगाव-मुलुंड' आणि 'ठाणे ते बोरीवली' यांसारखे महत्त्वाचे भुयारी मार्ग (टनेल) उभारले जाणार आहेत.

अटलसेतूला जोडून २०० चौरस किमी क्षेत्रात 'तिसरी मुंबई' विकसित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यात कर्नाळा, साई, चिरनेर आणि नवी मुंबई विमानतळ परिसरातील ग्रीनफिल्ड शहरांचा समावेश असेल. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची ठाणे ते तलासरी दरम्यानची तीन स्थानके फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Comments
Add Comment