प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ
सोसायटीच्या कोपऱ्यावर एक छोटीशी बाग आणि खूप सारी बाके होती. वृद्धांसाठी केलेली ती सोय होती ज्याचा सर्वजण लाभ घ्यायचे. एखाद् दिवशी कोणताही कार्यक्रम नसेल, तर संध्याकाळी सोसायटीमध्ये चालण्यासाठी केलेल्या रस्त्यावरून चार-दोन फेऱ्या झाल्यावर मी या बागेतल्या बाकावर हमखास जाऊन बसते. आमच्या योगवर्गात येणाऱ्या दोन-तीन मैत्रिणी तिथे बसलेल्या असतात, त्यांच्याशी त्यानिमित्ताने अवांतर गप्पा होतात. त्यातल्या बऱ्याच जणींची नातवंड आसपास खेळत असतात, त्यांच्यावर त्या व्यवस्थित लक्ष ठेवून असतात. याशिवाय सोसायटीच्या मेनगेटमधून संध्याकाळी शाळा, कॉलेज, ऑफिसमधून परतणारी मुले, सुना, पाहुणे दिसू शकतात!
मी गेले तेव्हा काहीतरी गोष्टी चालू होत्या. सरळ सांगायचे तर गॉसिप चालू होते. नुकताच संक्रांतीचा सण झालेला होता. त्यानिमित्ताने इथे बसणाऱ्या स्त्रिया एकमेकींना लाडू आणि वाण देऊन मोकळ्या होतात म्हणजे कोणाला घरी बोलवायला लागायला नको. त्याप्रमाणे कोणीतरी एक प्लास्टिकचा डबा वाण म्हणून दिलेला होता. जिने तो डबा दिला त्या बाई आज आलेल्या नव्हत्या. त्या येणार नसल्याची सगळ्यांनाच खात्री होती. तेव्हा एक बाई इतरांना म्हणत होती, “आजच्या काळात प्लास्टिक कोण वापरतं? असा प्लास्टिकचा डबा कशासाठी द्यावा बरं?” यावर इतर जणी बहुधा दुजोरा देत होत्या. आमच्याच योगवर्गात येणारी बाई अगदी सहज म्हणाली, “ज्याला जे द्यावसं वाटतं त्यांनी ते द्यावं. आपल्याला नको असेल तर घरात कामवाल्या बायका आहेतच की त्या आनंदाने घेऊन जातात; परंतु आपल्या घरात इथे तिथे पसरणाऱ्या छोट्या वस्तू म्हणजे डोक्याला लावायच्या पिना, सेफ्टी पिना, अंबाड्याच्या पिना यांसारख्या वस्तू या डब्यात छान राहू शकतात आणि शिवाय बाहेरून दिसतातही! किंवा घरातल्या मुलांचे रंगीत खडू, शार्पनर, खोडरबर वगैरे पण ठेवता येईल. त्याच्यात अन्नच ठेवलं पाहिजे, असं काही नाही. कोणत्या तरी दुसऱ्या वस्तू ठेवण्यासाठी आपल्याला तो डबा सहज वापरता येईल. तो पारदर्शक आहे म्हणूनही आणि त्याचा आकारही किती छान आहे.” इतके बोलल्यावर सगळ्याजणी गप्प झाल्या. त्यानंतर काही दिवसांनी मला परत त्यांच्यामध्ये जाऊन बसण्याचा योग आला. यावेळेस कोणत्या तरी वेगळ्या विषयावर गप्पा सुरू होत्या. अचानक गप्पांचा सूर भांडणाकडे गेला. आमच्याकडे... तुमच्याकडे... असं काहीसे सुरू झाले. तर डब्याविषयी ज्या बाई बोलल्या त्या सहज बोलून गेल्या, “सगळी माणसं एकजिनसी असती तर मजाही आली नसती. प्रत्येक माणूस जसा चेहऱ्याने, आकाराने, वजनाने वेगवेगळा आहे तसा स्वभावाने आणि विचारानेसुद्धा वेगवेगळा आहे. त्यामुळे या वेगळेपणामुळेच आपण इथे एकत्र बसू शकतो आणि आपल्यात वेगवेगळ्या गप्पा रंगू शकतात. आपण सगळे सारखेच असतो तर आपण कोणत्या गप्पा मारल्या असत्या?”
