मुंबई: अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने होर्मुझ सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवत जागतिक व्यापाराला मोठा धक्का दिला आहे. इराणने या भागातील व्यापारी जहाजांना इशारा देत तेलपुरवठा खंडित केला आहे. चीन सोडून एकाही देशाच्या जहाजाला होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाऊ देणार नाही असं इराणने स्पष्ट केलं आहे. तर कोणत्याही परिस्थितीत अमेरिका जगभरातील पुरवठा साखळी खंडित होऊ देणार नाही असं डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे.
होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांना तात्काळ विमा संरक्षण देण्याचे आदेश ट्रम्प यांनी United States International Development Finance Corporation (DFC) ला दिले आहेत. गरज भासल्यास अमेरिकन नौदल जहाजांना एस्कॉर्ट करण्यासाठी सज्ज असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
इराणचे नियंत्रण, ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांची भीती
जगातील तेल आणि नैसर्गिक वायू वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली होर्मुझ सामुद्रधुनी सध्या इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डच्या नियंत्रणाखाली असल्याचे सांगितलं जात आहे. सामुद्रधुनीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या जहाजांवर इराणकडून ड्रोन किंवा क्षेपणास्त्र हल्ले होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक जलवाहतूक विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचा थेट परिणाम तेल आणि इंधन पुरवठ्यावर होऊ शकतो.
भारतीय जहाजे आणि हजारो खलाशी अडकले
युद्धजन्य परिस्थितीमुळे होर्मुझ सामुद्रधुनीत ३७ भारतीय जहाजे अडकली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यावर कार्यरत एक हजारांहून अधिक भारतीय खलाशी सध्या या भागातच अडकले आहेत.
भारताकडे २५ दिवसांचा साठा
केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, कच्चे तेल, एलपीजी आणि एलएनजीच्या साठ्याबाबत भारतात तातडीची टंचाई नाही. अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, भारताकडे सुमारे २५ दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध आहे. तरीही संभाव्य इंधनटंचाई टाळण्यासाठी भारत पर्यायी पर्यायांचा विचार करत आहे. रशियाकडून तेल खरेदीत वाढ करण्याचाही विचार सुरू असल्याची माहिती आहे.
अमेरिकन नौदल सज्ज
अध्यक्ष ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या सर्व व्यापारी जहाजांना आवश्यक ते संरक्षण दिले जाईल. सागरी व्यापार सुरळीत ठेवण्यासाठी विमा संरक्षण आणि लष्करी मदत या दोन्ही उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. या घडामोडींमुळे मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता असून जागतिक ऊर्जा बाजाराचे लक्ष आता होर्मुझ सामुद्रधुनीकडे लागले आहे.







