बोईसर : पालघर जिल्ह्यातील बोईसरमधील तारापूर औद्योगिक वसाहतीतल्या भघेरिया केमिकल्समध्ये (जुने नाव : झेनित केमिकल्स) ओलियम वायूची गळती झाली. परिसरात असलेल्या अनेक नागरिकांना तसेच कामगारांना या वायू गळतीचा त्रास झाला. ओलियम वायू हवेच्या संपर्कात आल्याने सल्फर डाय ऑक्साईड आणि इतर सल्फरस ऑक्साईडची निर्मिती झाली. यामुळे अनेकांना डोळे चुरचुरणे, डोळे लाल होणे, घशाला कोरड पडणे, घसा खवखवणे अशा स्वरुपाचा त्रास जाणवू लागला. केमिकल फॅक्टरीपासून पुढे दोन किमी. च्या परिसरात अनेकांनी त्रास जाणवल्याची तक्रार केली.
ओलियमचा मोठा साठा असणाऱ्या एमआयडीसीच्या डी झोनमधील भघेरिया केमिकल्स मध्ये दुपारी दोन ते सव्वा दोन दरम्यान वायू गळती झाली. त्यावेळी परिसरात वाऱ्याची दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी होती. यामुळे ओलियम वायू हवेच्या संपर्कात आला आणि वेगाने सल्फर डाय ऑक्साईड आणि इतर सल्फरस ऑक्साईडची निर्मिती झाली. हे वायू वेगाने भोवतालच्या परिसरात पसरले आणि नागरिकांना त्रास झाला.
वायू गळतीच्या तक्रारी येताच जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी आपत्कालीन व्यवस्था कक्ष तसेच महसूल व इतर यंत्रणेला सतर्क केले. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी राजू वसावे घटनास्थळी पोहोचले असून पोलिसांचा मोठा ताफा कंपनीच्या परिसरात तैनात आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी राजू वसावे घटनास्थळी पोहोचले असून पोलिसांचा मोठा ताफा कंपनीच्या परिसरात तैनात आहे. कंपनीच्या बाजूने जाणारा मार्ग तात्पुरता बंद करण्यात आला आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशामन दलाचा बंब घटनास्थळी पोहोचला असून ओलियम गळती रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी एमआयडीसीच्या शिवाजीनगर भागात अशाच सल्फ्युरिक ऍसिड व ओलियम ची गळती टाकीमध्ये होऊन हा परिसर बाधित झाला होता.
परिसरात वायू गळती झाल्यास काय करावे ?
- शांत राहा आणि घरात, ऑफिसमध्ये जिथे आहात तिथेच शक्यतो थांबा
- घरातील सर्व दरवाजे व खिडक्या बंद ठेवा, पंखे, एसी व इतर वायुवीजन यंत्रणा तात्पुरती बंद ठेवा
- अत्यावश्यक असल्यास बाहेर पडताना नाक व तोंड ओल्या कापडाने झाका
- प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करा
- लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व श्वसनविकार असलेल्या व्यक्तींची विशेष काळजी घ्या
परिसरात वायू गळती झाल्यास काय करू नये ?
- घाबरू नका, अफवा पसरवू नका
- गळती झालेल्या ठिकाणी गर्दी करणे टाळा
- गळतीच्या ठिकाणी जाण्याचा किंवा तपास करण्याचा प्रयत्न करू नका
- अप्रमाणित माहिती सोशल मीडियावर शेअर करू नका
- आपत्कालीन सेवांच्या कामात अडथळा आणू नका







