मुंबई : राज्यातील द्राक्ष पिकाचे संरक्षण करण्यासाठी झालेल्या कराराच्या माध्यमातून राज्य शासनाने यासंदर्भात काही ठोस धोरण राबविणे गरजेचे आहे आणि त्याबाबत काही सूचना आमदार रोहित पाटील यांनी सभागृहात मांडल्या. द्राक्ष पिकाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने टेबल ग्रेप साठी तासगाव येथे तर वाईन ग्रीप साठी नाशिक येथे विशेष केंद्र निर्माण करण्याचे धोरण तयार केले आहेत त्यावर शासनाने विचार करावा अशी मागणी आमदार रोहित पाटील यांनी केली.
सभागृहात उत्तर देताना कृषी राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांनी सांगितले की, आमदार रोहित पाटील यांनी केलेल्या सूचनांची शासनामार्फत सविस्तर माहिती घेतली जाईल. त्याचप्रमाणे आमदार रोहित पाटील यांच्यासोबत स्वतंत्र बैठक आयोजित करून त्यांनी मांडलेल्या सूचनांवर सविस्तर चर्चा करून या बाबीवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी सभागृहात दिले.
राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी संशोधन, तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी शासन कटिबद्ध असून या संदर्भातील सर्व सूचनांचा सकारात्मक विचार केला जाईल, असेही राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी स्पष्ट केले.







