शिवसेनेकडून ज्योती वाघमारेंना उमेदवारी; शरद पवारांनी घरातून भरला अर्ज, तावडे, आठवले, पार्थ पवारांसह महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल
मुंबई : राज्यातील राज्यसभेच्या सात जागांसाठी केवळ सातच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजप-महायुतीकडून सहा आणि महाविकास आघाडीकडून शरद पवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. अर्जांची छाननी आणि इतर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १६ मार्च रोजी याबाबतची अधिकृत घोषणा केली जाईल.
गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय हालचालींना वेग आला होता. महायुतीकडून भाजपने चार, राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) एक आणि शिवसेनेने एक असे एकूण सहा अर्ज दाखल केले आहेत. तर महाविकास आघाडीकडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव शरद पवार विधानभवनात उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली. महाराष्ट्राच्या निवडणूक इतिहासात घरी जाऊन उमेदवारी अर्ज भरण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.
भाजपचे उमेदवार विनोद तावडे, रामदास आठवले, माया ईवनाते आणि रामराव वडकुते यांनी राष्ट्रवादीच्या वतीने पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आपले अर्ज सादर केले. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते. शिवसेनेकडून ज्योती वाघमारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अर्ज भरला. अर्ज बाद होण्याचा धोका टाळण्यासाठी शरद पवार, पार्थ पवार आणि ज्योती वाघमारे यांनी प्रत्येकी दोन संच दाखल केले आहेत.







