मुंबई: कपिल देव, इरफान पठाण, सुनील गावस्कर, हरभजन सिंग आणि शिखर धवन यांच्यासह अनेक क्रिकेट स्टार्सनी बॉलिवूड चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या आहेत. पण तुम्हाला अशा क्रिकेट स्टारबद्दल माहिती आहे का ज्याने क्रिकेट सोडून अभिनयाला आपलं करिअर बनवलं? आपण टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि वेगवान गोलंदाज सलील अंकोलाबद्दल बोलत आहोत, ज्यानं वयाच्या २८ व्या वर्षी क्रिकेट जगताला सोडून चित्रपटांमध्ये काम केलं. सलील अंकोलानं सचिन तेंडुलकरसोबत पदार्पण केलं. अचानक क्रिकेटमधून निवृत्त होण्यापूर्वी त्याने फक्त २० आंतरराष्ट्रीय सामने खेळले.
सलील अंकोलाची कारकीर्द
सलील अंकोलाला एकेकाळी भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाजांपैकी एक मानलं जायचं. त्यानं सचिन तेंडुलकरसोबत पदार्पण केलं. त्यानंतर तो क्रिकेट सोडून बॉलिवूडकडे वळला आणि नंतर त्याच्या कारकिर्दीत एक वेळ अशी आली जेव्हा त्यानं छोट्या पडद्यासाठीही काम केलं. सलील अंकोलाचा क्रिकेट ते अभिनय हा प्रवास चढ-उतारांनी भरलेला होता.
क्रिकेटमधून निवृत्ती
सलील अंकोलानं अगदी लहान वयात क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्यानं १९८८ मध्ये महाराष्ट्रासाठी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि त्याच्या पहिल्याच हंगामात २७ विकेट्स घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. लवकरच त्यानं राष्ट्रीय संघात स्थान मिळवलं आणि सचिन तेंडुलकरसोबत पाकिस्तानविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याची कसोटी कारकीर्द फक्त एक सामना चालली, परंतु तो आठ वर्षे एकदिवसीय संघात राहिला. सलीलने २० एकदिवसीय सामने खेळले. सलील अंकोलानं १९९६ च्या विश्वचषकातही भाग घेतला. पण, संघात सतत अनुपस्थित राहिल्यामुळे आणि दुखापतींमुळं त्यानं वयाच्या २८ व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
सलील अभिनयाकडे वळला
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, सलील अंकोला अभिनयाकडे वळला. त्यानं २००० मध्ये 'कुरुक्षेत्र' या चित्रपटातून पदार्पण केलं. त्यानंतर सलील अंकोला 'बिग बॉस' च्या पहिल्या सीझनमध्ये सहभागी झालेला. चित्रपटांनंतर, सलील अंकोला टेलिव्हिजनकडे वळला आणि 'कोरा कागज' आणि 'श्श्श्श...कोई है' सारख्या शोमध्ये दिसला.







