‘हजार राहे मूडके देखी...’

नॉस्टॅल्जिया; श्रीनिवास बेलसरे


एक काळ होता जेंव्हा सिनेमा भारतीय समाजमनाचा आरसा होता. त्यात सगळेच होते, भारतीय कुटुंबव्यवस्था, नातीगोती, त्यातला गोडवा, तणाव, त्यांचे निवारण किंवा त्यातूनच ओढवलेला विनाश, आर्थिक प्रश्न, सामाजिक समस्या आणि महत्त्वाचे म्हणजे या सर्वावर सुसंस्कृत, बुद्धिमान विचारवंतानी केलेले चिंतन. हे सगळे सिनेमात दिसायचे आणि यात विचारवंत म्हणजे कुणी मोठमोठ्या पुस्तकांचे लेखक किंवा प्राध्यापक नव्हते! ते होते त्यावेळच्या जिवंत मनोरंजनविश्वातील जबाबदार लेखक, मनस्वी गीतकार, कलाकार आणि खऱ्या अर्थाने दिशा दाखवू शकणारे ‘दिग्दर्शक’!


तारुण्यातील प्रेम हा तर एकंदरच कलाविश्वाचा आवडता विषय! मग ते प्रेम लैला-मजनूचे असो, ती रोमिओ-ज्युलीयटची प्रीतीकथा असो किंवा शेक्सपियरच्या ‘ऑथेल्लो’ची राक्षसी प्रेमकहाणी, ‍कोणत्याही भाषेतील साहित्यात ते ओघाने येतेच. मात्र प्रेमाबरोबरच भावनिक असुरक्षितता, परस्परसंशय, रुसवाफुगवा, अनेकदा तर टोकाची वैरभावनासुद्धा अटळपणे येऊन जीवन दु:खमय करते.


सिनेमा होता नंद मिराणी यांचा इस्माईल श्रॉफ यांनी दिग्दर्शित केलेला १९८०चा ‘थोडीसी बेवफाई’. राजेश खन्ना (अरुण चौधरी) आणि शबाना आझमीच्या (निमा देशमुख) मुख्य भुमिकेबरोबर इतर कलाकार होते. ए. के. हंगल, लीला मिश्रा, दिना पाठक, जलाल आगा, प्रीती गांगुली, देवेन वर्मा, पद्मिनी कोल्हापुरे, विजू खोटे, मुराद, श्रीराम लागू, शशी किरण, उर्मिला भट, गायत्री, इत्यादी.ए. के. हंगल एक श्रीमंत व्यावसायिक आहेत. त्यांचा मुलगा अरुणची (राजेश खन्ना) भेट निमा देशमुखशी (शबाना) होते आणि दोघे प्रेमात पडतात. घरच्या अनुमतीने त्यांचे लग्नही होते.


निमाला मुलगा होतो. हौसेने त्याचे नाव अभिनंदन ठेवतात. एकदा शबानाचा भाऊ राजेशला त्याची मैत्रीण डॉ. करुणाबरोबर एका रेस्टॉरंटमध्ये पाहतो आणि ते शबानाला सांगतो. संशयाने चिडून जाऊन राजेशची बाजू ऐकून न घेता ती माहेरी निघून जाते. अहंकारामुळे प्रकरण घटस्फोटापर्यंत जाते. घटस्फोटानंतर राजेशला छोट्या अभिनंदनला, फक्त रविवारी भेटायची परवानगी असते. त्या भेटीतही शबाना अडथळे आणत राहते. मात्र सगळे अपमान पचवूनही राजेशचे मुलावरील आणि मुलाचे त्याच्यावरील प्रेम कमी होत नाही. वरून कितीही तुटकपणा दाखवला तरी राजेश आणि शबानामधील प्रेमही जिवंतच असते. हीच सिनेमाची मूळ थीम!


एकदा शाळेतील अपमानामुळे छोटा अभिनंदन पळून जाऊन मुंबईत येतो. तो आजारी असताना योगायोगाने डॉ. करुणाच त्याच्यावर उपचार करते. तो राजेशचाच मुलगा असल्याचे तिच्या लक्षात येते आणि ती राजेशला सांगून पितापुत्रांची भेट घडवून आणते. नाशिकला घरी परत आल्यावर तो हे आईलाही सांगतो.
मोठा झालेला अभिनंदन आता पद्मिनी कोल्हापुरेच्या प्रेमात पडला आहे. ते दोघे मोटारसायकलवरून जात असताना मोठा अपघात होतो आणि त्याच्यावर शस्त्रक्रियेच्या वेळी शबाना आणि राजेशला सतत मुलाबरोबर राहावे लागते. शेवटी समज-गैरसमज दूर होऊन मुलाने निरागस मनाने केलेल्या विनंतीवरून ते एकत्र येतात. अशी ही सुखांतिका.


गुलजार यांची अर्थगर्भ गाणी, खय्यामचे कर्णमधुर संगीत, राजेश, शबाना, ए. के. हंगल आणि श्रीराम लागू यांचा जबरदस्त अभिनय या सर्वामुळे सिनेमा चांगला चालला. त्यावर्षी सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्यापैकी एक ठरला!


एकूण ९ फिल्मफेयर नामांकने मिळवत सिनेमाने गुलजारना सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून (‘हजार राहे मूडके देखी’) आणि किशोरदांना सर्वोत्तम गायक म्हणून फिल्मफेयर पारितोषिके मिळवून दिले! त्या भावूक गाण्यात किशोरदाबरोबर होती लतादीदी.


