वॉशिंग्टन डीसी : पश्चिम आशियात अमेरिका - इस्रायल विरुद्ध इराण असे युद्ध सुरू आहे. या २८ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झालेल्या युद्धाने आज ५ मार्च रोजी सहाव्या दिवसात प्रवेश केला. दोन्ही बाजू कमालीच्या आक्रमकतेने लढताना दिसत आहेत. अशातच अमेरिकेने सांता बार्बराजवळ वेंडेनबर्ग स्पेस फोर्सच्या तळावरुन रात्री ११ च्या सुमारास 'मिनिटमॅन ३ बॅलेस्टिक क्षेपणास्त्र' प्रक्षेपित करून एक चाचणी घेतली. न्यूयॉर्क पोस्टने या संदर्भात वृत्त दिले आहे.
अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात हिरोशिमा शहरावर टाकलेल्या अणुबॉम्बपेक्षा डूम्सडे बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची अर्थात मिनिटमॅन ३ बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची क्षमता २० पट जास्त आहे. चाचणीसाठी वापरलेले क्षेपणास्त्र मार्शल बेटाजवळ त्याच्या लक्ष्याजवळ कोसळलं. प्रभाव, तत्परता आणि मारक क्षमता तपासून पाहण्यासाठी क्षेपणास्त्राची ही चाचणी घेण्यात आली. अमेरिकेने चाचणी केलेले हे क्षेपणास्त्र १३ हजार किलोमीटर दूर जाऊन लक्ष्य भेद करण्यास सक्षम आहे. अमेरिकेकडे १९७० पासून हे क्षेपणास्त्र आहे. यात काळानुरुप अनेक बदल केले आहेत. जहाजावरून, विमानातून तसेच जमिनीवरून डूम्सडे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र अर्थात मिनिटमॅन ३ बॅलेस्टिक क्षेपणास्त्राद्वारे हल्ला करणे शक्य आहे.
अमेरिकेकडे अशी तब्बल ४०० डूम्सडे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहेत. रशिया आणि चीनला टक्कर देण्यासाठी ही क्षेपणास्त्र तयार केली आहेत. ही क्षेपणास्त्र फक्त एका मिनिटात मारै करण्यास सज्ज होतात म्हणून त्यांना मिनिटमॅन असेही म्हणतात. या क्षेपणास्त्राचं रुपांतर नव्या आणखी आधुनिक आणि घातक क्षेपणास्त्रात करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न सध्या सुरू आहे. यासाठीच अमेरिकेने क्षेपणास्त्राच्या चाचण्या सुरू केल्या आहेत.
कॅलिफॉर्नियात करण्यात आलेल्या चाचणीमुळे क्षेपणास्त्र यंत्रणेतील विविध भागांच्या कार्यक्षमतेचा अंदाज लावण्यास मदत मिळेल, अशी माहिती ५७६ व्या फ्लाईट टेस्ट स्क्वाड्रनचे कमांडर लेफ्टनंट कर्नल कॅरी रे यांनी सांगितलं. अशा चाचण्यांमुळे देशाची अण्वस्त्र शक्ती अधिक सक्षम होत असल्याचे ते म्हणाले.







