कोकणचा शिमगा... काळजातली ओढ

संस्कृती : विभा मसुरकर 


कोंकणात होळीला शिमगा म्हणतात.
फाल्गुन पंचमीपासून अनेक ठिकाणी या उत्सवाला सुरुवात होते.
चाकरमान्यांचे ‘गावी येणे’
सिंधुदुर्गातील शिमग्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य.
“गणपती आणि शिमग्याला गावाला यायलाच पाहिजे,” अशी कोकणी माणसाची भावना असते.
मला ओढ लावते ती देवगड तालुक्यातील एका छोट्याशा गावातील माझ्या आजोळची होळी.
अगदी लहानपणापासून आईच्या सोबत मी आजीकडे होळी उत्सवाला जायची. या होळी उत्सवाची सांगता पाडव्याच्या दिवशी रात्री मांडावर देवाचे वारे येऊन व्हायची.
फाल्गुन पौर्णिमेची रात्र... आकाशात पूर्ण चंद्र आणि खाली गावच्या मांडावर एक वेगळाच माहोल!
ढोल आणि घुमटांची ती जुगलबंदी.. तो धीरगंभीर आवाज... आणि हवेत गुलालाचा एक मंद सुवास ! सर्वांच्या नजरा खिळलेल्या असतात त्या समोरच्या अंधारात नाचणाऱ्या एका लखलखत्या ज्योतीकडे. ती केवळ मशाल नसते तर तो असतो आमच्या गावचा राजा.
श्री देव कालभैरव, जो आपल्या भक्तांच्या हाकेला प्रतिसाद म्हणून मांडावर अवतरलेला असतो... तो आता मांडावरचा देव असतो.


लहानपणी शिमगा जवळ आला की, मनात भक्तीपेक्षा भीतीच जास्त दाटायची. ढोलाचा तो धडधड वाढवणारा आवाज आणि रात्रीच्या अंधारात मांडावर हातात पेटती मशाल घेऊन बेफाम धावणारा तो ‘अवसर’ पाहिला की, आईच्या पदरामागे लपावसं वाटायचं. डोळे घट्ट मिटलेले असूनही तो ‘देव’ गावच्या सीमेपर्यंत ज्या वेगाने धावायचा, ते पाहून अंगावर शहारे यायचे. पण जसजशी वर्षं सरली, तसं लक्षात आलं की, ती भीती नसून एक अनामिक ‘दरारा’ होता आणि ती मशाल म्हणजे गावाला सुरक्षित ठेवणारा एक दैवी प्रकाश होता. आज मागे वळून पाहताना जाणवतं की, काही गोष्टी विज्ञानाच्या पलीकडच्या असतात, त्या फक्त अनुभवयाच्या असतात. देवगडच्या या माझ्या गावात जेव्हा कालभैरवाचे वारे मांडावर येते, तेव्हा तर्क-वितर्क आपोआप गळून पडतात.
होळी या सणापासून मांड उभारायला सुरुवात होते. मांड म्हणजे दारात मांडव उभारला जातो. रात्र झाली की तिथे होळीनिमित्त वेगवेगळी सोंगे आणली जातात. भजन, कीर्तन, देवाची गाणी घुमट वाजवून मोठ्या जोशात साजरी केली जातात. गोव्यातील नायकिणीचा नाच, स्थानिक लोकांची कला असे वेगवेगळे कार्यक्रम होळी ते पाडवा चालू असतात.


हा मांड तेथील स्थानिक देवाची आराधना म्हणून बसवला जातो.पाडव्याला रात्री देव मांडावर येतो आणि भक्तांचे गाऱ्हाणे ऐकून त्यांची संकटातून मुक्तता करतो अशी श्रद्धा आहे.अशा वेळी लळीत आणि त्यातील नायकिणीचे नृत्य याला खूप मोठे आध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्व आहे.


‘नायकीण’ स्त्रीला सन्मानाने पाचारण केले जाते. तिला पाहुणचार आणि मानाचा विडा दिला जातो. तिच्या कलेचा आणि परंपरेचा सन्मान करण्याचे ते प्रतीक आहे. असे मानले जाते की, नायकिणीने मांडावर नाचणे म्हणजे प्रत्यक्ष ‘लक्ष्मी’ किंवा ‘शक्ती’ रूपाने देवाची सेवा करणे होय.


नायकिणीचे नृत्य हे आनंदाचे आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते. या नृत्यात खूप साधेपणा असतो, पण त्यातील लय महत्त्वाची असते. अलीकडच्या काळात नायकिणीला आमंत्रित करणे ही प्रथा काही गावात मागे पडत चालली आहे. अनेक ठिकाणी आता व्यावसायिक कलाकार ही भूमिका निभावतात, तरीही त्यामागील ‘ग्रामदैवताची सेवा’ ही भावना आजही तशीच आहे.


कोकणचा शिमगा म्हणजे केवळ रंगांचा उत्सव नव्हे, तर तो आहे ग्रामदैवताशी असलेल्या अतूट नात्याचा सोहळा. मांडावर ढोलाचा आणि घुमटांचा ठेका जसा जसा वाढत जातो, तसा वातावरणातला उत्साह शिगेला पोहोचतो. ग्रामस्थांमधीलच देवाने कौल दिलेली एक विशिष्ठ व्यक्ती जोरजोरात घुमू लागते..त्याला देव अंगात येणे असे म्हणतात.
‘ऐसा गोविंदा येतो मजवरी गुलाल उधळितो’ या गाण्याच्या सुरांवर जेव्हा गुलालाची उधळण होते, तेव्हा प्रत्येक गावकऱ्याला खात्री पटते की, आपला ‘रक्षणकर्ता’ आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.


अंधाऱ्या रात्रीत जेव्हा मांडावरचा देव हातात पेटती मशाल घेऊन बेफाम धावू लागतो, तेव्हा मनातील भीती जळून खाक होते. सर्वात विस्मयकारक गोष्ट म्हणजे, डोळे बंद असूनही तो ‘अवसर’ बरोबर गावच्या सीमेपर्यंतच धावत जातो. जणू काही तो ‘मांडावरचा देव’ स्वतः धावत जाऊन गावच्या सीमा सुरक्षित करत असतो. “ह्या रेघेच्या आत माझ्या लेकरांना कोणतीही बाधा येणार नाही,” याचीच ती जणू ग्वाही असते.


या सोहळ्यात केवळ भक्तीच नाही, तर एक अदृश्य ‘आधार’ असतो. मांडावर उभ्या असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यांत एक वेगळीच आर्तता असते. कोणाला पोरीच्या लग्नाची काळजी असते, कोणाला संततीचे साकडे घालायचे असते, तर कोणाला हक्काच्या जमिनीच्या वादातून सुटका हवी असते. जेव्हा तो मांडावरचा देव त्या गावकऱ्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतो आणि उजवा ‘कौल’ देतो, तेव्हा मिळणारे समाधान कोणत्याही विज्ञानात बसणारे नसते. हे चमत्कार आहेत की केवळ योगायोग, हे सांगणे कठीण आहे. पण देवाने दिलेल्या त्या एका ‘होकारा’वर अनेकांची लग्न जमली आहेत आणि जमिनीचे पिढ्यानपिढ्या चाललेले तंटे शांत झाले आहेत, हे सत्य नाकारता येत नाही.
कदाचित, जेव्हा माणूस सर्व बाजूंनी हरतो, तेव्हा देवाने दिलेला तो शब्द त्याच्यात जी सकारात्मकता निर्माण करतो, तीच कठीण प्रसंगांवर मात करण्याची शक्ती देते.
सण संपतो, पण कालभैरवाचा तो ‘होकार’ वर्षभर प्रत्येक गावकऱ्याच्या मनात उमेद जागवून ठेवतो. तो चमत्कार असो वा नसो, पण त्या निमित्ताने गावात जो एकोपा टिकून आहे आणि माणसाला जो आधार मिळतोय, तेच कालभैरवाचे खरे जागृत रूप आहे.


इथे मी कुठेही अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही किंवा जे घडले ते त्या देवाने घडवले असे पुष्टी देणारे विधानही करीत नाही. जेव्हा एखाद्या हताश माणसाला देवासमोर उभं राहिल्यावर जगण्याची नवी उमेद मिळते, तेव्हा ते कोणत्याही प्रयोगशाळेत सिद्ध करता येत नाही. तो श्रद्धेचा विजय असतो. श्रद्धा की अंधश्रद्धा या वादात न पडता या उत्सवांच्या निमित्ताने जो उत्साह आणि देवावरील विश्वास गावकऱ्यांमध्ये दिसून येतो तो नक्कीच मनाला उभारी देणारा असतो हे मात्र खरे.

Comments
Add Comment

ध्येयप्रती निष्ठावान राहा

मनस्विनी : पूर्णिमा शिंदे स्वतःला पूर्णपणे स्वीकारा. आपल्या परिस्थितीकडे तुम्ही कसे पाहता? ती दूरदृष्टी, ते

वेळेचे महत्त्व

जीवनगंध : पूनम राणे शारदा विद्यालयात रेहान नावाचा विद्यार्थी शिकत होता. तो इयत्ता दहावीला होता. अत्यंत नम्र,

प्रतिभावंत संगीतकार पुत्रामुळे संगीतकार पित्याला नवी ओळख...

स्मृतिपटल : अनिल रा. तोरणे प्रत्येक पित्याप्रमाणे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मन यांनाही वाटत असे की,

जंगलांच्या सहनशक्तीची कसोटी

पर्यावरण : मिलिंद बेंडाळे हवामान बदल हा केवळ तापमानवाढीचा प्रश्न नाही, तर ती परिसंस्थांच्या सहनशक्तीची कसोटी

एकादशीचे व्रत भद्रशील उपाख्यान

महाभारतातील मोतीकण; भालचंद्र ठोंबरे हिंदू धर्मात अनेक व्रत वैकल्ये आहेत. प्रत्येक व्रत वैकल्याचे आपआपले

‘हजार राहे मूडके देखी...’

नॉस्टॅल्जिया; श्रीनिवास बेलसरे एक काळ होता जेंव्हा सिनेमा भारतीय समाजमनाचा आरसा होता. त्यात सगळेच होते, भारतीय