सगळ्यांना जणू ते पटले आणि भांडणाचा विषय पुढे वाढला नाही. या बाई प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहणाऱ्या होत्या. त्याच्यातून काय चांगले घ्यायचे, हा गुण त्यांच्याकडे होताच; परंतु जेव्हा इतर माणसे बोलतात किंवा भांडतात तेव्हा आपण कशाला मधे पडायचे आणि काहीतरी बोलायचे, अशा विचाराच्या त्या नव्हत्या. मी या ग्रुपमध्ये कधीतरी जाते; परंतु या बाईच्या सकारात्मकतेची मी दोन-तीनदा नोंद घेतली आहे. प्रत्येक माणसाची जेवणाखाण्याची पद्धत, वेळा वेगवेगळ्या असतात. काही पदार्थ वापरण्याची आणि बनवण्याची पद्धत वेगळी असते. एखाद्या कुटुंबात माणसे एका डायनिंग टेबलवर बसून जेवतात, तर काहींच्या घरी प्रत्येक जण आपापली ताटे वाढून, आपापल्या वेळेने सोफ्यावर बसून जेवतात. एखाद्या कुटुंबात सगळीच माणसे खूप उष्ट टाकतात, तर काहींच्या घरी अन्नाचा एक कणसुद्धा उष्टा टाकला जात नाही. काहींच्या घरी जेवताना संसारिक बाबतीत निर्णय घेतले जातात, तर काहींच्या घरी कोणत्याही बाबतीत वाद उद्भवू शकतो, अशा विषयावर बोलण्याचे टाळले जाते.
हे फक्त थोडेसे जेवणाच्या बाबतीत; परंतु प्रत्येक कुटुंब, त्या कुटुंबातील माणसे याविषयी कादंबऱ्यांच्या कादंबऱ्या लिहिल्या तरी ते संपण्यासारखे नाही. मात्र घराबाहेर पडून चार वेगवेगळ्या घरातील माणसे एकत्र जमली तर त्यांनी कुटुंबाविषयी आणि समाजातील अनेक गोष्टींविषयी जरूर बोलावे पण बोलताना विषय जर भांडणाकडे जात असेल तर तिथेच थांबावे. आमच्या योगवर्गातल्या त्या बाईंसारखे सुज्ञपणे विचार करणे आणि बोलणे सगळ्यांना जमणे अशक्य आहे, कदाचित मलाही!
आज संध्याकाळी थोडा वेळ त्या बागेत गेले होते आणि आमच्या योगवर्गातील बाई सगळ्यांना सोसायटीत नव्याने आलेली दुडुदुडू पळणारी तीन गोड मुले दाखवत होती. त्या वेळेस त्यांची ज्या विषयावर चर्चा सुरू होती ती सोडून चर्चा या तीन गोड मुलांकडे वळली, हे त्या क्षणी माझ्या लक्षात आले. कोणाचे पाहुणे की सोसायटीत कोणी नवीन राहायला आले? किती गोड अगदी युरोपियन दिसतायेत वगैरे ती बोलत होती आणि बाकीचे आश्चर्याने, कौतुकाने त्या तीन गोड मुलांकडे पाहत होते. शेवटी काय तर फक्त लहान मुलांना पाहण्यानेसुद्धा मनातील कलुषित भाव क्षणार्धात नाहीसे होतात. मन शुद्ध होते. म्हणजे काय तर मनाला आनंद देणारे काहीतरी असतेच, अगदी आपल्या आसपास, फक्त ते लक्षात येणे गरजेचे आहे!







