मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत महाराष्ट्र राज्याचा वर्ष २०२६-२७ साठीचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी मुख्यमत्री फडणवीस यांनी महिलांच्या कल्याणासाठीही मोठ्या घोषणा केली. लाडकी बहिण योजना पुढे सुरू ठेवण्यासोबतच, त्यांनी लखपती दिदी करण्यासंदर्भात, महिला स्वयंसहाय्यता समूहांसाठी आणि एकल महिलांसाठीही मोठ्या घोषणा केल्या आहेत.
२५ लाख बहिणींना लखपती दिदी करण्याचे उद्दिष्ट :
अर्थसंकल्पावेळी महिला वर्गाशी संबंधित योजनांसंदर्भात भाष्य करताना, "महाराष्ट्र ग्रामिण जीवनोन्नती अभियानांतर्गत आतापर्यंत सुमारे ३७ लाख 'लखपती दिदी' झाल्या आहेत. आता २०२६-२०२७ मध्ये आणखी २५ लाख बहिणींना 'लखपती दिदी' करण्याचे उद्दिष्ट आहे," अशी घोषणा फडणवीस यांनी केली. याशिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'लाडकी बहिण' योजनाही पुढे चालू ठेवण्यासंदर्भात भाष्य केले.
एकल महिलांच्या कल्याणासाठीही घोषणा :दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकल महिलांच्या कल्याणासाठीही मोठी घोषणा केली आहे. "सध्या राज्यांतील सर्व जिल्ह्यांमध्ये एकल महिलांचे सर्वेक्षण सुरू असून, ते पूर्ण झाल्यानंतर, त्याचे योग्य विश्लेषण करून, एकल महिलांच्या कल्याणासाठी सुयोग्य धोरण आणले जाईल", असे फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले.
"उमेद मॉल जिल्हा विक्री केंद्र उभारणीस मान्यता" :
महिला स्वयंसहाय्यता समूहांच्या वस्तूंसंदर्भात आणि त्यांच्या विक्रीसंदर्भात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या, महिला स्वयंसहाय्यता समूहांच्या वस्तू आणि विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पहिल्या टप्प्यांत १३ जिल्ह्यांमध्ये 'उमेद मॉल जिल्हा विक्री केंद्र उभारणीस मान्यता देण्यात आली आहे.