प्रेमातला दुरावा सहसा निर्माण होतो तो एकाच्या किंवा दोघांच्या अभिमानामुळे! पण तरीही प्रेम, ओढ संपलेली नसते. फक्त समझोत्यासाठी पुढाकार दुसऱ्याने घ्यावा इतकीच अपेक्षा असते. ती उभयपक्षी असल्याने दुरावा काही संपत नाही.


कुठून तरी त्याची किंवा तिची हाक येईल, पुनर्भेट होईल, असह्य झालेला दुरावा संपेल अशी आशा दोघानांही वाटत राहते. पुन्हा ते मधुर नाते पुनरुज्जीवित करायला दोन्ही मने आतुर असतात. अशावेळी जो इगो सोडून जुळवून घेतो त्याच्याबद्दलची कृतज्ञता आयुष्यभर राहते.


गुलजारजींना फिल्मफेयर मिळवून देणारे त्या गाण्याचे शब्द होते -
“हजार राहें, मुड़के देखीं,
कहींसे कोई सदा ना आई.
बड़ी वफासे, निभाई तुमने,
हमारी थोड़ीसी बेवफाई.”


प्रेमिकांना सगळे सगळे आठवत राहते. भेटीची ती वेळ, संकेतस्थळे, एकेक संवाद, रुसवेफुगवे, अनुराग, अनुनय सगळे हरवल्याची जाणीव अस्वस्थ करते. त्याचबरोबर हेही लक्षात येते की, आपल्याच हट्टामुळे आपण किती बंधनात अडकलो आहोत. एकीकडे आता धावत जाऊन जिवलगाला बिलगावे अशी उत्कट इच्छा होतेय आणि दुसरीकडे आपणच पायात किती बंधने टाकून घेतलीत! गुलजारजी अशी भावनेची एकेक नाजूक छटा एका ओळीत किती सहज चित्रित करतात -


“जहाँसे तुम मोड़ मुड़ गये थे,
ये मोड़ अब भी वहीं पड़े हैं.
हम अपने पैरोंमें जाने कितने,
भंवर लपेटे हुए खड़े हैं.
बड़ी वफासे...”


मी या विरहाचे किती दु:ख सहन केले तितके त्यानेही केले असेल का? त्यालाही ते इतक्याच तीव्रपणे जाणवले असते, तर किती बरे झाले असते! ‘किती रात्री मी त्या आठवणीत जागून काढल्यात, त्यालाही ही वेदना कळती तर किती बरे होते’ असे दोघांना वाटत राहते.


“कहीं किसी रोज यूँ भी होता,
हमारी हालत तुम्हारी होती,
जो रातें हमने गुजारी मरके,
वो रात तुमने गुजारी होती.
बड़ी वफासे...”


पण नाही ना! नियती किती कठोर होते ना कधीकधी? तीच आमच्या मनावर हुकुमत चालवते. मला वाटते की, त्याने सुरुवात करावी आणि त्याला वाटते मी पुढाकार घ्यावा. आता तर स्वत:हून हाक मारावी म्हटले तर माझ्या तोंडातून शब्दही फुटत नाहीत. किती वेदनामय असते ना हे प्रेमात पडणे...?


“तुम्हें ये ज़िद थी के हम बुलाते,
हमें ये उम्मीद वो पुकारें.
है नाम होठोंपे अब भी लेकिन,
आवाजमें पड़ गई दरारें.
हज़ार राहें मुड़के...”


अशी मनाच्या अवकाशात रेंगाळत रहाणारी गाणी लिहावीत तो गुलजारनीच, किशोरदा आणि लतादीदीनेच गावीत आणि पडद्यामागे राहून लोकांच्या जीवनाला संगीतमय करून टाकावे ते खय्यामसारख्या संगीतकरांनी. यापेक्षा ‘नॉस्टॅल्जिया’ वेगळा काय असणार?

Comments
Add Comment

पितृसेवा

महाभारतातील मोतीकण; भालचंद्र ठोंबरे एकदा महर्षी व्यासांना त्यांच्या सर्व शिष्यांनी प्रश्न केला की हे भगवान, या

‘ये जंग क्यों है?’

नॉस्टॅल्जिया; श्रीनिवास बेलसरे ताजमहाल’(१९६३) ही तशी प्रेमकथा, पण साहिर लुधियानवी नावाच्या चिंतनशील कवीने १९६३

मायेचं चैत्रगौर

स्पंदन; अश्विनी शिंदे - भोईर भारतीय माणूस म्हणजे उत्सवप्रिय. सणांमध्ये...उत्सवांमध्ये रमणारा. आज आपल्या सणवार

मनभावन चैत्रगुढी

स्मृतीगंध; लता गुठे मुंबईसारख्या महानगरात सिमेंटच्या जंगलात राहताना कधी ऋतू बदलतो समजतही नाही; परंतु ग्रामीण

भारताची भविष्योन्मुख वाटचाल

विशेष; प्रा. सुखदेव बखळे गेल्या काही दशकांमध्ये देशातील वीजमागणी झपाट्याने वाढत आहे. पण जीवाश्म इंधनांवर

दीर्घकालीन युद्धाची सावली

विश्वभ्रमण; प्रा. जयसिंग यादव इराण-अमेरिकेतील संघर्ष केवळ शस्त्रांचा किंवा सामर्थ्याचा नाही, तर राजकारण,