मुंबई: ‘स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान’ आणि ‘रस्ते स्वच्छता योजना’ अंतर्गत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना ‘लाडकी कर्मचारी बहीण’ म्हणून दरवर्षी सन्मानित करण्यात येणार आहे. याबाबतचा ठराव महापालिका सभागृहात मंजूर करण्यात आला आहे. शिवसेनेच्या नगरसेविका दिक्षा कारकर यांनी मांडलेल्या ठरावाच्या सूचनेमला मंजुरी देत सभागृहात यावर एकमताने निर्णय घेण्यात आला आहे
मुंबई शहरातील वाढती लोकसंख्या, झपाट्याने वाढणाऱ्या झोपडपट्ट्या आणि वाढता कचरा यामुळे स्वच्छतेचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी महानगरपालिका विविध उपाययोजना राबवत आहे. मात्र या मोहिमेत मोलाची भूमिका बजावणाऱ्या महिला सफाई कर्मचाऱ्यांच्या कार्याचा विशेष गौरव करण्याची मागणी दिशा ह. कारकर यांनी करून ‘स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान’ आणि ‘रस्ते स्वच्छता योजना’ अंतर्गत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना ‘लाडकी कर्मचारी बहीण’ म्हणून दरवर्षी सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी केली होती. कारकर यांनी मागणी केल्यानंतर अंजली नाईक, मेहेर हैदर, तृष्णा विश्वासराव, ऍड. सिध्दार्थ शर्मा, अजंता यादव, अश्रफ आझमी, लिना देहेरकर, श्रध्दा जाधव आदींनी चर्चा करून दत्तक वस्ती योजनेतंर्गत सफाई कामगारांना दिले जाणारे अल्प मानधन, त्यांचे आरोग्य आदींवर चर्चा करत या मागणीचे समर्थन केले. त्यावर महापौर रितू तावडे यांनी ठरावाची सूचनेला मंजुरी दिली. त्यामुळे आता प्रशासनाच्यावतीने याची प्रत्यक्षात कधी अंमलबजावणी होते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
महानगरपालिकेने या महिला कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित केल्यास त्यांच्या कामाला अधिक प्रेरणा मिळेल आणि स्वच्छतेबाबतचा जनजागृतीचा संदेश अधिक प्रभावीपणे समाजात पोहोचेल, महिला सफाई कर्मचाऱ्यांच्या योगदानाला योग्य मान्यता यामुळे मिळेल असे मत दिक्षा कारकर यांनी व्यक्त केले.







