ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय शटलर लक्ष्य सेनची शानदार कामगिरी सुरूच आहे. पहिल्या फेरीत माजी जागतिक क्रमांक एक शी युकीला पराभूत केल्यानंतर लक्ष्यने दुसऱ्या फेरीतही विजय मिळवला. हाँगकाँगच्या एनजी का लाँगला पराभूत करत त्याने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आता पुढील फेरीत त्याचा सामना चीनच्या ली शी किंवा आयर्लंडच्या न्हाट लाँग यांच्यापैकी एका खेळाडूशी होणार आहे. सध्या जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानावर असलेल्या लक्ष्यने २१-१९, २१-२३, २१-१० अशा फरकाने सामना जिंकला.
या सामन्यापूर्वी लक्ष्यला लाँगविरुद्ध कधीच विजय मिळवता आला नव्हता. पहिल्या गेममध्ये तो ४-६ अशा पिछाडीवर होता. मात्र शानदार पुनरागमन करत त्याने १५-११ अशी आघाडी घेतली आणि लाँगवर दबाव निर्माण केला. शेवटी दोघांमध्ये १९-१९ अशी बरोबरी झाली, पण लक्ष्यने जंप स्मॅशसह गेम पॉइंट मिळवत पहिला गेम आपल्या नावावर केला.
Can’t believe my eyes. Lakshya just upset defending champ & world no.1 Shi Yuqi! Massive. This is how to ‘achieve one’s Lakshya’ 👏🏽👏🏽👏🏽 @lakshya_sen pic.twitter.com/VeoUwknX6g
— anand mahindra (@anandmahindra) March 3, 2026
दुसऱ्या गेममध्ये लक्ष्यने सुरुवातीपासूनच ११-४ अशी आघाडी घेतली होती. मात्र लाँगने हार न मानता सलग गुण मिळवत स्कोअर १७-१९ असा केला. अखेर २०-२० अशी बरोबरी झाल्यानंतर लाँगने गेम जिंकत सामना निर्णायक गेममध्ये नेला.
तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये लक्ष्यने अप्रतिम मानसिक ताकद दाखवली. त्याने आक्रमक आणि वेगवान खेळ करत ६-२ अशी आघाडी घेतली. मजबूत बचाव आणि अचूक शॉट्सच्या जोरावर त्याने स्कोअर १८-७ पर्यंत नेला. लाँगने पुनरागमनाचा प्रयत्न केला, पण लक्ष्यच्या उत्कृष्ट खेळासमोर तो टिकू शकला नाही. अखेरीस आणखी एक शॉट बाहेर गेल्यानंतर लक्ष्यने सामना जिंकत उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले.







