मुंबई (विशेष प्रतिनिधी)
मुंबई महापालिकेच्यावतीने महापालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदान येथील जुन्या क्रिडा भवनाच्या जागेवर टाऊन हॉल जिमखाना बांधण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने अखेर कंत्राटदार कंपनीची निवड करण्यात आली असून तब्बल ३६ कोटी रुपये खर्च करून या टाऊन हॉल जिमखान्याचे बांधकाम केले जाणार आहे. या डि ठक्कर कंस्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे या जिमखान्याच्या बांधकामाची विट आता डि. ठक्कर कंपनीमार्फत रचली जाणार असून सर्वप्रकारच्या परवानगी प्राप्त करून प्रत्यक्षात कधी बांधकाम पूर्ण करेल याकडे महापालिका कामगार,कर्मचाऱ्यांचे लक्ष असेल.
पुरातन वारसा जतन परिसराचे महत्व लक्षात घेऊन आणि आजुबाजुच्या वारसा वास्तूंशी सुसंगत राहण्यासाठी सुमारे २८ मीटर उंचीची इमारत बांधकाम केले जाणार आहे. बेसमेंट एक, बेसमेंट दोन अधिक तळमजला आणि वरचे चार मजले अधिक पाचव्या मजल्याचा अंशत: भाग यामध्ये रेस्टॉरंट कॅफे, व्ह्युईंग गॅलरी आणि टेरेस मजल्यावरील क काचेचे घुमट, कॅप्सुल लिफ्ट, कार लिफ्ट, तळमजल्यावर पार्किंग इत्यादीचा समावेश या टाऊन जिमखान्याच्या बांधकामांमध्ये आहे. त्यामुळे पुढील २८ महिन्यांमध्ये याचे काम पूर्णत्वास येणे अपेक्षित आहे,
एकूण ४७१९ चौरस मीटर क्षेत्रफळावर हे बांधकाम होणार असून यासाठी सहा निविदाकारांनी भाग घेतला होता. परंतु सर्वात कमी बोली लावणाऱ्या डी ठक्कर कंस्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली. महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा कमी बोली लावल्यामुळे महापालिकेने या कंपनीनी निवड केली असून या कंपनीने यापूर्वी नागपूर उत्तन येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय अधिवेशन केंद्राचे बांधकाम केले आहे. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत या अधिवेशन केंद्राचे बांधकाम सुमारे ८५ कोटी रुपयांचे केले असल्याचे कंपनीने मुंबईतील हे टाऊन हॉल जिमखान्याचे काम मिळवताना अनुभवाचा दाखला जोडला आहे.







