गटनेत्यांची बैठक घेणार; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आश्वासन
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सूचनांच्या मर्यादित संख्येवरून गुरुवारी सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंच्या आमदारांनी सभागृहात तीव्र नाराजी व्यक्त केली. मतदारसंघातले प्रश्न मांडायला वाव मिळत नसल्याचा आरोप करीत, आमदारांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लवकरच गटनेत्यांची बैठक बोलावून लक्षवेधींची संख्या वाढवण्याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
कामकाज सल्लागार समितीच्या निर्णयानुसार, यंदाच्या अधिवेशनात दररोज केवळ तीन ते पाच लक्षवेधी घेतल्या जात आहेत. मात्र, ही संख्या पुरेशी नसल्याची भावना सदस्यांमध्ये होती. गुरुवारी या नाराजीचा स्फोट सभागृहात झाला. भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेत विधानसभा अध्यक्षांकडे दाद मागितली. "लक्षवेधींची संख्या कमी केल्यामुळे आम्हाला मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्न मांडता येत नाहीत. हा आमदारांवर अन्याय असून अध्यक्षांनी आपल्या विशेषाधिकाराचा वापर करून ही संख्या वाढवावी," अशी मागणी पाचपुते यांनी केली. त्यांच्या या भूमिकेला भाजपचेच आमदार गोपीचंद पडळकर यांनीही पाठिंबा दर्शवत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
यावर स्पष्टीकरण देताना अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, "नियमानुसार एका दिवशी तीनच लक्षवेधी घेण्याची तरतूद आहे. मात्र, सदस्यांच्या भावना लक्षात घेता गेल्या काही वर्षांत आपण जास्तीत जास्त लक्षवेधी घेण्याचा प्रयत्न केला असून गेल्या अधिवेशनात विक्रमी कामकाज झाले आहे. कामकाज सल्लागार समितीने ठरवलेल्या विषयावर सभागृहात चर्चा करण्याची प्रथा नाही, तरीही आमदारांची मागणी रास्त आहे. त्यामुळे लक्षवेधींची संख्या वाढवण्याबाबत लवकरच सर्व पक्षांच्या गटनेत्यांशी चर्चा केली जाईल. नियमात तीनचा आकडा असला तरी, सदस्यांच्या आग्रहाखातर विशेषाधिकार वापरून संख्या वाढवण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल", असेही त्यांनी सांगितले.







