महाभारतातील मोतीकण; भालचंद्र ठोंबरे
हिंदू धर्मात अनेक व्रत वैकल्ये आहेत. प्रत्येक व्रत वैकल्याचे आपआपले महत्त्व आहे. सर्व पापांना नष्ट करणारे तसेच सर्व मनोकामना पूर्ण करणारे व विशेष म्हणजे भगवान विष्णूंना प्रिय असणारे व्रत म्हणजे एकादशी व्रत होय. एकादशी व्रत करणाऱ्या सर्व स्त्री-पुरुषांना मोक्ष प्राप्ती होते, असा उल्लेख नारद पुराणात आहे. प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात. हे व्रत करणाऱ्या व फलाची पूर्ण अपेक्षा करणाऱ्यांनी चार वेळच्या भोजनांचा त्याग (उपवास) करावा. दशमीचे रात्री, एकादशीच्या दिवशी दोन्ही वेळेला व द्वादशीच्या रात्री, अशा चार जेवणाचा त्याग (उपवास) करावा. द्वादशीला विष्णूचे षोडशोपचारे पूजन व प्रार्थना करून भोजन करावे. मात्र रात्री भोजन करू नये. एकादशीच्या व्रतासारखे कोणतेच व्रत नसून यामुळे चांगले श्रेष्ठ तपाचे पुण्य लाभते. असा उल्लेखही पुराणात आहे.
नारद पुराणानूसार गालव मुनींना भद्रशील नावाचा मुलगा होता. तो सतत भगवान विष्णूंच्या ध्यानामध्ये मग्न असे. लहानपणापासूनच त्याला विष्णू भक्तीची आवड होती. बालपणातच तो मातीची विष्णूची मूर्ती बनवून तिची पूजा-अर्चा करीत असे. याच गोष्टी तो आपल्या सवंगड्यांनाही करावयास लावत असे. त्यामुळे त्याचे बालमित्रही विष्णूच्या मातीच्या मूर्तीची पूजा करून विष्णू भक्ती करू लागले. भद्रशील सर्वांसह एकत्र एकादशीला विष्णूच्या मूर्तीची पूजा-अर्चा करून एकादशीचा संकल्प करून सर्व विष्णू चरणी अर्पण करीत असत. या मुलांचे हे खेळ पाहून गालव मुनींना फार आश्चर्य वाटत असे. एक दिवस त्यांनी भद्रशीलला तुला एवढ्या लहान वयात ही परमार्थिक वृत्ती कशी व कुठून आली, याची विचारणा केली. तेव्हा भद्रशील म्हणाला मला प्रभू कृपेने पूर्वजन्मीचे स्मरण आहे. पूर्वीच्या जन्मात मी धर्मकीर्ती नावाचा राजा होतो. मी खूप वर्षे राज्य केले. त्या काळात धनसंपत्ती व राज्यसत्तेच्या अधिकारात मी अनेक अधर्म कृत्ये केली. अधर्मी लोकांच्या नादी लागून यज्ञ व धार्मिक कृत्त्याचाही त्याग केला. माझ्यामुळे प्रजाही अधर्मी होऊ लागली. त्यामुळे धर्म शास्त्र नियमाने त्यांच्या पापात सहावा हिस्सा माझ्याही वाट्याला आला.
एकदा असाच शिकारीला गेलो असता वाट चुकलो. तहानलेला व भूकेला होऊन भटकत भटकत रेवा नदीच्या काठी आलो. नदीत स्नान केले. भूक व थकल्याने ग्लानी येऊन झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी एकादशीच्या व्रतासाठी अनेक लोक नदीकाठी जमले होते. त्या दिवशी एकादशी असल्याने मी भुकेने व्याकुळ होऊन रात्रभर तळमळत दुसऱ्या दिवशी मरण पावलो. यमदूत मला घेऊन यमराजाकडे गेले. यमराजाने माझ्या पाप-पुण्याचा पाढा चित्रगुप्ताला विचारला. चित्रगुप्त म्हणाले “महाराज या मनुष्याने जीवनात अनेक पापे केली आहेत; परंतु मृत्यूपूर्वी याच्याकडून अजाणतेपणाने एकादशीचे व्रत घडले आहे. त्यामुळे एकादशीच्या प्रभावाने याची सर्व पापे नष्ट झाल्याने हा आता निष्पाप झाला आहे.
चित्रगुप्ताचे म्हणणे ऐकून यमराजाने मला वंदन केले व यमराज आपल्या दूतांना म्हणाले, ‘भगवत भक्ती करणाऱ्या कोणत्याही प्राण्यापासून दूर राहा. तप करणारे व धर्म मार्गाने चालणारे व सर्वांवर उपकार करणाऱ्या लोकांपासून दूर राहा. त्यानंतर त्यांनी मला विष्णू लोकात पाठवून दिले.’ मला पूर्वी या गोष्टीचे महत्त्व माहीत नव्हते; परंतु यमराजांचे बोलणे ऐकून मला एकादशीच्या व्रताचे महत्त्व पटले. अज्ञानाने जरी पुण्य कर्म घडले, तर त्याचे एवढे फळ मिळते, तर ज्ञानपूर्वक कर्म केल्याने कितीतरी महान फळ मिळेल, म्हणून मी स्वतः बाल सवंगंड्यांना घेऊन विष्णू पूजेत मग्न असतो. मुलाच्या तोंडून हे सर्व ऐकून गालव मुनींना असा पुत्र आपल्या कुळात उत्पन्न झाला याबद्दल अभिमान वाटला.