मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्याचा २०२६ - २७ आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात देशाची आर्थिक राजधानी आणि राज्याची राजधानी असलेल्या मुंबईच्या विकासासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या.
जानेवारी २०२६ मध्ये प्रदीर्घ काळानंतर मुंबई महापालिकेत भारतीय जनता पार्टीचा महापौर झाला. त्यानंतर सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात मुंबईसाठी भरीव तरतुदी आहेत.
राज्याच्या २०२६ - २७ च्या अर्थसंकल्पातून मुंबईला काय मिळाले ?
- मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था २०३० पर्यंत १४० अब्ज डॉलर्सवरून ३०० अब्ज डॉलर्सपर्यंत नेणार
- वडाळा येथे १३० एकर जमिनीवर जागतिक दर्जाचे स्टार्टअप आणि इनोव्हेशन हब करणार
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या ठाणे तलासरी मार्गाचे काम २०२७ अखेरपर्यंत पूर्ण होणार
- अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई विकसित करणार
- वाढवण जिल्हा, पालघर येथे चौथी मुंबई विकसित करणार, चौथ्या मुंबईत लॉजिस्टिक आणि विकास केंद्रे निर्माण करणार
- झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत मुंबईतील २० लाख घरांच्या पुनर्विकासासाठी तसेच भाडे तत्वावरील घरांसह १० लाख घरे विकसित करण्यासाठी बृहन्मुंबई आराखडा तयार करणार
- मुंबई महापालिका क्षेत्रात नवी झोपडपट्टी उभी राहणार नाही यासाठी GIS आधारे मॅपिंगचा वापर करून No New Slum Framework विकसित करणार
- वडाळा ते गेट ऑफ इंडिया मेट्रो मार्गिका ११ यासाठी २३ हजार ४८७ कोटी किंमतीचा भूमिगत प्रकल्प उभारणार. या प्रकल्पाचा विस्तार धारावी पुनर्विकास प्रकल्पातून पुढे वांद्रे उपनगरी स्थानक आणि वांद्रे टर्मिनसपर्यंत करण्याची योजना
- मुंबई ते नवी मुंबई विमानतळ जोडणारा मेट्रो ८ यासाठी २२ हजार ८६२ कोटी किंमतीचा प्रकल्प उभारणार
- पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणाऱ्या गोरेगाव मुलुंड भूयारी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात
- ठाणे ते बोरिवली या १८ हजार ८३८ कोटींच्या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर, जून २०२८ पर्यंत हा मार्ग पूर्ण होईल
- वांद्रे वरळी सागरी सेतू ते बुलेट ट्रेन स्थानक, वांद्रे कुर्ला संकुल ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भूयारी मार्गाने जोडण्यात येईल.
- अटल सेतू ते मुंबई कोस्टल मार्ग आणि वांद्रे वरळी सागरी मार्ग या रस्त्यावर सिग्नलविरहित वाहतुकीसाठी शिवडी-वरळी उन्नतमार्गाचे काम प्रगतीपथावर, सप्टेंबर २०२६ पर्यंत हे काम पूर्ण होईल.
- अटल सेतू ते मुंबई-पुणे द्रूतगती मार्ग जोडणारा १ हजार १०२ कोटी किंमतीचा उन्नत मार्ग फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्ण करणार
- दक्षिण मुंबईला समृद्धी महामार्गाशी थेट जोडण्यासाठी छेडा नगर ते आनंद नगर आणि आनंद नगर ते साकेत, ठाणे उन्नत मार्गाचे काम डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करणार
- वांद्रे ते वर्सोवा सागरी सेतू या मार्गाचे चारही टप्प्यातील काम प्रगतीपथावर हा प्रकल्प मे २०२८ पर्यंत पूर्ण करणार
- वर्सोवा -दहिसर-भाईंदर या २२ हजार १६६ कोटी किंमतीच्या किनारी मार्ग प्रकल्प सुरू असून डिसेंबर २०२८ पर्यंत हा मार्ग पूर्ण करणार







