Thursday, March 5, 2026

भारताच्या सागरी सीमेजवळ पोहोचलं युद्ध

भारताच्या सागरी सीमेजवळ पोहोचलं युद्ध

पाणबुडी हल्ल्यात १०१ सैनिकांसह इराणी युद्धनौका बुडाली, ७८ जखमी

नवी दिल्ली : हिंदी महासागरात श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीवर बुधवारी एका इराणीयुद्धनौकेवर भीषण पाणबुडी हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली. या हल्ल्यात इराणची आयआरआयएस डेना ही युद्धनौका समुद्रतळाला गेली असून, त्यावरील किमान १०१ कर्मचारी बेपत्ता आहेत, तर ७८ जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती श्रीलंकेच्या नौदलाने आणि संरक्षण मंत्रालयाने दिली.

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

१८० कर्मचारी असलेल्या या इराणी फ्रिगेटवरून पहाटेच्या सुमारास आपत्कालीन मेसेज पाठवण्यात आला होता. ही नौका श्रीलंकेच्या किनाऱ्यापासून साधारण २५ मैल दक्षिणेला असताना अचानक मोठा स्फोट होऊन बुडू लागली. संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट एका अज्ञात पाणबुडीने केलेल्या हल्ल्यामुळे झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.

श्रीलंकेच्या नौदलाने तात्काळ प्रतिसाद देत दोन युद्धनौका आणि एका विमानासह मोठी बचाव मोहीम राबवली. परराष्ट्र मंत्री विजिथा हेरथ यांनी संसदेत माहिती दिली की, आतापर्यंत ३० ते ३२ खलाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून त्यांना उपचारांसाठी गाले इथल्या मुख्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बेपत्ता १०१ जणांचा शोध घेण्यासाठी नौदल आणि हवाई दलाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र बराच वेळ झाल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

इराणचा पुढील सर्वोच्च नेताही इस्रायलच्या निशाण्यावर! पदभार स्वीकारण्याआधीच हत्येची धमकी

इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांची इस्रायल आणि अमेरिकेने केलेल्या संयुक्त हल्ल्यात हत्या करण्यात आली आहे. खामेनी यांच्यावर अंत्यसंस्कारही झालेले नाहीत, त्याआधीच इस्रायलने बुधवारी खामेनी यांच्या जागी निवडला जाणारा त्यांचा कोणताही उत्तराधिकारी हा इजरायलच्या निशाण्यावर असेल. इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंबंधी पोस्ट केली आहे.

आयातुल्ला खामेनी यांचे उत्तराधिकारी म्हणून त्यांचे पुत्र मोजतबा खामेनी यांची निवड करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यादरम्यान इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी बुधवारी खामेनी यांचा उत्तराधिकारी म्हणून निवडल्या जाणाऱ्या कोणत्याही इराणी नेत्याची ते हत्या करतील अशी धमकी दिली आहे. खामेनी यांच्या हत्येनंतर त्यांची जागा कोण घेणार याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू असतानाच मंगळवारी रात्री उशिरा आयातुल्ला खामेनी यांचे पुत्र मोजतबा यांना उत्तराधिकारी म्हणून निवडण्यात आले वृत्त इस्रायली मीडियाकडून देण्यात आले. त्याानंतर ही धमकी देण्यात आली आहे.

ड्रोन हल्ल्यात मुंबईचा दीक्षित सोळंकी ठार

इस्रायल आणि अमेरिका यांनी संयुक्त कारवाई करत इराणवर हल्ला केला. या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी एकाचे नाव समोर आले आहे. ओमानच्या किनारपट्टीवर झालेल्या ड्रोन हल्ल्यात मुंबईच्या दीक्षित सोळंकी या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. दीक्षित सोळंकी हा तरुण मूळचा दीव येथील होता. पण तो काही काळापूर्वी मुंबईतल्या कांदिवली या भागात स्थायिक झाला होता. ओमान येथील मस्कत किनारपट्टीपासून ५२ नॉटिकल माईल्सवर असलेल्या एमकेी व्योम या ऑईल व्हेसलवर स्फोटकांनी भरलेल्या ड्रोनने धडक दिली. या भीषण स्फोटात इंजिन रुमला आग लागली. याच घटनेत दीक्षित सोळंकीचा मृत्यू झाला. या घटनेत बिहार आणि राजस्थान येथील दोन जणही मारले गेले. दीक्षित सोळंकी हा दीवचे मच्छिमार व्यावसायिक अमृतलाल सोळंकी यांचा धाकटा मुलगा होता. महिन्याभरापूर्वी त्याच्या आईचे निधन झाले, ज्यानंतर तो गावी आला होता आणि मग तो पुन्हा ओमानला गेला होता. ओमानमधील भारतीय दूतावासाने दीक्षित सोळंकीच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment