Sunday, March 1, 2026

ध्येयप्रती निष्ठावान राहा

ध्येयप्रती निष्ठावान राहा

मनस्विनी : पूर्णिमा शिंदे

स्वतःला पूर्णपणे स्वीकारा. आपल्या परिस्थितीकडे तुम्ही कसे पाहता? ती दूरदृष्टी, ते ध्येय, ती हिंमत, ती ऊर्जा आपल्या मनात असते. हे मनाचं सामर्थ्य ओळखायला हवे आणि वेळीच कोणत्या परिस्थितीतून तुम्ही कसे बाहेर पडता? आजूबाजूची प्रतिकूल, अनुकूल, कौटुंबिक, आर्थिक, मानसिक, शारीरिक या परिस्थितीतून कुठलेही न्यूनगंड न बाळगता स्वाभिमानाने, धाडसाने सामोरे जाण्यासाठी सर्वात महत्त्वाचा दागिना आहे आत्मविश्वास. आत्मविश्वास आव्हाने पेलण्यासाठी एक शस्त्र आहे. ताकद आहे. तुमचा वावर कसा आहे. तुमचा रुबाब कसा आहे. तुम्ही दिसता कसे? यापेक्षा तुम्ही आहात कसे? आपल्या ऊर्जा क्षमता, बौद्धिक, शारीरिक, मानसिक कल, हालचाली आणि कृतीतून आपण कसे व्यक्त होतो?

जी माणसं स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतात ती माणसं आयुष्यात कधीही अयशस्वी होत नाहीत. जगणं कुणाचं सोपं नसतं, आपलं सोडून सगळ्यांचं चांगलं असतं असं प्रत्येकाला वाटत असतं. परंतु कठीण परिस्थितीत संघर्ष केल्यावर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते त्याचं नाव, “आत्मविश्वास.”

सामर्थ्य! मग ते शब्दांत, मनात, भावनेत, कृतीत असले पाहिजे. यशाच्या योग्य दिशेने शक्ती पडताळून पाहा. उपयुक्तता पडताळून पाहा. नेहमीच खचलेले, कमकुवत भयात वावरू नका! सर्वप्रथम स्वतःवर विश्वास ठेवा! स्वतःच्या मर्यादा ओळखा.स्वतःच्या क्षमतांचा योग्य वापर करा. ध्येयपूर्तीने पुढे चला. मग कोणतेही यश तुमच्यापासून लांब राहणार नाही. आपल्या वागण्या, बोलण्यात समतोल, संतुलन, सातत्य असायला हवं! सतत पुढे पुढे चला. रोज नवीन कौशल्य शिका. चाला, वाचा, बोला. जनसमुदाय दांडगा ठेवा. लोकप्रिय व्हा, सुप्रसिद्ध व्हा. आपण लोकांशी कसे वागतो, लोक आपल्याशी कसे वागतात, अगदीच भावनाविवश होऊ नका. जर तुम्हाला यशस्वी व्हायचे, तर तुम्ही तुमची बलस्थानं ओळखा आणि त्यांचा वापर करा. मी माझे बलस्थान पूर्ण ओळखून यशाकडे धावते. ती कशी वापरायची मला ज्ञात आहे. त्यामुळे माझे यश हे कोणीच थांबू शकत नाही. स्वओळख, स्वप्रतिमा, स्वाभिमान आणि आत्मविश्वास या चार स्तंभांवर आपण विचार करत असतो व संवाद साधतो. स्वगत करतो, पण ही सकारात्मक आहे का? ते तपासून पाहा.

व्यक्तिमत्त्व विकासामध्ये सकारात्मकतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नैराश्य, दैन्य, दुःख झटकून टाका. भीती, न्यूनगंड काढून टाका. माणसातील आत्मविश्वास आणि त्याची सकारात्मकता त्याला उंच उंच नेते. यामध्ये यशापर्यंत पोहोचताना हुरळून जाऊ नये आणि अपयश आले, तर कधीच खचून जाऊ नये. आपण ध्येयाप्रती निष्ठावान राहिले पाहिजे. त्यासाठी सचोटी असावी. जिद्द असावी. म्हणून स्वतःला ओळखा, स्वीकारा, स्वतःवर प्रेम करा आणि यशाकडे मार्गक्रमण करा. मग आपण जिंकलो म्हणून समजाच.

Comments
Add Comment